Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 April
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
धोरणकर्त्यांमध्ये महिला
वर्गाचा समावेश करणं ही काळाची गरज-नारीशक्ती वंदन विधेयकावरच्या चर्चेत
पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
मतदारसंघ पुनर्रचना तसंच
केंद्रशासित प्रदेश विधेयकाला काँग्रेसचा विरोध
·
विद्यार्थ्यांनी वैयक्तिक
प्रगतीसोबतच विकसित भारतासाठी योगदान द्यावं-राष्ट्रपतींचं आवाहन
·
राज्य विधान परिषदेच्या नऊ
जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान
·
नांदेड शहरात चार शाळकरी
मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
·
छत्रपती संभाजीनगरचे
विभागीय आयुक्त म्हणून जी श्रीकांत यांची नियुक्ती
****
देशाच्या लोकसंख्येचा ५० टक्के हिस्सा असलेल्या महिला
वर्गाचा धोरणकर्त्यांमध्ये समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या महत्त्वाच्या घटनात्मक
सुधारणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन कालपासून सुरु
झालं, या विधेयकावरच्या चर्चेत पंतप्रधान बोलत होते.ते म्हणाले…
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पॅकेज-लोकसभा
कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसद आणि
राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेलं संविधान १३१ वी दुरुस्ती
विधेयक २०२६,
आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक २०२६ सादर केलं. तर केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक २०२६ लोकसभेत
सादर केलं.
महिलांना संसदीय प्रणालीत बरोबरीचं स्थान देणारं हे विधेयक
देशाची दशा आणि दिशा निश्चित करेल, असा विश्वासही
पंतप्रधानांनी व्यक्त केला.. ते म्हणाले…
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, काँग्रेसचे खासदार
के.सी. वेणुगोपाल यांनी मतदारसंघ पुनर्रचना तसंच केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा, ही विधेयकं मांडण्यास विरोध केला. या विधेयकांमुळे देशाच्या संघराज्यीय रचनेला
धक्का पोहोचेल,
असा आरोप त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश
यादव यांनी ही विधेयकं इतक्या घाईघाईने आणण्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
केले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी, नारीशक्ती
वंदन विधेयकासह दुसरी दोन विधेयकं आणण्याच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. त्या
म्हणाल्या..
बाईट- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी
गृहमंत्री अमित शाह यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं. या
विधेयकांमुळे संसदीय लोकशाहीला काहीही धोका नसून, दक्षिणेकडच्या राज्यांत लोकप्रतिनिधींचं प्रमाण वाढणार असल्याकडे शहा यांनी
सदनाचं लक्ष वेधलं. ते म्हणाले…
बाईट- केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा
तत्पूर्वी, सभागृहाचं कामकाज सुरू होताच ज्येष्ठ
गायिका आशा भोसले यांच्यासह तीन दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यामध्ये अबू हासेम खान चौधरी, मोहसिना किडवाई आणि हरी नारायण राजभर
यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यसभेत काल विनोद तावडे, नितीन
नबीन, अभिषेक मनु सिंघवी,
यांच्यासह नवनिर्वाचित १४ सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
महिला आरक्षण विधेयक २०२३ साली संसदेत मंजूर झालेलं असून, त्यानुसार
३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा, अशी मागणी शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत
माध्यमांशी बोलत होते. मतदारसंघ पुनर्रचना
हा एक व्यापक,
राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणूनच
त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणं आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देश आत्मनिर्भर
करण्यासाठी आणि विकसित भारतासाठी योगदान द्यावं, असं आवाहन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
हिंदी विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून
बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकं प्रदान
करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असल्याबद्दल त्यांनी समाधान
व्यक्त केलं.
दरम्यान, राष्ट्रपतींनी काल सेवाग्राम आश्रमाला
भेट दिली. या भेटीत त्यांनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई केली, प्रार्थना
सभेत सहभाग घेतला तसंच वृक्षारोपण केलं.
****
राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी १२ मे रोजी मतदान
होणार आहे. निवडणूक आयोगाने काल विधानपरिषदेचा द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम
जाहीर केला. या निवडणुकीसाठी २३ ते ३० एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता
येतील. २ मे रोजी अर्जांची छाननी होईल, ४ मे पर्यंत अर्ज मागे घेता
येतील. आणि १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
****
पुण्यात ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल
सायन्सेस’च्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन काल पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
डॉ. मोहन भागवत यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा
मंगेशकर आणि आनंद भोसले यावेळी उपस्थित होते. पुण्याजवळ नांदोशी इथं ही संस्था
उभारण्यात येणार आहे.
****
नांदेड शहरात देगलूर नाका भागात एका खड्ड्यात साचलेल्या
पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. आठ ते अठरा वयोगटातली ही मुलं शाळा
सुटल्यानंतर घरी जात असतांना, या साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरली, मात्र
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची
अधिक चौकशी सुरू आहे.
****
राज्यशासनाने काल सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून जी श्रीकांत यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असलेले जितेंद्र पापळकर यांची मुंबईचे वस्तू
आणि सेवा कर –जीएसटीचे सहआयुक्त म्हणून तर छत्रपती संभाजीनगर इथले सिडकोचे मुख्य
प्रशासक जगदीश मिनियार यांचीही पुणे इथं महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त
म्हणून बदली करण्यात आली आहे.
****
लातूर इथं काल जुन्या एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
लागली. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त
केला आहे. या भीषण आगीत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा
कामगार गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती संभाजीनगरात पर्यटकांच्या सोयीसाठी पुढच्या आठ
दिवसांत विशेष 'पर्यटन हेल्प डेस्क'
कार्यान्वित करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी
दिले आहेत. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या हेल्प डेस्कसाठी शहरात
योग्य जागेचा शोध घेऊन,
तिथे पर्यटन विभागामार्फत विशेष प्रशिक्षित गाईड्सची
नियुक्ती केली जाणार आहे. ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वस्तूंच्या जतनासाठी
महानगरपालिकेतर्फे तातडीने एक सुसज्ज 'संवर्धन प्रयोगशाळा' विकसित
करण्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा कायापालट
करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात तेर इथल्या संत गोरोबा यांच्या समाधी
मंदिरातील ओवरीच्या कामांसाठी राज्य शासनाने तीन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल तुळजापूर इथं ही माहिती दिली.
दरम्यान, कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त आणि
समुद्राला वाहून जाणारं ५० अब्ज घनफूट पाणी, मराठवाड्याकडे वळवण्याच्या
योजनेला गती मिळणार आहे. या प्रकल्पाचा 'व्यवहार्यता अहवाल' सकारात्मक
आल्यानंतर,
मुख्यमंत्र्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश
दिल्याची माहिती,
आमदार पाटील यांनी दिली.
****
बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या
माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे एक हजार ७७३ रुग्णांना सुमारे १३ कोटी ६९
लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
****
हवामान
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची
शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment