Friday, 3 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      बदलत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर फक्त कार्यकुशलच नव्हे तर नागरिक-केंद्रित प्रशासनाची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोरासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द

·      राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देण्यासाठी विविध घटकांना प्रोत्साहन

आणि

·      मुस्लिम आरक्षणाबाबत तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

****

देशाच्या वेगानं बदलत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर फक्त कार्यकुशलच नव्हे तर नागरिक-केंद्रित प्रशासनाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कर्मयोगी साधना सप्ताह २०२६ या कार्यक्रमात काल एका चित्रफितीच्या माध्यमातून संबोधित करतांना पंतप्रधानांनी, क्षमता निर्माण आयोग आणि मिशन कर्मयोगी हे प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षांशी सुसंगत, आधुनिक, समर्पित आणि प्रतिसादक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं, नमूद केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिक 'देवो भव' या मूलमंत्राचा अंगिकार करुन सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

संसदेने जनविश्वास विधेयक काल मंजूर केलं. राज्यसभेने काल या विधेयकाला संमती दिली. लोकसभेने हे विधेयक परवा बुधवारीच मंजूर केलं आहे. या विधेयकात, राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने विश्वासाधारित प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणांची तरतूद आहे.

आंध्र प्रदेश पुनर्रचना सुधारणा विधेयक, २०२६’ काल राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. हे विधेयक आंध्रप्रदेशाची राजधानी म्हणून अमरावतीला वैधानिक दर्जा प्रदान करतं.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल विधेयकाला काल लोकसभेची मंजुरी मिळाली. राज्यसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे.

दरम्यान, काही महत्त्वाच्या कायद्यांवर चर्चा करण्यासाठी लोकसभेची या महिन्याच्या १६ तारखेला विशेष बैठक होणार आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी काल सदनात ही माहिती दिली.

****

ग्राहकांना विजेचा प्रीपेड मीटर बसवणं अनिवार्य नसल्याचं ऊर्जामंत्री मनोहर लाल खट्टर यांनी काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. प्रीपेड मीटरच्या सक्तीचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं. मात्र, विजेचं बिल वारंवार थकवणाऱ्यांना 'प्री-पेड मीटर' पद्धत स्वीकारावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

वृत्त वाहिन्यांचे टीआरपी रेटिंग चार आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने पेट्रोरासायनिक उत्पादनांवरचं सीमाशुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत येत्या ३० जूनपर्यंत लागू राहील. प्लास्टिक, वेष्टनं, औषधं, रसायनं, वस्त्रं, वाहनांचे सुटे भाग, खतं आणि इतर औद्योगिक उत्पादनांमधे वापरली जाणारी रसायनं, अशा विविध उत्पादनांचा यात समावेश आहे. सध्याच्या भूराजकीय संघर्षाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर झाला असून त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये या हेतूनं सध्या ही सवलत दिल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं.

****

पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत रावल बोलत होते. स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसंच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचंही, रावल यांनी सांगितलं.

****

राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर संकलनात सुमारे साडे बारा टक्के वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्याने सुमारे अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त करत, देशात अव्वल स्थान पटकावलं.

****

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देण्यासाठी विविध घटकांना प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली नागपूर आणि पुणे महानगरपालिकेतल्या सार्वजनिक वाहतुक उपक्रमांना सुमारे साडे चार कोटी, तर ई वाहन उत्पादक कंपन्यांना सुमारे सात कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचाही सरनाईक यांनी सांगितलं.

****

ख्रीस्ती धर्मियांसाठी पवित्र असा सण ‘गुड फ्राय डे’ आज देशासह जगभरात साजरा केला जात आहे. प्रभु येशु यांच्या बलिदानाचं स्मरण आज केलं जातं. त्यांच्या बलिदानानंतर आध्यात्मिक मुक्तीच्या अनुषंगानं उपवास आणि प्रायश्चित्त तसंच चर्चमध्ये आज प्रार्थना केली जाते. ईस्टर संडेपूर्वीचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.

****

मुस्लीम समाजासाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं पाच टक्के आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं १७ फेब्रुवारी रोजी याविषयीचा शासन निर्णय जारी केला होता. हा निर्णय संविधानाचं उल्लंघन करणारा आणि मुस्लीम समाजाच्या हिताच्या विरोधात असल्याचा दावा करणारी याचिका एका वकिलाने दाखल केली होती. या प्रकरणी राज्य सरकारने पुढच्या तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.

****

बुद्धी आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या हनुमंताचा जन्मोत्सव काल सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. हनुमंताच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दिसून आल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरात हनुमान जन्म सोहळ्यासह अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले.

****

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तसंच विदर्भात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नुकसानाच्या तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश दिले असून, अहवालानंतर नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या बाबत अधिक माहिती देतांना बावनकुळे म्हणाले…

बाईट – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

पुणे शहर आणि परिसराला काल मुसळधार पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. सांगली, सिंधुदुर्ग, गडचिरोली तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातही काल पाऊस झाला.

राज्यात विविध ठिकाणी आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशीव, लातूर तसंच छत्रपती संभाजीनगरसह राज्यात १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

राज्य शासनानं काल सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात छत्रपती संभाजीनगरसाठी आता जिल्हाधिकारी म्हणून दिलिप स्वामी यांच्या जागी विनय गौडा जी.सी. यांची तर, महापालिका आयुक्तपदी जी.श्रीकांत यांच्या जागी अमोल येडगे यांची नियुक्ती झाली आहे. तर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अंकित यांच्या जागी आता मिन्नू पि.एम. रुजु होत आहेत.

लातूरसाठी जिल्हाधिकारीपदी आता वर्षा ठाकूर –घुगे यांच्या जागी डॉक्टर भारत बास्तेवाड तर, जालना महापालिका आयुक्तपदी आता अंजली शर्मा यांची आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कृष्णकांत कंवारिया यांची नियुक्ती झाली आहे.

****

मुंबईत दादर इथल्या अमर हिंद मंडळाचे ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ नुकतेच जाहीर झाले. यंदा या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या ९२ संस्थांमधून ५ संस्थांची निवड करण्यात आली, त्यात छत्रपती संभाजीनगर इथल्या आस्था फाउंडेशनचा तसंच धाराशिवच्या वात्सल्य सामाजिक संस्थेचा समावेश आहे. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

लातूर-मुंबई एक्सप्रेसचा परळीपर्यंत विस्तारित करावा, अशी मागणी, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

परभणी इथं विभागीय महसूल क्रीडा स्पर्धे अंतर्गत काल जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं.

****

बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते काल ऊसतोड कामगारांना ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं. ऊसतोड कामगारांचं सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करणं तसंच त्यांना ओळखपत्र देण्यासाठी शासनाने पुण्याच्या स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केली आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 03 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 03 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...