Friday, 24 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील लोकप्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन केले आहे." जनसेवेसोबतच राष्ट्रसेवेसाठी असलेले समर्पण सर्वांना प्रेरणा देणारे आहे," अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पंतप्रधानांनी संस्कृत श्लोकाचा दाखला देत, जनतेच्या सुखातच राज्यकर्त्याचे सुख आणि हित सामावलेले आहे, असे नमूद केले. ग्रामीण भारताच्या विकासात आणि लोकशाहीच्या बळकटीकरणात पंचायत राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंचायत राज दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहे. पंचायत राज ही देशातील सर्वात जुनी व्यवस्था असून तो लोकशाहीचा मुलभूत स्तंभ असल्याचं शहा म्हणाले.

****

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार करत आहेत. आज ते दमदम इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. यानंतर, बारुईपूर इथंही त्यांची एक रॅली नियोजित आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा आज दुपारी हिंगलगंज आणि कोननगर इथं जाहीर सभांना संबोधित करतील तसंच सायंकाळी, जगद्दल विधानसभा मतदारसंघात 'रोड शो'मध्ये सहभागी होतील. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी भवानीपूर इथं प्रचार करतील, तर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आज हावडा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांतील विविध ठिकाणी निवडणूक सभा आणि 'रोड शो'मध्ये सहभागी होतील.

****

केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारमण आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या महाराष्ट्र परिक्षेत्राच्या स्थानिक मुख्यालयाचं उद्घघाटन केलं. देशाच्या विकासात बँकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं सीतारामण यांनी आपल्या भाषणात सांगितलं. डिजिटायझेशन महत्वाचं असून त्यामुळेच सर्वसामावेशकतेला चालना मिळते, पण त्याचसोबत आपण आपल्या ग्राहकांपासून दूर  न जाता व्यवहारातील  मानवी भाव जपायला हवा, असं त्या म्हणाल्या. ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्यात प्रत्यक्ष संवादाचं, संबंधाचं महत्त्व अधोरेखित करताना भारतीय स्टेट बँकेच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.

****

केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७५ लाखांहून अधिक अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या सशक्तीकरणासाठी ७ हजार ९८१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे. केंद्रिय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी ही माहिती दिली. सरकार अनुसुचित जातींच्या विकासासाठी प्रतिबद्ध असल्याचं सांगत या वर्गातील विद्यार्थांसाठी सरकार अनेक नवीन योजना लागू करत असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकार इतर मागास वर्ग, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, सफाई कर्मचारी आणि आर्थिक मागास वर्गासाठी विविध योजना कार्यान्वित करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी आणि सातवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २६ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पार पडणार आहे. यासाठी तब्बल ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून प्रशासनानं नियोजनाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. या परीक्षेसाठी चौथीच्या ३३ हजार ७३० आणि सातवीच्या २६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. चौथीसाठी १८८, तर सातवीसाठी १७० परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी याबाबत माहिती देताना सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं. परीक्षा सकाळी ११ ते साडेबारा आणि दुपारी दोन ते साडेतीन या दोन सत्रात होईल. मराठीसह उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा सात माध्यमांत ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दरमहा ५०० आणि ७५० रुपयांची शिष्यवृत्ती तीन वर्षे दिली जाणार आहे. अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित तसंच, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेस पात्र असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक क्षमतेत वाढ करणं, हा या परिक्षेचा मुख्य उद्देश आहे.

****

क्रिकेट

आयपीएलमध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता राँयल चँलेंजर्स बंगरुळू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियंसचा १०४ धावांनी पराभव केला.

****

डेन्मार्कमध्ये जागतिक बॅडमिंटन महासंघातर्फे आयोजित थॉमस आणि उबर करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सामने आजपासून सुरू होणार आहेत. भारतीय पुरुष संघाचा सामना आज कॅनडाच्या संघाशी होणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, चीन या संघांबरोबर सामना होणार आहे.

****

हवामान

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचिंत वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी, तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

इजिप्तच्या काहिरा इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघातर्फे आयोजित - कनिष्ठ नेमबाजी विश्वकप स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकांसह एकुण नऊ पदक जिंकत पदक तालिकेत पहिलं स्थान प्राप्त केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...