Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
April 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२६ दुपारी १.००
वा.
****
ज्येष्ठ गायिका आशा भोसले
यांचं मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळापूर्वी निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा झटका बसल्याने
त्यांना काल उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उद्या दुपारी चार वाजता त्यांच्यावर मुंबईत शिवाजी पार्क
इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
महिला आरक्षण कायदेविषयक, नारीशक्ती
वंदन सुधारणा विधेयक संसदेत एकमुखानं मंजूर व्हावं, यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन
पंतप्रधान मोदी यांनी, लोकसभेसह राज्यसभेतल्या सर्व सभागृह पक्षनेत्यांना पत्र
लिहून केलं आहे. संबंधित कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची वेळ आली असून, आगामी २०२९
पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणासोबतच व्हायला पाहिजेत असही मोदी
यांनी नमूद केलं आहे. सर्व सदस्यांनी या कायद्द्यातील दुरुस्तीच्या मुद्यावर एकजूट
होण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशन सत्राचा कालावधी वाढवून तीन दिवसांचं विशेष सत्र येत्या १६ ते १८ एप्रिलपर्यंत
चालणार आहे. महिला आरक्षण अधिनियमाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या वाढून ८१६ होईल.
ज्यामध्ये २७३ जागा महिलांसाठी असणार आहेत. या आरक्षणाबाबत २०२३ मध्ये संविधानात दुरुस्ती
करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या खासदारांना
व्हीप जारी केला असून १६ ते १८ एप्रिल हे तीनही दिवस संसदेत उपस्थित राहण्यास सांगितले
आहे.
****
नांदेड इथं सध्या सुरू असलेल्या
सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य - लघुनाटिकेद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध
योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
१३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात
येत आहे. या उपक्रमात सहभागी समतादूत प्रकल्पांतर्गत कार्यकर्ते शहरातील प्रमुख ठिकाणी
उपस्थित नागरिकांचं प्रबोधन करत आहेत.
****
बीड जिल्हाच्या माजलगाव तालुक्यातल्या
वाळू घाटांवर होत असलेलं अवैध उत्खनन आणि ई-टीपी नियमांच्या उल्लंघनामुळे उपविभागीय
अधिका-यांनी तालुक्यातील सर्व आठ वाळू घाट तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महाखनिज
प्रणालीमधील पडताळणीनुसार, वाळू वाहतूक करणारी वाहने जी. पी. एस.नुसार ठरवून दिलेल्या
मार्गावर न जाता अन्य ठिकाणी जात होती. अतिरिक्त उत्खननाच्या तक्रारी महसूल मंत्र्यांपर्यंत
पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने
स्पष्ट केले आहे की, आदेशानंतरही कोणत्याही लिलावधारकाने उत्खनन किंवा वाहतूक
सुरू ठेवल्यास ती अवैध समजली जाईल आणि संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.
****
बीड इथं तुलसी शैक्षणिक समूहात
साडेबाराशेहून जास्त विद्यार्थ्यांनी सलग १८ तास वाचनाचा उपक्रम राबवण्यात आला. भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिनांच्या निमित्तानं
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड आणि महापुरुषांचे विचार रुजण्यासाठी छत्रपती शिवाजी
महाराज, डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या चरित्रांचं वाचन करण्यात आलं.
****
भारताचा बॅडमिंटनपटू आयुष
शेट्टी आज, चीनच्या निन्गबो इथं आयोजित आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीच्या
सुवर्णपदकासाठी आपलं कसब पणाला लावणार आहे. तब्बल ६१ वर्षांनंतर भारताच्या खेळाडूनं
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज होणाऱ्या अंतिम फेरीच्या लढतीत त्याचा
मुकाबला चीनच्या शी यु कि बरोबर होईल.
****
राज्याच्या बहुतांश भागात
उन्हाची तीव्रता वाढली आहे. काल सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांवर
गेलं होतं. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून
विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज
लखनौ सुपर जायटंस् आणि गुजरात टायटन्स तसंच मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयज चॅलेंजर्स
बंगळुरू हे दोन सामने होणार आहेत.
****
यावर्षी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून
सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनपर्यंत चालणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल
मनोज सिन्हा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं की, पहिली पूजा २९ जून रोजी ज्येष्ठ
पौर्णिमेला केली जाईल. यात्रेसाठी नोंदणी १५ एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही
पद्धतीने सुरू होईल. जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक
ऑफ इंडिया आणि येस बँक यांसह देशभरातील ५५४ बँक शाखांपैकी कोणत्याही शाखेत नोंदणी उपलब्ध
असणार आहेत.
****
No comments:
Post a Comment