Saturday, 25 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त; ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला प्रारंभ

·      वाढत्या सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सर्व नियामक संस्थांनी सज्ज राहण्याचं अर्थमंत्र्यांचं आवाहन

·      नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

आणि

·      जागतिक हिवताप दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं जनजागृती फेरी

****

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला आज त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अहिल्याबाई होळकर यांनी बारव, तलाव, घाट बांधून जलसंधारणाचं मोठं कार्य केलं, त्यांचा विचार आणि वारसा घेऊन या यात्रा काढल्या आहेत, असं फडणवीस यावेळी म्हणाले. कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी नदी निर्मळ वाहायला हवी, त्र्यंबकेश्वर मध्ये ती बारमाही वाहायला हवी, यासाठी शासन व्यवस्था करत आहे. हा ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा उपक्रम यशस्वी होईल, आणि जलसंधारणाची कामं लोकसहभागातून पूर्ण करू, अशी हमी त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत ही कामं अधिक वेगाने होतील असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. या अनुषंगाने सर्व आखाड्यांच्या महंतांशी चर्चा करणार असून, लवकरच यासाठी बैठक घेण्यात येईल असंही ते म्हणाले.

दरम्यान, ‘गोदा ते नर्मदा’ या यात्रेच्या दुसऱ्या तुकडीने अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी इथून यात्रेला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. ही यात्रा मध्यप्रदेशात महेश्वर पर्यंत जाणार आहे.

****

राज्यातल्या भटके-विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची स्थापना केल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकाद्वारे दिली. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावरच्या या समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्तांच्या तक्रारींचं निवारण तातडीने केलं जाईल, त्वरित कारवाई केली जाईल तसंच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं सावे म्हणाले. या तक्रारींचं निवारण वेळेत व्हावं यासाठी स्पष्ट कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. प्राप्त तक्रारींवर १० दिवसांत कार्यवाही सुरू करणं बंधनकारक असेल. उपविभाग किंवा जिल्हा स्तरावर कार्यवाही न झाल्यास नागरिकांना राज्यस्तरीय समितीकडे दाद मागता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

वाढत्या सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सेबीसह सर्व नियामक संस्थांनी सज्ज राहावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. मुंबईत आज सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशातला एखादा शेअर बाजार, शेअर दलाल किंवा संबंधितांवर सायबर हल्ला झाला, तर त्यामुळे होणारं नुकसान भरून यायला मोठा काळ जाऊ शकतो. त्यामुळे सायबर हल्ले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नियामक संस्थांनी मजबूत यंत्रणा तयार करावी, अशी सूचना त्यांनी केली. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांना वारंवार केवायसी करावं लागू नये यासाठी देशातल्या सर्व वित्तीय नियामकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं.

गुंतवणूकदारांमध्ये जागृती करण्यासाठीच्या सेबीच्या अभियानाचा प्रारंभ यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. देशातले सर्व शेअर बाजार, म्युच्युअल फंड संघटना आणि इतर संस्थांच्या मदतीनं हे अभियान राबवलं जाणार आहे.

****

नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनानं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. यात सदस्यपदी राजीव गौबा, प्रा. के. व्ही. राजू, प्रा. गोवर्धन दास, प्रा. अभय करंदीकर आणि डॉ. एम. श्रीनिवास यांची निवड झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहिरी यांच्यासह इतर सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणातील लाहिरी यांचा समृद्ध अनुभव भारताच्या सुधारणा प्रवासाला आणि ‘विकसित भारत’च्या ध्येयाला नवी गती देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नीती आयोग भारताच्या धोरण-निर्मिती रचनेत एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे, जो सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन देतो, सुधारणांना पुढे नेतो आणि ‘जीवनसुलभते’ला चालना देतो. हे विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेष आणि दीर्घकालीन धोरणात्मक विचारांसाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १३३ वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, एआयआर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे.

****

जनगणना २०२७ साठी १-८-५-५ हा राष्ट्रीय निःशुल्क मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा क्रमांक वापरता येणार आहे. या क्रमांकावरून गृहसूची आणि गृहगणना प्रक्रियेबाबत इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमधून मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाईल. जनगणनेच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यात नागरिकांना सुलभतेनं सहभाग घेता यावा, आणि त्यांच्या शंकांचं निरसन करता यावं या उद्देशानं ही सुविधा सुरु केली गेली आहे.

****

बीड जिल्ह्यात आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आज आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच ५ लाख लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या रुग्णांना वेळेत, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीश सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे यावेळी उपस्थित होते.

****

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान येत्या मंगळवारी २८ तारखेला मुंबईत द्वितीय सेवा हक्क दिननिमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

****

जागतिक हिवताप दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती फेरी काढण्यात आली. क्रांती चौकातून सुरु झालेल्या या फेरीची सिद्धार्थ उद्यानात सांगता झाली. यावेळी हिवताप निर्मुलनात ऊत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी मलेरिया आणि इतर किटकजन्य आजारांपासून बचावासाठी शपथ घेतली.

****

लातूर तालुक्यात, भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मॅपिंग मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीतील सर्व मतदारांची पडताळणी केली जाणार असून, यासाठी लातूर तालुक्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी अधिकारी दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत उपलब्ध राहतील, तसंच इतर वेळी ते मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट देणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन शिक्षण संस्थेत येत्या सोमवारी २७ एप्रिल रोजी संविधान जागर अभियानाच्या समारोप केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रशालेच्या प्रांगणात सायंकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी खुला असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.

****

वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरता उद्या २६ तारखेला राज्यात निवडणूक होणार आहे.

****

हवामान

पुढचे दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यात परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...