Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 April 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१३ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना
देशाच्या इतिहासातील ‘एक काळा दिवस’ म्हणून ओळखली जाते. १३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या
या घटनेला आज १०७ वर्ष पूर्ण झाली. पंजाब प्रांतातील जालियनवाला बागेत बैसाखी निमित्त
जमलेल्या, शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा
लढा देणाऱ्या निष्पाप भारतीयांवर ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेतल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. याघटनेत शेकडो भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने देशवासियांमध्ये
स्वातंत्र्यासाठी एक नवी जाणीव आणि दृढनिश्चय निर्माण केला, देश या हुतात्म्यांचा
सदैव ऋणी राहील, असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन
यांनी या हत्याकांडातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. ही शोकांतिका आजही राष्ट्राच्या
अंतःकरणाला स्पर्श करते, तसंच न्याय, एकता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी कटिबद्ध
राहण्याची प्रेरणा देते, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत
नारी शक्ती वंदन संमेलनाला संबोधित करणार आहेत. देशाच्या विकासाची दिशा ठरवण्यात महिलांचा सहभाग अधिक वाढवण्याची कटिबद्धता अधिक बळकट करण्यासाठी या राष्ट्रीय स्तरावरील
संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व
मिळण्याचं महत्त्वही या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित होणार आहे.
महिला आरक्षणाला गती देणाऱ्या विधेयकवर
चर्चा करून ते संमत करण्यासाठी, या महिन्याच्या १६ तारखेपासून
संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे.
****
वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा तीन जुलै
ते २८ ऑगस्ट दरम्यान असेल, अशी घोषणा जम्मू काश्मीरचे
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये केली आहे. ज्येष्ठ
पौर्णिमेच्या निमित्ताने २९ जून रोजी भगवान शिवाची प्रथम पूजा होईल. या यात्रेसाठी आगाऊ नोंदणी १५ एप्रिलपासून ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीनं
सुरू होईल. जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक
या बँकांच्या देशभरातल्या एकूण ५५४ शाखांमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध असेल.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी इथल्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष २०२३-२४ चा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आयटीआय, हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात
आला. मुंबईत, मंत्री मंगल प्रभात लोढा
यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या
वैतरणा धरण क्षेत्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी काल पर्यटनासाठी आलेले चार विद्यार्थी
बुडाले. रात्री उशिरापर्यंत या चारही जणांचा शोध घेतला गेला, मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं.
झारवड इथं बुलढाणा जिल्ह्यातले आदित्य वानरे आणि जळगाव जिल्ह्यातले वीरेंद्र पाटील
हे दोन विद्यार्थी बुडाले. तर दुसर्या घटनेत वावी हर्ष परिसरात दुगारवाडी धबधब्यावर
दोन जण बुडाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मिलिंद महाविद्यालय परिसरात आणि नागसेन वनात काल हेरिटेज
वॉक घेण्यात आला. महानगरपालिका, इंटॅक आणि मिलिंद महाविद्यालयाच्या
वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हेरिटेज वॉकला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान आणि इंटॅक सदस्य संकेत कुलकर्णी यांनी
उपस्थितांना मिलिंद महाविद्यालय परिसरातल्या इमारती, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या संभाजीनगर शहरातल्या वास्तव्यातील आठवणी सांगितल्या.
****
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर
महापौरांनी आढावा बैठक घेतली. यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना कोणत्याही
प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित
यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी
दिले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
सप्ताह राज्यभरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त धाराशिव इथं काल फकीरा नगर आणि
बौद्ध नगर या भागात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
****
देशात १६ वर्षांनंतर होत असलेल्या जनगणनेत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी
उत्कृष्ट कामगिरी करून शहराची जनगणना यशस्वी करावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल
येडगे यांनी केलं आहे. जनगणनेनिमित्त सुरु असलेल्या प्रशिक्षण सत्रात ते काल बोलत होते.
****
किर्गिझस्तानमध्ये बिश्केक इथं पार
पडलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत, काल दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची
कमाई केली. पुरुष फ्री-स्टाईल प्रकारात ६१ किलो वजनी गटात अमनने आणि ८६ किलो वजनी गटात
मुकुलने रौप्य पदक पटकावलं, तर १२५ किलो वजनी गटात
दिनेशने कांस्य पदक मिळवलं. या यशामुळे स्पर्धेतील भारताची एकूण पदकसंख्या आता १७ वर
पोहोचली आहे. भारतीय कुस्तीपटूंनी सातत्यपूर्ण उत्कृष्ट प्रदर्शन करत देशाचा मान उंचावला
आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात
वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात आज उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे. राज्यात काल सर्वात जास्त ४२ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं.
नाशिक शहरात काल या उन्हाळ्याच्या
हंगामात आतापर्यंतचं उच्चांकी ३९ पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment