Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
· भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· राज्यशासनाकडून महसूल विभागासाठी
३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर
· छत्रपती संभाजीनगर इथं एलपीजी चोरीचं रॅकेट उध्वस्त-सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त;दोघांना अटक
· येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात चुनखडी सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा
आणि
· ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत
महाराष्ट्राच्या संघाची ४ सुवर्णपदकांसह लक्षणीय कामगिरी
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव
न राहता विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. येत्या १४ एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त
पूर्वतयारीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत आज ते बोलत होते. समाजाला मिळणाऱ्या
संधी,
हक्क आणि प्रगती यामागे कोणाचं योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी
नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात
यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
****
राज्य शासनाने महसूल विभागासाठी ३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. महसूल मंत्री तथा नागपूरचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते आज नागपुरात प्रसार माध्यमांशी
बोलत होते. या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं, आठ नवीन एसडीओ कार्यालयं, दोन नवीन तहसीलदार कार्यालयं, तर ६९ अप्पर तहसीलदार कार्यालय तयार होतील, असं
बावनकुळे यांनी सांगितलं.
****
राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भोंदू बाबा-बुवांबाबत स्पष्ट आणि कडक आचारसंहिता
जाहीर करावी,
असा ठराव नाशिक इथे पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समितीच्या संघर्ष परिषदेत आज करण्यात आला. परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते डॉ.
डी. एल. कराड यांच्या हस्ते झालं, अशोक खरातकडे जाणारे आमदार तसंच
मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून, संबंधित
अधिकाऱ्यांचेही राजीनामे घ्यावेत, अशी मागणी कराड यांनी केली.
तर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी खरात प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा
केला जाईल,
आणि आगामी काळात बुवाबाजीविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल, असं स्पष्ट केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उध्वस्त
करण्यात आलं असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधावाटप नियंत्रक
आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं काल गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई
केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं
गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली, या
कारवाईत एकूण ३५ हजार २२० किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती
वापराचे एकूण २६ सिलिंडर्स असा सुमारे एक कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला. सुमारे अडीच हजार कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, एवढ्या
गॅसचा काळाबाजार या ठिकाणी सुरू असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी
तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश
दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी यासंदर्भात
राज्यांना पत्र पाठवलं आहे.
****
गुडफ्रायडे निमित्त आज येशू ख्रिस्तांचं स्मरण केलं जात आहे.
देशभरातल्या चर्चेसमधे विशेष प्रार्थना सभांचं आयोजन केलं जात आहे. गुडफ्रायडेच्या
निमित्ताने प्रेम, करूणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्तांच्या
संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आपल्या संदेशात
म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात सर्वांमधे करूणा आणि क्षमाशीलता
हे गुण वाढीस लागो अशी प्रार्थना केली.
****
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या
रक्षणासाठी लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना
अभिवादन केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र
पौर्णिमा उत्सवात आज चुनखडी वेचण्याचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. डोंगरावरून निघालेली देवीची पालखी दुपारी आमराईमध्ये
दाखल होताच,
जमलेल्या हजारो भाविकांनी वेचलेल्या चुनखडीची पालखीवर उधळण केली, यावेळी पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, भाविकांच्या गर्दीमुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ थांवली
होती.
दरम्यान, श्री क्षेत्र तुळजापूर इथे श्री
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात श्री चैत्र पौर्णिमा उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला छबिना
आज रात्री निघणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या
दर्शनासाठी तुळजापुरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
****
‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी
रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या ‘इंडिया स्किल्स २०२५-२६’ स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य
आणि ५ कांस्यपदक अशी एकूण १७ पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेश मधल्या ग्रेटर नोएडा
मध्ये ही स्पर्धा पार पडली. या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचं आणि विजेत्याचं
अभिनंदन केलं आहे.
चीनमधील शांघाय इथं सप्टेंबर मध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची
पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.
****
परभणी इथे विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचं आज जिल्ह्याच्या
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दैनंदिन कामाचा ताण-तणाव हलका होण्यासाठी तसंच मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी प्रत्येकाने खेळ अवश्य खेळावा, असं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, यांच्यासह विविध
जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. परभणी
इथं कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळयात विविध क्रीडा
स्पर्धा होणार आहेत.
****
बीड शहरासाठी २०१७ मध्ये मंजूर झालेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या
कामांचा,
आमदार विजयसिंह पंडित यांनी आज जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून
आढावा घेतला. गंभीर अनियमितता आणि कामातील दिरंगाई, कंत्राटदाराचा
बोगसपणा उघड झाला असून ही बाब समोर आल्यानंतर त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश
दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी
सी यांनी आज मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून पदभार स्वीकारला. छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या
सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगीण विकास
करण्यासाठी आपण काम करु असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
अजिंठा लेणी परिसरात आज मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत सुमारे ८२ पर्यटक
जखमी झाले. गेल्या दोन महिन्यांतली ही सहावी घटना आहे. लेणी परिसरात मधमाशांची सुमारे
१३ पोळी असून,
ती स्थलांतरित करावी, तसंच
प्रशासनानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी
मागणीही करण्यात येत आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे यांनी आज जिल्ह्यातील मौजे पाथरे इथे
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पाऊस, गारपीट तसंच वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि
अन्य नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल
सादर करावेत,
असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
****
धुळे जिल्ह्यात काल सायंकाळी आणि रात्री जोरदार पाऊस झाला. या
अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान केलं असून त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना
तत्काळ मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग
चौहान यांची भेट घेत केली आहे.
****
No comments:
Post a Comment