Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02 April 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२६ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी
नागरिक ‘देवो
भव’ या मूलमंत्राचा अंगिकार करुन सार्वजनिक सेवेला अधिक सक्षम
करण्यावर भर दिला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कर्मयोगी
साधना सप्ताह २०२६ या कार्यक्रमात त्यांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित
केलं. वेगाने बदलणाऱ्या आकांक्षांमुळे केवळ कार्यक्षमच नव्हे तर नागरिक-केंद्रित प्रशासनाची
आवश्यकता निर्माण झाल्याचं ते म्हणाले -
बाईट – पंतप्रधान नरेंद्र
मोदी
क्षमता निर्माण आयोग आणि मिशन कर्मयोगी
हे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांशी सुसंगत, आधुनिक, समर्पित आणि प्रतिसादक्षम
मनुष्यबळ तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत, असं पंतप्रधानांनी
नमूद केलं. विकसित भारत केवळ पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावरच नव्हे, तर कौशल्यपूर्ण आणि समर्पित मानवी संसाधनावर उभारला जाईल, शासनाचा मुख्य भर जीवन सुलभता आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेत सुधारणा
करण्यावर असावा, असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.
****
सर्व ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट
मीटर बंधनकारक नाहीत, असं
केंद्रीय विद्युत मंत्री मनोहर लाल यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात बोलत होते. ग्राहकांनी हा पर्याय निवडल्यास त्याचा फायदा ग्राहक, राज्य सरकार आणि वीज कंपन्यांना होईल, अनेक राज्यात हे
मीटर आधीच बसवले गेले आहेत, असं त्यांनी सांगितलं. प्रीपेड स्मार्ट
मीटर कोणावरही जबरदस्तीने लादले जात नाहीत, हा पूर्णपणे ऐच्छिक
पर्याय आहे. योग्य बिल वसुली व्हावी यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर सुरू केलं असल्याचं
त्यांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज
शेवटचा दिवस आहे. राज्यसभेत आंध्र प्रदेश पुनर्रचना दुरुस्ती विधेयक २०२६ विचारार्थ
मांडण्याची शक्यता आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. अधिवेशनाच्या या दुसऱ्या टप्प्यात अर्थ विधेयक २०२६ आणि विनियोग विधेयक २०२६ मंजूर करण्यात आलं. तसंच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करत आखाती प्रदेशात सुरु असलेल्या
संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.
****
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था
नासानं आर्टिमिस दोन या चंद्राभोवतीच्या पहिल्या मानवी मोहिमेला प्रारंभ केला. भारतीय
प्रमाणवेळेनुसार आज पहाटे पावणे चारच्या सुमारास अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या केनेडी
अवकाश केंद्रातून या यानानं उड्डाण केलं. दहा दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर
प्रत्यक्ष उतरणार नाहीत, मात्र
आतापर्यंतच्या सर्वांत दूरच्या अंतरावरून प्रवास करत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्याची
योजना आहे. एका मिनीबसच्या आकाराच्या कॅप्सूलमधून अंतराळवीर प्रवास करतील. भविष्यात
मानवाचं चंद्रावर पुनरागमन आणि दीर्घकालीन वास्तव्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरेल
अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
****
पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर
काही महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल्स उत्पादनांवर येत्या ३० जून पर्यंत संपूर्ण सीमा शुल्क
माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे पेट्रोकेमिकल क्षेत्रावर
अवलंबून असलेले प्लास्टिक निर्मिती, पॅकेजिंग, वस्त्रोद्योग,
औषधनिर्माण, रसायने, वाहनउद्योगासाठी
लागणारे घटक आणि इतर उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या क्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला
आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरच्या
किनाऱ्यावर कालपासून कासव महोत्सवाला सुरुवात झाली असून, तो संपूर्ण एप्रिल महिनाभर सुरू राहणार
आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -
बाईट – अनिकेत कोणकर, पीटीसी रत्नागिरी
****
देशासह राज्यभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह आहे. सामर्थ्याचं
प्रतीक असलेल्या हनुमंताच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा दिसून येत
आहेत. ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात
साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हनुमान जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment