Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
·
नारी
शक्ती वंदन अधिनियमासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर लोकसभेत वादळी चर्चा;
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप–प्रत्यारोप
·
नारी
शक्ती वंदन अधिनियम कालपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी
·
राज्यसभेचे
उपाध्यक्ष म्हणून हरिवंश नारायण सिंग यांची बिनविरोध निवड
·
येत्या
एक जूनपासून राज्यातल्या सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे
मोफत – परिवहनमंत्र्यांची माहिती
आणि
·
छत्रपती
संभाजीनगर, जालना,
परभणी,
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना
उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा
****
संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना
आरक्षणाची तरतूद असलेलं नारी शक्ती वंदन अधिनियम, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक,
आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा
विधेयक मंजुरीसाठी आज लोकसभेत मतदान होणार आहे.
तत्पूर्वी सभागृहात या विधेयकांवर जोरदार
चर्चा झाली. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या अनेक सदस्यांनी आपापली भूमिका
ठामपणे मांडली. आजच्या चर्चेची सुरुवात द्रमुक खासदार कनिमोळी यांनी केली. त्यांनी
या विधेयकांवर टीका करत, ही
विधेयकं महिला आरक्षणाच्या समर्थनात असल्याचं भासवलं जात असलं,
तरी ती प्रत्यक्षात भारतीय संघराज्य
रचनेविरोधात असल्याचा आरोप केला.
देशाच्या निवडणुकीचं गणित बदलण्याचा
प्रयत्न नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांमधून केंद्र सरकार करत आहे,
असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी
यांनी केला. २०२३ मध्ये मंजूर केलेलं जुनं विधेयक सरकारनं पुन्हा आणावं,
आम्ही त्याला तात्काळ पाठिंबा देऊ असं
ते म्हणाले. देशातले दलित, ओबीसी
आणि इतरांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी महिला
आरक्षणाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडणं हे महिलांवर अन्यायकारक असल्याचं म्हटलं,
तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह
यांनी काँग्रेसवर सामाजिक परिवर्तनात अडथळे निर्माण केल्याचा आरोप करत,
“सबका साथ,
सबका विकास,
सबका विश्वास,
सबका प्रयास” ही पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांची दूरदृष्टी असल्याचं सांगितलं.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी
यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची गरज होती
का, असा
प्रश्न उपस्थित करत याला अन्यायकारक आणि दुर्दैवी म्हटलं.
समाजवादी पक्षाच्या डिम्पल यादव यांनी
महिलांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे,
असं मत व्यक्त केलं.
शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर
बादल यांनी मतदारसंघांची पुनर्रचना न करता सध्याच्या संसदीय क्षमतेनुसार महिला आरक्षण
लागू करण्याची मागणी केली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
अनुप्रिया पटेल यांनी राष्ट्र उभारणीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही एक ऐतिहासिक
संधी असल्याचं नमूद केलं.
****
दरम्यान,
राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या
आरोपांवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गांधी यांनी
त्यांच्या भाषणातील पंतप्रधानांची टिका करणारे मुद्दे काढून टाकावे आणि क्षमा मागावी
अशी मागणी त्यांनी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील राहुल गांधी
यांच्या विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली. गांधी यांचे मुद्दे असंसदीय असून त्यांनी
विधेयकाशी संबंधित मुद्द्यांवर बोलावं, असं त्यांनी सूचित केलं.
****
दरम्यान,
१०६ वी घटना दुरुस्ती अधिनियम २०२३
म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम कालपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी झाली आहे. लोकसभा
आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या विधानसभांसह सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये
महिलांसाठी एक- तृतीयांश जागा फिरत्या पद्धतीने राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात
आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या
समाजशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. स्मिता अवचार यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम
लागू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या
-
बाईट – स्मिता अवचार
****
राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश
नारायण सिंग यांची बिनविरोध निवड झाली. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जगत प्रकाश
नड्डा यांनी हरिवंश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. भाजपा खासदार एस फँगनॉन कोन्याक
यांनी अनुमोदन दिलं. नऊ एप्रिल रोजी हरिवंश यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त
झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर पक्षांच्या गटनेत्यांनीही
हरिवंश यांचं अभिनंदन केलं.
****
देशात पेट्रोल,
डिझेल आणि देशांतर्गत एलपीजीचा पुरवठा
पूर्णपणे सुरळीत असून, कोणत्याही
वितरकाकडे एलपीजीचा तुटवडा नसल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या
सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिली. नवी दिल्लीत आज आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या
बोलत होत्या. देशभरात पेट्रोल पंपांवरील कामकाज सुरळीत सुरू असून पेट्रोल आणि डिझेलचा
मुबलक साठा उपलब्ध आहे. तसंच शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत असून कच्च्या
तेलाचा साठाही पर्याप्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन
दिनाचं औचित्य साधून येत्या एक जूनपासून राज्यातल्या सर्वच बस स्थानकांवरील शौचालय
सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जातील,
अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यात शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नूतन बसस्थानकांचं
आज मंत्री सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवाशांशी थेट संवाद साधताना प्रवाशांकडून
बस भाड्याच्या माध्यमातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो,
त्यामुळे आता हा निधी महामंडळ स्वतः
खर्च करणार असून, खासगी
कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी
घेणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित
संस्थांविरुद्ध आर्थिक गुन्हे तपासाचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने आज नाशिक
जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. शरणपूर इथल्या खरातच्या एका मालमत्तेमधून काही
कागदपत्रं आणि संगणकीय उपकरणं जप्त करण्यात आली आहेत.
****
अमरावतीमधे मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणातल्या
पीडितांचे व्हिडीओ समाज माध्यमांवरुन काढून टाकावे आणि व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी
करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगानं पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी वेळेत चौकशी
पूर्ण होऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया
रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत. याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवालही
आयोगानं पाच दिवसात मागवला आहे.
****
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज
दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन मराठवाडा,
विशेषतः बीड जिल्ह्यातल्या गंभीर कृषी
परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. मराठवाडा विशेष आपदाग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित
करावं, पिक
नुकसान भरपाई तातडीने आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,
पंचनामे वेळेत,
पारदर्शक आणि जबाबदारीने करण्याची प्रभावी
यंत्रणा उभी करावी आदी मागण्यांचं निवेदन त्यांनी चौहान यांना दिलं.
****
आगामी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी
पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने
आतापासूनच सज्ज राहावं, असे
निर्देश लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा
बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरण, विहीर पुनर्भरण आणि जलसंधारणाची कामं,
मोहीम स्वरूपात राबवण्यावर भर देण्याच्या
सूचना त्यांनी दिल्या. महावितरणकडून पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित होऊ नये,
याची दक्षता घेण्याचे निर्देश देत तांड्यांवरील
पाणीटंचाई निवारणासाठी विशेष सर्वेक्षण करण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला.
****
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त
म्हणून जी. श्रीकांत यांनी आज पदभार स्वीकारला. श्रीकांत यांनी सर्व विभाग प्रमुखांशी
संवाद साधत मराठवाड्यातल्या शेती, टंचाईस्थिती तसंच सामाजिक आणि प्रशासकीय विषयांबाबत माहिती जाणून
घेतली.
****
लातूर जिल्ह्यातल्या गांधी चौकात स्थानिक
गुन्हे शाखेने कारवाई करत अंदाजे आठ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या
प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर सुरक्षा आणि मानके अधिनियम
कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
बीड इथं आज आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लीम
समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला. बीड इथल्या किल्ला मैदानातून दुपारी २.३०
वाजता मोर्चाला सुरूवात झाली. राज्य शासनाने जाहीर केलेलं पाच टक्के मुस्लीम आरक्षण
रद्द केल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून आलेले समाज बांधव
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर जिल्ह्यात
धोत्रे गावानजीक कंटेनरला पाठीमागून कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कार मधल्या पती–पत्नीचा
मृत्यू झाला, तर
त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. हे तिघे छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात होते. मृत जितेंद्र शेळके हे भोंदू
बाबा अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते.
****
हवामान
छत्रपती संभाजीनगर,
जालना,
परभणी,
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना
उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर १९ आणि २० तारखेला परभणी,
हिंगोली,
नांदेड,
लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना अवकाळी
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment