Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
·
महिला
आरक्षणासंदर्भात घटनादुरूस्ती विधेयकाला पाठिंब्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्याची
मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
विरोधी
पक्षांनी मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळले;सरकारला खुल्या चर्चेचं आव्हान
·
राज्यातल्या
प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष बाल कक्ष स्थापन करण्याच्या सूचना
·
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
आणि
·
धाराशिव
जिल्ह्यात चौदा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित
****
महिला आरक्षणासंदर्भात १३१ व्या घटनादुरूस्ती
विधेयकाला पाठिंब्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासाठी राज्यात
एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्यासह तालुकास्तरापर्यंत जनजागृती करणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. या विधेयकामागची भूमिका मुख्यमंत्र्यांनी विशद केली. ते म्हणाले -
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिला आरक्षणाला विरोध करून काँग्रेससह
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महिला
विरोधी चेहरा उघड झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ
नीलम गोऱ्हे, महिला
आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
****
दरम्यान,
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री
फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले. नारी शक्ती वंदन विधेयक २०२३ मधेच संसदेत एकमतानं
मंजूर झालं आहे, आताचं
विधेयक हे महिला आरक्षण नाही तर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाचं विधेयक होतं,
असं त्या म्हणाल्या.
खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार शोभा
बच्छाव यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस पक्ष तयार असल्याचं
प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच मंजूर झालं असून,
संसदेच्या ५४३ जागांमधूनच महिला आरक्षण
द्या, अशी
मागणी बच्छाव यांनी केली.
****
दरम्यान,
नारी शक्ति वंदन विधेयकात अडथळा आणल्याबद्दल
विरोधी पक्षांना परिणामांना सामोरं जावं लागेल, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते
आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या विधेयकाप्रती सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार
करत, या
प्रकरणात सरकार आपले प्रयत्न सुरूच ठेवेल, असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं.
****
जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांना त्यांच्या
जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. बसवेश्वर यांचा न्याय्य
समाजाबाबतचा दृष्टिकोन आणि लोकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम आपल्याला
सदैव प्रेरणा देत राहतील, असं
पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर
सहा पूर्णांक आठ दशांश टक्के ते सात पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज स्टेट
बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे. २०२५-२६ मध्ये भारताचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश
टक्के, महागाईचा
दर साडेचार टक्के, तर
वित्तीय तूट साडेचार ते चार पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याची शक्यता,
एसबीआयनं या अहवालातून व्यक्त केली
आहे. पश्चिम आशियातला तणाव आणि तेलाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांचा
सामना करण्यासाठी भारत सक्षम असल्याचंही एसबीआयने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
****
होर्मुझ सामुद्रधुनीतून ३१ भारतीय खलाशांसह
एक जहाज परवा मुंबईत दाखल होणार आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत दोन भारतीय जहाजांवर गोळीबाराच्या
घटना घडल्या, मात्र
कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.
****
देशातील एलपीजी पुरवठा स्थिर असल्याचं
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं आहे. देशात व्यावसायिक
गॅस पुरवठा सत्तर टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला असल्याचं सांगत,
सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्याला पूर्ण
प्राधान्य देण्यात आले असून, नव्या जोडण्यांमध्ये वाढ झाली असल्याचं शर्मा यांनी आज नवी दिल्लीत
पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या म्हणाल्या -
बाईट - सुजाता शर्मा
****
संभाव्य एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण
होणाऱ्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात,
असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिले. आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती
आणि पुनरुज्जीवनावर भर द्यावा, पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर कृती दलाची
स्थापना करावी, वैरण
विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, खत पुरवठा आणि वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवावं,
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
राज्यातल्या संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर शासनानं व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केल्याची माहिती महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या अनुषंगाने
शासनाची भूमिका आणि उपाययोजना यावर लवकरच सविस्तर बैठक होणार असल्याचं बावनकुळे यांनी
सांगितलं.
****
लहान मुलांशी संबंधित तक्रारींचं निवारण
करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याच्या
सूचना राज्य बालहक्क आयोगाने दिल्या आहेत. राज्यभरातले पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना
या सूचना लागू आहेत. बालकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून अशी प्रकरणं पोलिसांसह
सर्व यंत्रणांनी स्नेहभावाने हाताळण्याचं आवाहन बैठकीत करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अक्षय
तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे चार बालविवाह रोखण्यात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला यश
आलं. शनिवारी तीन तर रविवारी एक असे एकूण चार बालविवाह रोखण्यात आले. सुमारे दीड ते
दोन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत
सुरू असलेला विवाह, दामिनी
पथकाने थांबवला. करमाड भागातील जळगाव फेरण, जटवाडा रोड, आंबेडकर नगर आणि सावंगी बायपास इथं या दोन कारवाया करण्यात आल्या.
****
धाराशिव जिल्ह्यात एक कृषी सेवा केंद्र
कायमस्वरूपी रद्द करण्यात आलं असून, चौदा कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
ई-पॉस मशीन प्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात समाविष्ट स्रोताव्यतिरिक्त इतर निविष्ठाची खरेदी विक्री
करणे, साठा
रजिस्टरला नोंद नसणे, शेतकऱ्यांना
विहीत नमुन्यात पावती न देणे, खरेदी बिले नसणे यासारख्या अनियमितता आढळून आल्या. यात धाराशिव
आणि तुळजापूर तालुक्यातील प्रत्येकी एक, उमरगा चार, भूम तीन, परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यातल्या प्रत्येकी दोन कृषी सेवा केंद्रावर
कारवाई करण्यात आली
****
हिंगोली जिल्ह्यात स्वयंचलित दुचाकीचालक
आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती,
तसंच चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्टचा
वापर, बंधनकारक
करण्यात आलं आहे, जिल्हा
पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी हे आदेश दिले. वाहतूक नियम जनजागृती आणि हेल्मेट
सक्ती संबंधी घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यशाळेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी हे निर्देश
दिले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेची आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
यावेळी आज १० स्वीकृत नगरसेवकांची निवड
करण्यात आली आहे.
यामध्ये ५ भारतीय जनता पक्ष,
३ एमआय एम,
शिवसेना १,
तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे १ असे मिळून १० स्वीकृत नगरसेवक नाम निर्देशित करण्यात आले आहेत. आता छत्रपती
संभाजीनगर महानगर पालिकेची सदस्यांची संख्या १२५ असणार आहे.
****
जालना मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँकेतील
आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हे शाखेनं आणखी तीन आरोपींना आज अटक केली. न्यायालयाने त्यांना
सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात
अनधिकृत आणि विनापरवाना कापूस बियाण्यांची साठवणूक केल्या प्रकरणी एका घरावर कृषी विभागानं
छापा टाकला. या कारवाईत एक लाख ४५ हजार रुपये किमतीचं प्रतिबंधित कापूस बियाणंणे जप्त
करण्यात आलं या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात दुर्मिळ पक्ष्यांची
शिकार करणाऱ्या टोळीला वन अधिकाऱ्यांनी अटक केली. १२ जणांच्या या टोळीकडून काही पक्षी
आणि पक्ष्यांचे अवयव ताब्यात घेण्यात आले. हे शिकारी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर
वनकर्मचाऱ्यांनी ही केली.
****
हवामान
राज्याच्या अनेक भागात दोन ते तीन दिवस
मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये पुणे,
सोलापूर,
धुळे,
जळगाव,
नाशिक,
अहिल्यानगर,
चंद्रपूर,
गडचिरोलीसह लातूर,
धाराशिव,
या जिल्ह्यांचा समावेश आहे. जालना,
परभणी,
बीड, हिंगोली, या जिल्ह्यांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment