Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 April
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· नदीजोड
प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
· राज्यातल्या
भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन
· पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
· बदनापूर
तालुक्यातल्या कॅनरा बँकेच्या शाखेत सुवर्ण कर्ज प्रकरणात तब्बल सात कोटी ३१ लाख रुपयांचा
अपहार
आणि
· पुढचे दोन
दिवस परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
****
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून
राज्य दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त ‘गोदा ते नर्मदा’
जलयात्रेला काल त्र्यंबकेश्वर इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला, त्यावेळी
ते बोलत होते.
बाईट –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्याबाई होळकर यांनी बारव, तलाव, घाट बांधून
जलसंधारणाचं मोठं कार्य केलं, त्यांचा विचार आणि वारसा घेऊन या यात्रा काढल्या आहेत, असं फडणवीस
यावेळी म्हणाले. कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी नदी निर्मळ वाहायला हवी, त्र्यंबकेश्वर
मध्ये ती बारमाही वाहायला हवी, यासाठी शासन व्यवस्था करत आहे. हा ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा
उपक्रम यशस्वी होईल, आणि जलसंधारणाची कामं लोकसहभागातून पूर्ण करू, अशी हमी
त्यांनी दिली.
दरम्यान, ‘गोदा ते
नर्मदा’ या यात्रेच्या दुसऱ्या तुकडीने अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानी अहिल्यानगर
जिल्ह्यातल्या चौंडी इथून यात्रेला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी
उपस्थित होते. ही यात्रा मध्यप्रदेशात महेश्वर पर्यंत जाणार आहे.
****
राज्यातल्या भटके-विमुक्त
समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय समित्यांची
स्थापना केल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पत्रकाद्वारे
दिली. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावरच्या या समित्यांच्या माध्यमातून
भटके-विमुक्तांच्या तक्रारींचं निवारण तातडीने केलं जाईल, त्वरित कारवाई केली जाईल तसंच
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं सावे म्हणाले.
****
वाढत्या सायबर सुरक्षेच्या
आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सेबीसह सर्व नियामक संस्थांनी सज्ज राहावं असं आवाहन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. मुंबईत काल सेबी अर्थात भारतीय
रोखे आणि विनिमय मंडळाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
देशातला एखादा शेअर बाजार, शेअर दलाल किंवा संबंधितांवर सायबर हल्ला झाला, तर त्यामुळे
होणारं नुकसान भरून यायला मोठा काळ जाऊ शकतो. त्यामुळे सायबर हल्ले, कृत्रिम
बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नियामक संस्थांनी मजबूत
यंत्रणा तयार करावी, अशी सूचना त्यांनी केली. केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी
आणि नागरिकांना वारंवार केवायसी करावं लागू नये यासाठी देशातल्या सर्व वित्तीय नियामकांनी
एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं.
****
नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी
अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
भेट घेतली. लाहिरी यांच्याशिवाय नीती आयोगाचे पूर्णकालीन सदस्य म्हणून राजीव गौबा, के. व्ही.
राजू, गोवर्धन दास, अभय करंदीकर आणि एम. श्रीनिवास यांचीही नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा
१३३ वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, एआयआर न्यूज
या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे.
****
जनगणना २०२७ साठी १-८-५-५
हा राष्ट्रीय निःशुल्क मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांमध्ये हा क्रमांक वापरता येणार आहे. या क्रमांकावरून गृहसूची आणि गृहगणना प्रक्रियेबाबत
इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमधून मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जाईल. जनगणनेच्या महत्त्वाच्या
राष्ट्रीय कार्यात नागरिकांना सुलभतेनं सहभाग घेता यावा, आणि त्यांच्या शंकांचं निरसन
करता यावं या उद्देशानं ही सुविधा सुरु केली आहे.
****
दरम्यान, महाराष्ट्रात
जनगणनेचा पहिला टप्पा येत्या एक मे पासून सुरु होणार आहे. या टप्प्याअंतर्गत नागरीकांना
डिजिटल स्व–गणना करता येणार आहे. याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिक
माहिती दिली. ते म्हणाले,
बाईट –
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर
तालुक्यातल्या कॅनरा बँकेच्या शाखेत सुवर्ण कर्ज प्रकरणात तब्बल सात कोटी ३१ लाख रुपयांचा
अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. बनावट सोन्याचे दागिने ठेवून आणि
मूळ दागिन्यांची चोरी करून ही फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी बँकेचे
सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी. व्ही. यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर, बँकेचे
अधिकारी संजय डोंगरे, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुऱ्हाडे, यांना पोलिसांनी
अटक केली.
****
बीड जिल्ह्यात आष्टीच्या ग्रामीण
रुग्णालयात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते डायलिसिस सेंटर, सोनोग्राफी मशीन तसंच ५ लाख
लिटर पाणीसाठा तलावाचं लोकार्पण काल करण्यात आलं. या अत्याधुनिक सुविधांमुळे परिसरातल्या
रुग्णांना वेळेत, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी
मदत होणार असल्याचं आमदार धस यावेळी म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क
अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात
येणार आहे. हा सन्मान येत्या मंगळवारी २८ तारखेला मुंबईत द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त
होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक
सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य
पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या १३२
गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतीच आढावा बैठक पार पडली. प्रत्येक नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या
गावांना महिन्यातून किमान दोन वेळा भेट देऊन योजनांची अंमलबजावणी, प्रगती
आणि अडचणींचा आढावा घ्यावा तसंच संबंधित बाबींचा नियमित पाठपुरावा करावा, अशा सूचना
यावेळी देण्यात आल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शेक्सपिअर
महोत्सव काल सुरु झाला. यावेळी लेखक अमोद जांदे यांनी ‘स्त्रियांचे गिळलेले शब्द’ या
विषयावर अभिवाचन केलं. आपल्या सादरीकरणातून त्यांनी पुरुषी मानसिकतेला आरसा दाखवत, ज्या दिवशी
स्त्री सांगणं सोडते, त्यादिवशी नातं संपतं, असं मत व्यक्त केलं. या महोत्सवात
काल ‘एक पुस्तक एक दिवस’ या दुसऱ्या सत्रात कवी दासू वैद्य यांनी लेखक राजू बाविस्कर यांच्याशी, त्यांच्या
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘काळ्या निळ्या रेषा’ या ग्रंथावर संवाद साधला.
****
जागतिक हिवताप दिनानिमित्त
काल छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका आणि जिल्हा हिवताप कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं
जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी हिवताप निर्मुलनात ऊत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा
सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी मलेरिया आणि इतर किटकजन्य आजारांपासून बचावासाठी
शपथ घेतली.
धाराशिव जिल्ह्यातल्या येडशी
इथं देखील हिवताप दिनानिमितत जनजागृती रॅली काढण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
प्रमोद गिरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातून
मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांविरोधात प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार
व्यक्त करण्यात आला.
****
लातूर तालुक्यात, भारतीय
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी 'मॅपिंग' मोहिमेला
काल सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत २००२ च्या मतदार यादीतील सर्व मतदारांची पडताळणी
केली जाणार आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन लातूरच्या उपविभागीय
अधिकारी रोहिणी नर्हे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केलं आहे.
****
परभणी इथं ‘माझं गाव, आरोग्य
संपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळा काल पार पडली. या कार्यशाळेत आरोग्य विभागातल्या
विविध घटकांना एकत्र आणत प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं. या अभियानांतर्गत
राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य कार्यक्रमांची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या
सरस्वती भूवन शिक्षण संस्थेत उद्या सोमवारी संविधान जागर अभियानाचा समारोप केंद्रीय
कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रशालेच्या
प्रांगणात सायंकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी खुला असल्याचं
आयोजकांनी कळवलं आहे.
****
राज्यात काल सर्वात जास्त
४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४२, छत्रपती
संभाजीनगर आणि बीड इथं सरासरी ४१, तर धाराशिव इथं ४० पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
पुढचे दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या
लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यात परभणी, नांदेड, लातूर आणि
धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment