Friday, 10 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      देशातले सर्व औष्णिक वीज प्रकल्प पुरेशा कोळशाच्या साठ्यासह पूर्ण क्षमतेने कार्यरत-सरकारचा निर्वाळा

·      जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत पाच लाख ७२ हजारांहून अधिक कुटुंबांकडून स्वगणना सुविधेचा लाभ

·      झाडांवर जाहिरात किंवा माहिती फलक लावल्यास दंडात्मक कारवाई-छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्तांचा इशारा

आणि

·      लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हॉलीबॉल तसंच बॅडमिंटन कोर्टचं उद्घाटन

****

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधेकरता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्त्वाने घरे उपलब्ध होतील, याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्यासाठी १०० विशेष न्यायालयं स्थापन करावीत, यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने सायंकालीन न्यायालय सुरू करावं, या न्यायालयांसाठी जागा नसल्यास त्या भाडेतत्त्वावर घ्याव्यात. आदी निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत.

****

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनासादरीकरण आणि अमंलबजावणी कार्यशाळेला आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. पशुसंवर्धन आयुक्तालयात झालेल्या या कार्यशाळेचं उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. सदर योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम करुन त्यांना ‘राज्याचा आर्थिक कणा’ करण्यावर भर दिला जाणार असल्याचं मुंढे यांनी सांगितलं. ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक तसंच सामाजिक विकासाचं एक सशक्त माध्यम ठरेल, असा विश्वासही मुंढे यांनी व्यक्त केला.

****

देशातले सर्व औष्णिक वीज प्रकल्प पुरेशा कोळशाच्या साठ्यासह पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचं, ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी सांगितलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढील तीन महिन्यांत औष्णिक, सौर, पवन आणि हायड्रोगॅस क्षेत्रांमध्ये २२ हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता वाढवण्याची सरकारची योजना असल्याचं पियुष सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, देशात घरगुती एलपीजी आणि इंधनाचा पुरवठा स्थिर आहे. पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता असून तुटवड्याची तक्रार नसल्याचं शर्मा यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या -

बाईट – सुजाता शर्मा, सहसचिव, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

****

राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलच्या आकडेवारीनुसार २०२५ या वर्षात देशभरात सायबर घोटाळ्याची २८ लाख प्रकरणं आणि सुमारे २२ हजार ९३१ कोटी रुपयांचा अपहार नोंदवला गेला. याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेनं डिजिटल घोटाळे किंवा फसवणूक टाळण्याच्या दृष्टीनं ४ नवीन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. १० हजार रुपयांपेक्षा जास्तीचा डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी एका तासाचा अवधी, वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यकाकडून प्रमाणीकरण, ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना अधिक नियंत्रण सुविधा इत्यादी उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. याबाबत येत्या आठ मे पर्यंत आरबीआयच्या वेबसाइटवरील 'कनेक्ट टू रेग्युलेट' लिंकद्वारे टिप्पण्या आणि अभिप्राय मागवले आहेत.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. हरिवंश यांचा कार्यकाळ काल पूर्ण झाला. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा राज्यसभा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर हरिवंश यांची नियुक्ती झाली आहे. गृह मंत्रालयानं आज याबाबतची अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी हरिवंश यांना आज सदनाच्या सदस्यत्वाची शपथ दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. येत्या मंगळवारी १४ तारखेला बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

****

जागतिक होमिओपॅथी दिन आज पाळण्यात येत आहे. होमिओपॅथी या उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांच्या जयंतीदिनी म्हणजे दरवर्षी १० एप्रिलला हा दिवस पाळला जातो. 'शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी' ही या वर्षीच्या जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना आहे.

****

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत पाच लाख ७२ हजारांहून अधिक कुटुंबांनी स्वगणना सुविधेचा लाभ घेतला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल रोजी सुरू झाला असून, स्वगणना सुविधा सध्या अकरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. घरांची नोंदणी आणि गृहगणना १६ एप्रिलपासून सुरू होईल आणि १५ मे पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रात स्वगणनेचा प्रारंभ येत्या १ मे रोजी होईल.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण-म्हाडाच्या वर्ष २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १३ हजार १२ सदनिकांचे बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १० हजार ५८५ कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली आहे.

****

विकासाच्या संकल्पनेत लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. या पाचही क्षेत्रांमध्ये महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य होईल, असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र – गोवा – गुजरात या विभाग – सात च्या पणजी इथं भरलेल्या वार्षिक परिषदेमध्ये “व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम” या विषयावर त्या बोलत होत्या. सूक्ष्म, लघु उद्योगांमध्ये महिलांचा मोठा वाटा असून, त्यांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी तांत्रिक साधने आणि आर्थिक साक्षरता प्राप्त करुन देण्याची गरज आहे. मत्स्यव्यवसाय आणि पारंपरिक उद्योगांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

****

विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना कार्यक्षम, पारदर्शक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कॉस्ट ऑडिटची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलं आहे. मुंबई इथं इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्सच्या वतीनं घेण्यात आलेल्या “कॉस्ट ऑडिट फॉर विकसित भारत” या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. विकसित भारताची संकल्पना केवळ आर्थिक वृद्धी किंवा औद्योगिक विस्तारापुरती मर्यादित नाही. तर देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक रुपया, प्रत्येक संसाधन आणि प्रत्येक निर्णय यांचा अधिकतम उपयोग होणं आवश्यक आहे, असं त्यांनी नमूद केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे वितरण शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी केले. तिसगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रलंबित फेरफार दोन दिवसाच्या आत निकाली काढून याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ते म्हणाले -

बाईट – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

छत्रपती संभाजीनगर इथं, जिल्हाधिकारी कार्यालयातल्या उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. काल १२ तर आज १५ कर्मचारी कार्यालयात उशिरा आले. या सर्व ३२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

****

जाहिरात किंवा माहिती फलक झाडांवर लावणारे नागरिक तसंच संस्थांविरुद्ध शहर विद्रूपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही झाडांवर खिळे ठोकणं, जाहिरात अथवा माहिती फलक लावणं किंवा झाडांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणं, हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं आहे.

****

लातूर इथं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात हॉलीबॉल आणि बॅडमिंटन कोर्टचं आज पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. तणावपूर्ण कामकाजातून पोलिसांना मानसिक आणि शारीरिक दिलासा मिळावा, तसचं खेळाडू वृत्ती जोपासली जावी या उद्देशानं या क्रीडा सुविधा देण्यात येत असल्याचं उमाप यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...