Wednesday, 1 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभेत आज परकीय योगदान नियमन सुधारणा विधेयक, २०२६ आणि  जन विश्वास सुधारणा आणि तरतुदी विधेयक २०२६ वर चर्चा नियोजित होती. कामकाजाला सुरुवात होताच अशासकीय संस्थांना परदेशातून मिळणाऱ्या निधीसंदर्भातील तरतुदींना आक्षेप घेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं लोकसभेचं कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. १२ वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरु करण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला.

दरम्यान, राज्यसभेत आज केंद्रीय सशस्त्र पोलीस दल विधेयक, २०२६ आणि दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा होत आहे.

****

खासदार सुधा मूर्ती यांच्या संसद भवनातील भित्तिचित्रांवर आधारित 'टाईड्स ऑफ टाईम' या पुस्तकाचं प्रकाशन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज दिल्ली इथं झालं. संसद भवनातील ५८ भित्तिचित्रे ही केवळ कलाकृती नसून, ती देशाच्या सांस्कृतिक आणि नागरी प्रवासाचे प्रतिक असल्याचं उपराष्ट्रपती राधाकृष्णन यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संसद हे लोकशाहीच्या संवाद, चर्चा, मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार आणि विचारविनिमयाचे जिवंत प्रतीक असल्याचं राधाकृष्णन यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. करुणा, नम्रता आणि मानवतेच्या अविरत सेवेचे प्रतीक म्हणून ते सर्वांच्या स्मरणात राहतील असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची घोषणा केली. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. राज्यात बारामती आणि राहुरी या दोन जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे.

****

भोंदू अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयानं आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. खरातला पहिल्यांदा दाखल केलेल्या तक्रारीनुसार १४ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान, खरात याच्यावर दाखल दुसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी नाशिक पोलीस उद्या कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक परिसरात वाघाने शेतात काम करत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. या परिसरातील गेल्या पंधरा दिवसात घडलेली ही तिसरी घटना आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून वनविभागानं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नवनिर्वाचित ६३ जिल्हा परिषद सदस्य आणि नऊ पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

****

हनुमान जन्मोत्सव उद्या सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारुती मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील जड वाहतुक मार्गात तीन एप्रिलपर्यंत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले.

****

राज्यात पुढील चार दिवस मराठवाड्यासह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस गारपीट होण्याचा अंदाज आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील विद्यार्थी २०२४-२५ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. भूवैज्ञानिक परीक्षेत चाणक्य तोरणे यांनी अखिल भारतीय स्तरावर अकरावा क्रमांक पटकवला आहे. तर, डॉ. पांडुरंग बलवंत आणि राकेश निकम यांची केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्रात वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.

****

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल दिल्ली इथं समारोप झाला. सात दिवस चाललेल्या या महोत्सवात जगभरातील १२५ हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देणे, चित्रपट पर्यटनाला प्रोत्साहन देणे, नवीन कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे आणि चित्रपट निर्मात्यांसाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या महोत्सवाचं उद्दिष्ट होते.

****

चार वेळा विश्वविजेता ठरलेला इटलीचा राष्ट्रीय फुटबॉल संघ सलग तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकासाठी अपात्र ठरला आहे. इटलीला आता किमान १६ वर्षे एकाही विश्वचषक स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...