Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 21 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
महिला आरक्षणासंदर्भात घटनादुरूस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ
सरकारची स्वाक्षरी मोहीम; आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांचं सरकारला खुल्या चर्चेचं आव्हान
·
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी तात्काळ उपाययोजना
राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष बाल कक्ष स्थापन
करण्याच्या सूचना
·
अक्षय्य तृतीयेला १३ पेक्षा अधिक बालविवाह रोखण्यात प्रशासनाला
यश
·
धाराशिव जिल्ह्यात चौदा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित
आणि
·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा डायरेक्ट
टॅक्सेस विषयाचा पेपर फुटला-चार मे रोजी नव्याने परीक्षा
****
महिला आरक्षणासंदर्भात
१३१ व्या घटनादुरूस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची
घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत
होते. यासाठी राज्यात एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्यासह तालुकास्तरापर्यंत जनजागृती
करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकामागची भूमिका मुख्यमंत्र्यांनी विशद केली.
ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिला आरक्षणाला
विरोध करून काँग्रेससह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचा महिला विरोधी चेहरा उघड झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे,
मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
**
दरम्यान, खासदार सुप्रिया
सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले. नारी शक्ती वंदन विधेयक,
२०२३ मध्येच संसदेत एकमतानं मंजूर झालं आहे, आताचं
विधेयक हे महिला आरक्षण नाही तर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं विधेयक होतं,
असं त्या म्हणाल्या.
खासदार
प्रणिती शिंदे आणि खासदार शोभा बच्छाव यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. महिला
आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस पक्ष तयार असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
महिला आरक्षण विधेयक याआधीच मंजूर झालं असून, संसदेच्या ५४३ जागांमधूनच महिला आरक्षण
द्या, अशी मागणी बच्छाव यांनी केली.
****
दरम्यान, नारी शक्ति
वंदन विधेयकात अडथळा आणल्याबद्दल विरोधी पक्षांना परिणामांना सामोरं जावं लागेल,
असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते काल नवी
दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या विधेयकाप्रती सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार
करत, या प्रकरणात सरकार आपले प्रयत्न सुरूच ठेवेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
संभाव्य
एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व
विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. जुन्या जलस्त्रोतांची
दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनावर भर द्यावा, पाणी बचतीसाठी प्रत्येक
जिल्ह्यात स्थानिक स्तरावर कृती दलाची स्थापना करावी, वैरण विकास
कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, खत पुरवठा आणि वितरणावर एआयच्या
माध्यमातून लक्ष ठेवावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
राज्यातल्या
संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनानं व्यापक उपाययोजना आखण्यास
सुरुवात केल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूर
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या अनुषंगाने शासनाची भूमिका आणि उपाययोजना यावर लवकरच
सविस्तर बैठक होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
होर्मुझ
सामुद्रधुनीतून ३१ भारतीय खलाशांसह एक जहाज परवा मुंबईत दाखल होणार आहे. या सामुद्रधुनीत
दोन भारतीय जहाजांवर गोळीबाराच्या घटना घडल्या, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची
माहिती सरकारकडून देण्यात आली.
****
देशातील
एलपीजी पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा
यांनी सांगितलं आहे. देशात व्यावसायिक गॅस पुरवठा सत्तर टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला
असल्याचं सांगत, सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्याला पूर्ण प्राधान्य देण्यात आले असून,
नव्या जोडण्यांमध्ये वाढ झाली असल्याचं शर्मा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या म्हणाल्या…
बाईट- सुजाता शर्मा
****
चालू आर्थिक
वर्षात भारताचा विकास दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के ते सात पूर्णांक एक दशांश टक्के
राहील असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे. २०२५-२६ मध्ये भारताचा विकास दर
सात पूर्णांक सहा दशांश टक्के, महागाईचा दर साडेचार टक्के, तर वित्तीय तूट साडेचार ते चार पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याची शक्यता,
एसबीआयनं या अहवालातून व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातला तणाव आणि तेलाच्या
संकटामुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असल्याचंही
या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
****
लहान मुलांशी
संबंधित तक्रारींचं निवारण करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष बाल
पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना राज्य बालहक्क आयोगाने दिल्या आहेत. राज्यभरातले
पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना या सूचना लागू आहेत. बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये
वाढ होत असून अशी प्रकरणं पोलिसांसह सर्व यंत्रणांनी स्नेहभावाने हाताळण्याचं आवाहन
बैठकीत करण्यात आलं.
****
राज्यात
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे तेरापेक्षा अधिक बालविवाह रोखण्यात यश आलं आहे.
महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल ही माहिती दिली. छत्रपती
संभाजीनगर, परभणी, धाराशिव, रायगड,
बुलडाणा, यवतमाळ तसंच अहिल्यानगर इथं हे विवाह
होणार होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या
मुहूर्तावर होणारे चार बालविवाह रोखण्यात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला यश आलं.
****
धाराशिव
जिल्ह्यात चौदा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून, एक कृषी सेवा
केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आलं आहे. अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात
आली. यात धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातल्या प्रत्येकी एक, उमरगा
चार, भूम तीन, तर परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यातल्या प्रत्येकी दोन कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात
आली.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेची डायरेक्ट
टॅक्सेस विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, आता या विषयाची
परीक्षा चार मे रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात हातनूर
इथल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावरुन या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचं
समोर आलं आहे. संबंधित परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे
आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले आहेत.
****
जालना मर्चंट
को-ऑपरेटीव्ह बँकेतील आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे शाखेनं आणखी तीन आरोपींना काल अटक
केली. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
लातूर जिल्ह्यात
खरीप हंगामासाठी ७५ हजार टनांहून अधिक खत साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी साठवणुकीची
घाई करू नये, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं.
सध्या जिल्ह्यात एकूण ७५ हजार १६७ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी गरजेनुसारच
खत खरेदी करावी असं कृषी विभागानं सांगितलं आहे.
****
परभणी जिल्ह्याचा
आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय काल नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या
विकासकामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत
योजनांमधून प्राधान्याने निधी मिळणार आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात स्वयंचलित दुचाकीचालक आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट
सक्ती, तसंच चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्टचा वापर, बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी हे आदेश
दिले. वाहतूक नियम जनजागृती आणि हेल्मेट सक्ती संबंधी घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यशाळेत
त्यांनी हे निर्देश दिले.
****
धाराशिव
जिल्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करण्यात येत
आहे. यानिमित्त पाटबंधारे विभागामार्फत लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी
पाणी परवाने देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन
करण्यात आलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेची काल सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
या सभेत
१० स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. यामध्ये पाच भारतीय जनता पक्ष, तीन एमआयएम,
शिवसेना एक, तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाच्या एका सदस्याचा समावेश आहे.
****
हवामान
राज्यात
काल सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला आणि वर्धा इथं नोंदवलं गेलं. छत्रपती संभाजीनगर
आणि परभणी इथं सरासरी ४१, तर धाराशिव इथं ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, राज्याच्या
अनेक भागात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये नाशिक
आणि अहिल्यानगरसह मराठवाड्यात लातूर, धाराशिव, जालना, परभणी, बीड, हिंगोली, या जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment