Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
आजपासून नवीन आयकर कायद्याची अंमलबजावणी, बँकांकडून
डिजिटल पेमेंटसाठीच्या निकषांमध्येही बदल
·
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दरात वाढ नाही, महसूलमंत्र्यांची
माहिती
·
राज्य शासनाच्या, ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न
गाव’ अभियानाला आजपासून प्रारंभ
·
जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात, नागरिकांना
स्व-नोंदणी पोर्टलद्वारे माहिती देण्याची सुविधा
आणि
·
मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा
****
नवीन आर्थिक
वर्ष आजपासून सुरु झालं असून, काही आर्थिक नियमांमध्ये बदलांसह अनेक
सुधारणा लागू होत आहेत. सहा दशकांहून अधिक जुन्या असलेल्या आयकर कायद्याची जागा आजपासून
नवीन 'आयकर कायदा, २०२५' घेणार आहे. कालबाह्य तरतुदी रद्द करून, गुंतागुंतीचे
नियम सुलभ करून आणि करदात्यांसाठी नियमांचं पालन करणं अधिक सोपं करून, करप्रणाली सुलभ करण्याच्या उद्देशानं हा कायदा तयार करण्यात आला आहे. २०२६–२७
च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कायद्याची घोषणा
केली होती.
भारतीय
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, आजपासून देशातल्या सर्व डिजिटल पेमेंट
व्यवहारांसाठी, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अर्थात द्वि-स्तरीय प्रमाणीकरणाचे
निकष पूर्ण करणं अनिवार्य असेल. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी फास्टटॅग वार्षिक पासचं सुधारित
शुल्क देखील आजपासून लागू होत असून, पॅन कार्ड साठी अर्ज करण्याबाबत
किंवा त्यातील माहिती अद्ययावत करण्याबाबतचे सुधारित नियमही अंमलात येणार आहे.
या सुधारित
नियमांबाबत अधिक माहिती देत आहेत छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल मोहित अग्रवाल,
बाईट – मोहित अग्रवाल
****
नवीन आर्थिक
वर्षात राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने
घेतला आहे. त्यामुळे आजपासून लागू होणारे दर पूर्वीप्रमाणेच राहतील, अशी माहिती
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दर जैसे थे असले तरी वार्षिक मूल्यदराच्या
तक्त्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अनेक बदल केले आहेत. यामध्ये मंजूर प्रादेशिक आणि
विकास योजनांची अंमलबजावणी, नवीन सर्व्हे नंबरची नोंद आणि गहाळ
गावं किंवा गावांच्या नावातल्या दुरुस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
राज्य शासनाच्या, ‘माझं गाव,
आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे. ग्रामीण जनतेला
दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात
येणार आहे. गाव पातळीवर आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट निकष ठरवण्यात आले
असून, या निकषांच्या आधारे ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या
गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. या संपूर्ण अभियानासाठी
राज्य सरकारनं ८० कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
छत्रपती
संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी या अभियानाबाबत अधिक माहिती
दिली. ते म्हणाले,
बाईट – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर
****
जनगणनेची
प्रक्रिया आजपासून सुरू होत असून, नागरिकांना स्व-नोंदणी पोर्टलद्वारे दोन्ही
टप्प्यांत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक घराची
माहिती गोळा केली जाईल. त्यात घराचा क्रमांक, मजला, घराची स्थिती आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या अशा माहितीचा समावेश असेल.
या प्रक्रियेत कुटुंबप्रमुखाचं नाव, लिंग, जात, मालकी हक्क, तसंच घरातील विवाहित
जोडप्यांची संख्या आणि वाहनांची माहितीही नोंदवली जाणार आहे.
****
पंचायती
राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १५व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार
केंद्र सरकारनं निधी वितरित केला आहे. याअंतर्गत महाराष्ट्राला २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात १०९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित झाली आहे. या अनुदानामुळे
गावपातळीवर प्रशासन अधिक सक्षम होईल आणि गरजेनुसार विकासकामं राबवता येतील.
****
भारत केवळ
बदलाचा साक्षीदार नसून, तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षेसाठी मजबूत पाया घालणारा देश बनत
असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
गुजरातमधल्या साणंद इथं काल केन्स सेमिकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत
होते. भारत सरकार एक परिपूर्ण सेमिकॉन परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न करत असून,
देशाला गरज असलेल्या चिपपैकी जास्तीत जास्त चिप भारत स्वदेशात बनवेल,
असं सांगून पंतप्रधानांनी, यावर्षीच्या अर्थसंकल्पातल्या,
सेमिकॉन व्हिजन टू घोषणेचा उल्लेख केला.
****
३० लाख
रुपयांचं बक्षीस असलेल्या नऊ नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारताचं संविधान देऊन त्यांचं समाजाच्या मुख्य प्रवाहात
स्वागत केलं. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधल्या इंद्रावती क्षेत्रिय
समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते. सध्या गडचिरोली जिल्ह्यात सहा
सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असून, त्यांनी आत्मसमर्पण करावं, अन्यथा सशस्त्र कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा
नीलोत्पल यांनी दिला.
****
जैन तीर्थंकर
भगवान महावीर यांची जयंती काल देशभरात उत्साहात साजरी झाली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध
धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांसह शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं.
**
छत्रपती
संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत, माझे शहर, माझी
जबाबदारी, या उद्घोषणेवर आधारित देखावे सादर करण्यात आले. पर्यावरण
संवर्धन, स्वच्छता आणि एकतेचा संदेशही यावेळी देण्यात आला.
जालना शहरात
काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सुमारे आठ हजार शुभ्रवस्त्रधारी समाजबांधव सहभागी झाले
होते. यामधल्या अहिंसा परमो धर्म, जिओ और जीने दो, या घोषणांमुळे आणि जागोजागी होणा-या पुष्पवृष्टीमुळे या शोभायात्रेला भव्य
सोहळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
हिंगोली
शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत नागरीकांसह बालगोपाळही मोठ्या संख्येनं सहभागी
झाले होते.
बीड इथंही
सकल जैन समाजतर्फे भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान असलेल्या रथाची शहरातून फेरी, रक्तदान,
दंतचिकित्सा आणि फिजिओथेरपी शिबिरं, यासह विविध
धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
****
मुख्यमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी १०० टक्क्यांहून
अधिक कामगिरी करणारा एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याला
देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत एक हजार सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली
आहे. यामुळे जिल्ह्याने १२९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या
गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथल्या ऐतिहासिक गुप्तेश्वर मंदिराच्या जतन आणि दुरुस्ती
कामांसाठी राज्य शासनानं तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता
दिली आहे. नव्यानं मिळालेल्या या निधीमुळे संवर्धनाची अपूर्ण कामं पूर्ण होण्याला मदत
होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर इथं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या धनगर समाजातल्या लोकप्रतिनिधींचा
तसंच स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा काल विधान परिषदेचे सभापती
राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनियुक्त राज्यसभा खासदार रामराव वडकुते
यावेळी उपस्थित होते.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या
यावर्षीच्या उन्हाळी परीक्षांसाठी अर्ज सादर करण्याला चार एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. RTGS द्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख सहा एप्रिल निश्चित करण्यात
आली आहे.
****
लातूरच्या
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लिखित ‘फायलींच्या पलीकडे’, या पुस्तकाचं
प्रकाशन काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते झालं. प्रशासनात
काम करताना आलेले अनुभव, भेटलेली माणसं आणि त्यांच्या आयुष्यातील
जिवंत कथा यांना स्पर्श करणारं हे पुस्तक, वाचकांना भावनिक आणि
प्रेरणादायी प्रवास घडवणारं ठरणार असल्याचं मत, उपस्थित मान्यवरांनी
व्यक्त केलं.
****
मराठा सेवा
संघाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे हरीभक्त परायण मधुकर महाराज बारूळकर यांचं
काल अपघाती निधन झालं. नांदेडहून बारुळकडे दुचाकीवर जात असताना त्यांना एका हायवा ट्रकने
धडक देऊन हा अपघात झाला.
****
राज्यात
पुढील चार दिवस मराठवाड्यासह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस
गारपीट होण्याचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment