Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
नारी शक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी
संसदेचं आजपासून विशेष अधिवेशन
·
वैद्यकीय सेवा क्षेत्रात नैतिक मूल्यांचं स्थान सर्वतोपरी-राष्ट्रपतींचं
प्रतिपादन
·
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं
आवाहन
·
अमरावती लैंगिक छळ प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना
आणि
·
राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, हिंगोलीत
उष्माघाताचा बळी
****
नारी शक्ती
वंदन अधिनियम विधेयकातल्या दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन
सुरु होत आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. महिला आरक्षण
विधेयक समतोल असून प्रत्येक राज्याच्या, समुदायाच्या आणि प्रदेशाच्या आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी समर्थ असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांनी एकमताने हे विधेयक संमत
करण्याचं आवाहन रिजीजू यांनी केलं. ते म्हणाले:
बाईट – संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू
या विधेयकामुळे
महिलांना संसद आणि राज्य विधानसभांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण लागू होणार आहे. १८ तारखेपर्यंत
चालणाऱ्या या विशेष सत्रात, हे विधेयक लोकसभेत आज मांडलं जाईल, त्यावर
अठरा तास चर्चा अपेक्षित आहे, तर राज्यसभेत दहा तासांची चर्चा
ठेवण्यात आल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
****
देशाच्या
विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित
राष्ट्र होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. मुंबईत काल नारीशक्ती विचार मंच आयोजित ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलनात’
ते बोलत होते. नारीशक्ती वंदन विधेयकामुळे भविष्यात देशातल्या महिलांच्या राजकीय,
सामाजिक आणि आर्थिक गोष्टीत ऐतिहासिक बदल घडणार असून, संसद आणि राज्य विधिमंडळात मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी निवडून येतील.
त्यामुळे महिलांच्या विकासाला आणि नेतृत्वाला नवी गती मिळेल, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी, नारीशक्ती वंदन विधेयकाद्वारे
परिवर्तनासाठी सर्वांनी एकजुटीने पाठिंबा द्यावा, असं आवाहनही
केलं.
****
वैद्यकीय
सेवा क्षेत्रात नैतिक मूल्यांचं स्थान सर्वतोपरी असून, तो मानवतेची
सेवा करण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.
नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सचा दुसरा दीक्षांत समारंभ काल
राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत
होत्या. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात
करण्याचं आवाहन त्यांनी स्नातकांना केलं. नागपूर एम्सने थोड्याच कालावधीत आरोग्य,
शिक्षण आणि संशोधनात प्रगती साधल्याचं त्या म्हणाल्या. आयुषमान भारतसह
केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांचा राष्ट्रपतींनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या
म्हणाल्या…
बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
दरम्यान, प्रत्यक्ष
कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या
समारोप सोहळ्यालाही राष्ट्रपती काल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
****
जलसंवर्धन, नैसर्गिक
शेती ते तंदुरूस्ती आणि सेवा अशा नऊ क्षेत्रांच्या विकासासाठी नागरिकांनी समर्पण भावनेतून
प्रामाणिकपणे काम करावं, म्हणजे विकसित भारत ही संकल्पना सत्यात
उतरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात
नागमंगला इथं आदिचुंचनगिरी महासंस्थान मठातल्या मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर ते काल
बोलत होते. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावं, तसंच
नागरिकांनी आपल्या भोजनातून तेलाचं प्रमाण किमान दहा टक्के कमी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं, ते म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
राज्यातलं
सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्तावित सहकार धोरण,
सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणारं तसंच विश्वासार्ह असेल,
अशी ग्वाही, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी
दिली. काल मुंबईत सहकार धोरणातील बदलांच्या अनुषंगाने गठित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत
ते बोलत होते. राज्य सहकारी बँकेत झालेल्या या बैठकीत सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात
सविस्तर आढावा घेण्यात आला.
****
अमरावती
इथं अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना
करण्यात आली आहे. परतवाडा भागात घडलेल्या याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाझ याच्यासह
एकूण चार जणांना अटक केली आहे. त्यांनी सुमारे १८० अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात
फसवून त्यांचं आक्षेपार्ह चित्रीकरण केलं, त्याच्या आधारे या मुलींना ब्लॅकमेल करून
वेश्याव्यवसायात ढकललं असा आरोप आहे.
दरम्यान, अचलपूर नगरपरिषदेनं
आरोपीच्या घराचं अवैध बांधकाम काल जमीनदोस्त केलं. या घटनेच्या निषेधार्थ काल अचलपूर-परतवाडा
शहरातली बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णयाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईचा दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. परीक्षा
दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींचं
प्रमाण सुमारे ९५ टक्के तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सुमारे ९२ टक्के असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
एसटी महामंडळाचा
आर्थिक तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीत बोलत होते. महामंडळाचं
दैनंदिन सरासरी उत्पन्न साडे ३१ कोटी रुपये असताना, खर्च ३३ कोटी रुपये
इतका असून दररोज सुमारे दीड कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून
दिलं. लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबवण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.
****
हिंगोली
जिल्ह्यात औंढा इथं काल एका अपघातात दोन युवक ठार तर एक जण जखमी झाला. खांडेश्वरी देवी
मंदिराजवळ मालवाहू छोटी गाडी आणि मोटार सायकलची धडक होऊन, हा अपघात
झाला.
****
बाळासाहेब
ठाकरे नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात काल अपघात होऊन सहा जण जखमी
झाले. केळीगव्हाण शिवारात आयशर आणि खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या धडकेनंतर
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं कालपासून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धेला प्रारंभ
झाला. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज-एआययू आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ यांच्या
संयुक्त विद्यमाने या चार दिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. काल धुळे-सोलापूर
महामार्गावर झाल्टा फाटा इथं मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला
उत्साहात सुरूवात करण्यात आली.
****
नारीशक्ती
वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ काल हिंगोली शहरातील मुख्य मार्गावरुन पदयात्रा काढण्यात
आली. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांभाळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या
पदयात्रेत स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
****
हिंगोली
इथं उष्माघाताने एका तरुणाचा मृत्यू झाला. हिंगोली इथल्या बसस्थानकावर सापडलेल्या मृतदेहावर
शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. शेख रफिक शेख उस्मान असं मृत तरुणाचं नाव असून, तो जवळा इथला
रहिवाशी होता.
**
दरम्यान, राज्यात पुढील
काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी,
हिंगोली या जिल्ह्यांत आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची दाट शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे.
राज्यात
काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं ४२, तर छत्रपती
संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
विविध भागांमध्ये
तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केलं आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर
पाणी आणि ओआरएस घ्यावं, हलके आणि सैल कपडे वापरावेत तसंच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा
वापर करावा, दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणं टाळावं,
मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेये टाळावीत, असंही यासंदर्भातल्या
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
शेतकरी
बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने सर्व कामं वेळेत आणि
प्रभावीपणे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सुरेश धस यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात
आष्टी तहसील कार्यालयात काल खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment