Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 April 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२५ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व बँकेनं पेटीएम पेमेंट्स
बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. यामुळे पेमेंट्स बँक लिमिटेडला बँकिंग कायद्यानुसार
कुठलेही बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. सध्या बँकेकडे पुरेशी रोख रक्कम असून तिच्या
सर्व ठेवीदारांची देयकं परत करण्याची क्षमता आहे. ठेवीदारांच्या हिताला बाधा आणणाऱ्या
व्यवहारांमुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेचं व्यवस्थापन कार्यक्षम नसल्याचं
आरबीआयच्या अहवालात म्हटलं आहे. ११ मार्च २०२२ पासून पेमेंट्स बँक लिमिटेडला नवी ग्राहक
नोंदणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतरही दोनदा बँकेवर निर्बंध लादण्यात
आले होते.
****
गेल्या १७ एप्रिल रोजी संपलेल्या
आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात २ पूर्णांक ३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. आता
हा साठा ७०३ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. याच कालावधीत विदेशी चलन मालमत्ता १ पूर्णांक
४८ अब्ज डॉलर्सनी वाढून ५५७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सुवर्ण साठ्यातही ७९० दशलक्ष
डॉलर्सची भर पडली आहे. हा सुवर्णसाठा आता
तो १२२ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, विशेष रेखांकन अधिकार ७८ दशलक्ष डॉलर्सनी वाढून १८ पूर्णांक
८४ अब्ज डॉलर्स झाले आहेत. याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील
भारताचा राखीव साठा १४ दशलक्ष डॉलर्सनी वाढून ४ पूर्णांक ८७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला
आहे.
****
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट
कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान मंगळवारी २८ एप्रिल रोजी
मुंबई इथं होणार आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण
यांनी गुप्ता यांना विशेष निमंत्रण पत्र पाठविलं आहे. वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र
राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९०
टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात हिंगोली जिल्ह्यानं उल्लेखनीय
यश संपादन केल्याचं या निमंत्रण पत्रात म्हटलं आहे.
****
परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी
आणि सातवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा उद्या, रविवारी घेण्यात येणार आहे. यासाठी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ५९ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, प्रशासनानं नियोजनाची सर्व तयारी
पूर्ण केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी याबाबत माहिती देताना सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा
उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगितलं.
****
नागपूर इथं काल जागतिक दर्जाच्या
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर
इन्स्टिट्यूट या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत
भूमीपूजन झाले. दरम्यान, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट
परिसरात भारतदुर्गा मंदिराची निर्मिती होत असून, ही शक्तीची मूर्ती देशभरात नवचेतना जागृत करून आपल्या साऱ्यांना
प्रेरणा देईल, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
****
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा
या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महा ऑलिंपिक असून, या स्पर्धेतून पोलीस दलाची ताकद, शिस्त आणि क्रीडा कौशल्य जगासमोर यावं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या
कलिना इथं काल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर
३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या
विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या
या समारंभात स्पर्धामध्ये सहभागी पथकांनी शिस्तबद्ध संचलन केलं. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची यावेळी उपस्थित होती.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमधील
पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय
वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यजमान दक्षिण आफ्रिकेने
मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून, भारतीय संघ आज विजयाचे खाते उघडण्यासाठी
मैदानात उतरेल.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स
आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे. दिल्लीत हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू
होईल. दुसऱ्या सामन्यात, जयपूरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता राजस्थान रॉयल्स
आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येतील.
****
पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील
मतदानानंतर, कोणत्याही मतदान केंद्रावर फेरमतदान
घेण्याची आवश्यकता नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यातील सर्व ४४ हजार
३७६ केंद्रांवर गुरुवारी शांततेत मतदान पार पडलं. त्यामुळे एकाही केंद्रावर पुन्हा
मतदान घेण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.
****
No comments:
Post a Comment