Thursday, 23 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी दोन लाख ५६ हजार कोटी रुपयांच्या १८ प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, मराठवाड्यात येणार तीन मोठे प्रकल्प

·      राज्यातल्या विविध धरणांमध्ये सुमारे ६५६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध

·      बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

·      हिंगोली जिल्ह्यात ४६ खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित

आणि

·      नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

****

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी दोन लाख ५६ हजार कोटी रुपयांच्या १८ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

याअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रायवेट लिमिटेड ही कंपनी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामुळे सुमारे एक हजार रोजगारनिर्मिती होईल. तसंच गोदावरी न्यु एनर्जी प्रा.लि. २७ हजार ५१५ कोटींची गुंतवणूक करून चार हजार रोजगार निर्माण करेल. ग्लोब फोर्ज लिमिटेड, अहिल्यानगर आणि धाराशिवमध्ये १५ हजार ४३० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, याद्वारे तीन हजार ६०० रोजगार निर्माण होतील.

****

राज्यातल्या विविध धरणांमध्ये सुमारे ६५६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १०१ पूर्णांक ७७ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या १२९ पूर्णांक ३७ टीएमसी, तर जायकवाडी धरणात ४२ पूर्णांक शून्य तीन टीएमसी पाणीसाठा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

**

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या इतर निर्णयांविषयी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी,

बाईटओंकार माहोरकर

‘‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६ राज्य सरकारने काल मंत्रिमंडळ बैठकीत जाहिर केलं. यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच कॉम्प्रेस्ड बॉयोगॅसच्या गरजेनुरूप वापरण्यायोग्य गॅस उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरून प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. प्रकल्प पीपीपी आणि हायब्रि़ड अॅन्युएटी तत्वावर राबवण्यात येणार आहे. हे धोरण कचऱ्याचं ऊर्जा आणि खतामध्ये रूपांतर करून रोजगार आणि संपत्ती निर्माण करणारे आहे. यामुळे ऊर्जा आणि आयात घट होईल, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन, कार्बन उत्सर्जनात घटवाहतूकऔद्योगिक आणि घरगुती क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध होईल.

कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार जमिनीचं रुपांतर भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये करण्यासाठीच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. याबाबतची अधिसूचना काढण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातल्या सात आदर्श महाविद्यालयातल्या शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णयही झाला आहे. या पदावरच्या शिक्षकांना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमधे अतिरिक्त गुण मिळणार आहेत.’’

****

तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागांसाठी आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व २३४ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधल्या १५२ मतदारसंघांत एकूण ४४ हजार ३७६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.

राज्यातल्या बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान सुरु झालं आहे.

****

विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘ई-निरसन’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचा शुभारंभ काल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. लोणेरे इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार असून, विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचं मंत्री पाटील यावेळी  म्हणाले.

****

जागतिक वसुंधरा दिवस काल विविध उपक्रमांनी साजरा झाला. पृथ्वीचं आरोग्य जपणं आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शुभेच्छा देताना विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वसुंधरेचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी चार संशयितांना मुंबई उच्च न्यायालयानं काल दोषमुक्त केलं आणि त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करायचा विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय रद्दबातल ठरवला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं हा निर्णय दिला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या चौघांविरुद्ध आरोपपत्र करायचे आदेश विशेष न्यायालयानं दिले होते.

****

प्रलंबित १८ मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांचा संप कायम आहे. मुख्य सचिवांशी काल झालेली चर्चा अनिर्णित राहिल्याने कर्मचारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. सुधारित निवृत्तीवेतन योजना आणि इतर चार महत्त्वाच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिलं.

दरम्यान, या संपात शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेनं देखील सहभाग घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल संघटनेचे सरचिटणीस देवानंद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मुद्रणालय विभागासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरामध्ये व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या आर्थिक लुटीच्या विरोधात सेनगाव तालुक्यात गोरेगाव इथं काल तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर हळद पेटवून सरकार आणि बाजार समिती प्रशासनाचा निषेध नोंदवला. राष्ट्रीय स्तरावर हळदीचे दर प्रति क्विंटल साडे १६ हजार रुपयांच्या आसपास असताना, स्थानिक बाजार समितीत व्यापारी केवळ १२ हजार ते साडे १३ हजार रुपयांनी खरेदी करत आहेत. ही तफावत म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

****

येत्या १५ ऑगस्टपर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, असे निर्देश बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत दिले. याशिवाय बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह ग्रामीण मार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सूचित केलं. या बैठकीत विविध प्रलंबित कामं, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणं आणि नागरिकांच्या अडचणी यांसह सर्वच मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

****

प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत ऑनलाइन लॉटरी पद्धतीद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना बँकांकडून गृहनिर्माण कर्ज मिळवून देण्यासाठी संबंधित विकासकांनी सक्रिय समन्वय ठेवावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. काल विकासकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. लाभार्थ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी विकासकांनी कॉल सेंटरची स्थापना करावी, यामुळे प्रक्रियेचा पाठपुरावा करणं सुलभ होईल, असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणी मोहीमेत अनियमितता आढळून आल्याने ४६ खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाने ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यातल्या अनेक गावांना काल भूकंपाचा धक्का जाणवला. जमिनीतून मोठा आवाज येत जमीन हादरल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडले होते. या एकाच महिन्यात बसलेला हा तिसरा धक्का आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेतर्फे काल प्लास्टिकमुक्त मोहिमेअंतर्गत धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आलं. अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातल्या दुकांनांमधून काल चार हजार किलोहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून, संबंधित विक्रेत्यांकडून एकूण ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

नांदेड शहरात गुरुद्वारा परिसरात जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण १७ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. यात ८ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं असून, नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्ह्यातल्या ५५ शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

हवामान

नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वारे आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात काल गारांचा पाऊस पडला.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 23 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 23 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...