Thursday, 30 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत कुठल्याही परिस्थितीत दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही, असा संदेश ऑपरेशन सिंदूर मधून जगाला दिला असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज एएनआय राष्ट्रीय सुरक्षा शिखर परिषद २.० मध्ये ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूरला जवळपास एक वर्ष पूर्ण झाल्याचं सांगून त्यांनी, हे ऑपरेशन नव्या जागतिक व्यवस्थेचं प्रतीक असल्याचं नमूद केलं. दहशतवादी हल्ल्यांवर फक्त राजनैतिक प्रतिक्रिया देण्याऐवजी ठोस कारवाईचा संदेश दिला जात असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट- संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

 

दहशतवाद आणि त्याला प्रोत्साहन देणारे यांच्यात कोणताही भेद केला जाणार नाही, या सरकारच्या धोरणाचा सिंह यांनी पुनरुच्चार केला. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादाचं केंद्र आहे, तर भारत माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या सर्व शूर सैनिकांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली. या परिषदेची संकल्पना 'एआय प्रतिबंध आणि नवी जागतिक व्यवस्था' अशी असून, हा विषय समकालीन तर आहेच, शिवाय तो भविष्यालाही आकार देईल. त्यामुळे आजचा संवाद येणाऱ्या काळासाठी एक मजबूत चौकट तयार करण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

****

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विस्तारित श्रीनगर ते जम्मू तावी वंदे भारत रेल्वे गाडीला आज हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी आधी श्रीनगर ते कटरा अशी धावत होती, ती आता जम्मू तावीपर्यंत जाईल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी उपस्थित होते. नवीन मार्गावर गाडी शनिवार पासून धावणार आहे. गाडीचे आधी आठ डबे होते, ते वाढवून वीस करण्यात आले आहेत. या विस्तारित रेल्वेमुळे जम्मू ते श्रीनगर प्रवास पाच तासांच्या आत होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शेतकरी, मजूर, वंचित घटक तसंच दिव्यांग बांधव आणि महिलांच्या सक्षमीकरसाठी धनुष्यबाण हाती घेत असल्याची घोषणा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केली. ते आज मुंबईत बोत होते. काल मांडलेले सगळे मुद्दे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांनी स्वीकारले असून, त्यानंतर पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं कडू यांनी सांगितलं. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यावर भर देणार असून, प्रहार संघटनाही कायम राहील, असं ते म्हणाले.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या निर्णयाचं शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी स्वागत केलं. कष्टकर्यांचा नेता पक्षात येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं सामंत यांनी सांगितलं.

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार उभा करणार असल्याचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

**

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, उपस्थित होते.

****

जलसंवर्धनासाठी राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत काढण्यात आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा काल मध्य प्रदेशात महेश्वर इथं पोहोचली. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर इथून ही यात्रा निघाली होती. महाराष्ट्रातल्या १३० नद्यामधून आणलेलं पाणी मंगलमय वातावरणात मंत्रघोषाच्या जागरात नर्मदेमध्ये विसर्जित करुन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थिती या यात्रेचा समारोप झाला. गोदा ते नर्मदा यात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं अधिक दृढ झालं असल्याचं मुख्यमंत्री यादव यावेळी म्हणाले.

****

जनगणना २०२७ कार्यक्रमासाठी जनतेनं सक्रिय सहभाग घेत पूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन जनगणना कार्यसंचालन आणि नागरिक नोंदणी विभागाच्या संचालक निरुपमा डांगे यांनी केलं आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या विविध योजना आणि धोरण निर्मितीसाठी उपयोगी ठरणार असून, पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोळा मे ते चौदा जून दरम्यान जेव्हा प्रगणक घरोघरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती द्यावी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याबद्दल जागरूक करावं, एक मे ते पंधरा मे मध्ये स्वगणना प्रक्रियेतही सहकार्य करण्याचं आवाहन डांगे यांनी केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी येत्या १५ मे पासून पाणी सोडलं जाणार आहे. यंदा उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचं नियोजन करण्यात आलं असून, गेल्या १६ मार्च आणि १६ एप्रिलला पाणी सोडण्यात आलं होतं. मे अखेरीस हळद पिकाची लागवड करता येऊ शकते त्यामुळे या सिंचनाचा लाभ हळद पिकाला होईल, शेतकर्यांनी ऊन्हाळी पिकांसह ऊस आणि चारापिकांची लागवड करावी, असं आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...