Thursday, 30 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा

·      राज्यात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचं जाळं उभारण्याचा शासनाचा निर्णय

·      बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास, गर्भपातासाठी कालमर्यादा नसावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

आणि

·      ६७ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

राज्य विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. नियमित नऊ आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक, अशा दहा जागांसाठी अर्ज दहा अर्ज भरले गेल्यानं, ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपानं उमेदवारी दिलेले सुनील कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, माधवी नाईक, आणि प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. प्रज्ञा सातव यांनीही आज भाजपाकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज अर्ज भरला.

 

शिवसेनेकडून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

त्यापूर्वी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुन्हा संधी दिली, यासंदर्भात काँग्रेस नेत्यांचं मन वळवण्यासाठी अंबादास दानवे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर वेगळा उमेदवार न देण्याचा निर्णय सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. आगामी सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीमध्ये झाल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

****

राज्यात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचं जाळं उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं  राज्यस्तरीय प्रयोगशाळा तर छत्रपती संभाजीनगरसह अकोला, सोलापूर, धुळे आणि मिरज इथल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून २९ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

****

बलात्कारातून गर्भधारणा झाल्यास, गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नसावी, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. केंद्र सरकारनं कायद्यात आवश्यक सुधारणा करून बलात्कार पीडितांना २० आठवड्यांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याबाबत विचार करावा, असे निर्देश न्यायालयानं दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या पीठासमोर १५ वर्षीय पीडितेच्या ३० आठवड्यांच्या गर्भपाताबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हे मत नोंदवलं. एम्सनं या गर्भपाताला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. गर्भपाताची परवानगी नाकारल्यास पीडितेला जन्मभर मानसिक आघात सहन करावा लागेल, अनपेक्षित मातृत्व कोणावर लादलं जाऊ नये, कायदा हा प्रवाही आणि काळाशी सुसंगत असायला हवा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.  मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन केलं.

मंत्रालयात, तसंच सर्व जिल्हा मुख्यालयांमधे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी ही समाजमाध्यमावरच्या संदेशातून तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.

छत्रपती संभाजीनगर मनपा मुख्यालयात स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या हस्ते तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

बुद्ध पौर्णिमा उद्या साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. हा पवित्र दिवस भगवान बुद्धांचे पृथ्वीवरील आगमन, त्यांना मिळालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या ऐतिहासिक घटनांचे प्रतीक आहे. त्या म्हणाल्या की, त्यांचे करुणा, अहिंसा, शांती आणि ज्ञानाचे शाश्वत संदेश संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत राहतील.

****

६७ वा महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी आठ वाजता पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज आढावा बैठक घेतली.

लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा बाभळगाव इथल्या पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता  होणार आहे.

नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता  वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर ध्वजवंदन आणि  संचलन समारंभ होणार आहे.

जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. जालना जिल्हा निर्मितीला उद्या १ मे रोजी  ४५ वर्ष पूर्ण होत आहेत,यानिमित्त आयोजित 'रायझिंग जालना' या कार्यक्रमाचे उद्घाटनही पालकमंत्री मुंडे यांच्या  हस्ते होणार आहे. अग्रसेन भवन इथं होणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी १० ते १ दरम्यान सांस्कृतिक आणि औपचारिक कार्यक्रम, तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या इतिहासाचा गौरव करत उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा उद्देश असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे.

 

धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

 

उद्या महाराष्ट्र् दिनाला यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मिसिंग लिंक हा जगातील सर्वात रुंद बोगदा आहे,या लिंकमुळे हा देशातला  पहिला अधिक वेगवान आणि सुरक्षित एक्सप्रेस-वे असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

****

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचं लोकार्पण आणि मराठवाड्यातील बीडसह ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तारही उद्या केला जाणार आहे. नांदेड, धाराशिव, हिंगोली,परभणीसह भंडारा, बुलढाणा, अमरावती  या सात जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय सेवा सुरू होणार आहेत.

****

 

नवव्या नेपाळ आंतरराष्ट्रीय समीक्षक चित्रपट महोत्सवामध्ये बीडच्या प्रभातकुमार होळकर याला 'भुरळ डोळ्यांची' या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलक आणि उत्कृष्ट बालकलाकार हे दोन पुरस्कार मिळाले. याच चित्रपटासाठी मीनाक्षी होळकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सन्मानीत करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा विहित वेळेत करण्यासाठी कालमर्यादा पाळावी, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. नवीन पाणीपुरवठा योजने संदर्भात न्यायालयात उपस्थित विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक, आज पार पडली, त्यावेळी आयुक्तांनी हे निर्देश दिले. प्रकल्प कंत्राटदारांची देयके पडताळणीनंतर प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्रीकांत यांनी यावेळी केल्या.

****

नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातील करखेली शिवारात निशांत कदम याच्या शेतातून पोलिसांनी १ लाख ४३ हजार रुपये किमतीचा ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी कदम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

****

नांदेड महापालिकेच्या १ हजार ४२४ कोटीं रुपयांच्या अर्थसंकल्पास आज  स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रशासनाने सादर केलेल्या १३०७ कोटी रुपयांच्या प्रशासकीय अर्थसंकल्पात ११७ कोटी रुपयांची वाढ करून विशेष अर्थसंकल्पीय सभेत सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

****

सामुआ इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकं मिळवले.६९ किलो वजनी गटात बेलाना हरिका हिने १९७ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तर कारंगी तरंगिनी भूमिका मोहिते,अभिषेक निपाणे यांनी आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं जिंकली.

****

परभणी जिल्ह्यातल्या निम्न दुधना प्रकल्पातून कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी येत्या १५ मे पासून पाणी सोडलं जाणार आहे. यंदा उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचं नियोजन करण्यात आलं असून, गेल्या १६ मार्च आणि १६ एप्रिलला पाणी सोडण्यात आलं होतं. मे अखेरीस हळद पिकाची लागवड करता येऊ शकते त्यामुळे या सिंचनाचा लाभ हळद पिकाला होईल, शेतकर्यांनी ऊन्हाळी पिकांसह ऊस आणि चारापिकांची लागवड करावी, असं आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...