Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २१ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
आज राष्ट्रीय नागरी सेवा दिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री
अमित शाह यांनी आज या दिनाच्या औचित्यानं नागरी सेवेतल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
आहेत. आजचा दिवस हा सुशासन आणि राष्ट्र निर्माणाच्या दिशेनं काम करण्याच्या संकल्पाला
अजून बळकट करण्याचा दिवस आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. यावर्षीच्या या दिनाची
संकल्पना विकसित भारत: नागरिक-केंद्रित शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास',ही आहे.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीए नं जे ई ई मुख्य सत्र
दोनचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत
एकूण दोन लाख पन्नास हजार एकशे ब्याऐंशी विद्यार्थी जे ई ई ॲडव्हान्सड साठी पात्र ठरले
आहेत.
****
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षासाठी विकसित करण्यात आलेल्या
नव्या ऑनलाइन प्रणालीचं उद्घाटन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. cmrf.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरून आता
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑनलाईन कागदपत्रांची तत्काळ पडताळणी
करून उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ आठ तासांत देण्याची प्रणाली
विकसित करण्यात आली आहे. तसंच व्हाटस्
अप आणि एसएमएस द्वारे अर्ज स्थितीचे अपडेट मिळणार आहेत. राज्याततल्या आरोग्यविषयक विविध
योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली
जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत
न राहता, रुग्ण, रुग्णालयं आणि शासन यांना एकत्र आणणारं
प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
संभाव्य एल निनोच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचं सुयोग्य नियोजन करावं, जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल दिले. या परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आढावा
घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. कृषिमंत्री
दत्तात्रय भरणे, कृषि, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष
जयस्वाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. योग्य नियोजन
केलं तर राज्याला या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त
शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामं तातडीनं पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिले. जी रामजी मधून जास्तीत जास्त कामं
मिळवण्यासाठी कृतिदल तयार करावं, पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये यासाठी वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी
दिले.
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्यांचा अतिरिक्त पुरवठा
करण्यासाठी संबंधित संस्थांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं कृषिमंत्री
दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितलं.
****
लहान मुलांशी संबंधित तक्रारींचं निवारण करण्यासाठी
राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना
राज्य बालहक्क आयोगाने दिल्या आहेत. राज्यभरातले पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना
या सूचना लागू आहेत.
****
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार
आज संध्याकाळी संपणार आहे. बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा होणार आहे. राहुरीमध्ये
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ
प्रचार सभा घेतली. राहुरीमध्ये नवीन एमआयडीसी तयार करून या भागातील तरुणांना उद्योग
आणि रोजगार दिला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
****
लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप
नेते माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचं आज सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे
होते. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी लातूर मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार
आहेत. डॉ. गोपाळराव पाटील हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, नामांकित बालरोगतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ
म्हणून ओळखले जात. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवून काँग्रेसचे
नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरुद्ध कडवी लढत दिली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची
दखल घेत भाजपकडून त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती.
****
No comments:
Post a Comment