Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
· तामिळनाडू,
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसह बारामती आणि राहुरी विधानसभा
मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण
· पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं सरकारचं
स्पष्टीकरण
· महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून उदयास येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
आणि
· सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेच्या गुण सुधारणेसाठीच्या परीक्षेला १५ मे पासून
सुरूवात
****
तामिळनाडू, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी
आज मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडलं. तमिळनाडूतल्या सर्व २३४ मतदारसंघात
मतदान झालं. यासाठी चार हजार २३ उमेदवार रिंगणात आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तमिळनाडूमध्ये
सुमारे ८२ टक्के मतदान झालं होतं.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या १५२ जागांसाठी
आज मतदान झालं. या टप्प्यात एक हजार ४७८ उमेदवार आहेत. पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी
पाच वाजेपर्यंत ८९ टक्के मतदान झालं होतं.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी
मतदारांना धमकावणं, हिंसा तसंच राजकीय पक्षांच्या बूथ कार्यकर्त्यांवर
हल्ल्याचे प्रकार घडले. निवडणूक आयोगाकडे अशा ४०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. कुमारगंज
इथं भाजपच्या उमेदवारावर हल्ला केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी
विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. बारामतीत विद्यमान उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले हे प्रमुख उमेदवार आहेत. सुनेत्रा पवार यांनी
काटेवाडी इथं मतदान केलं. यावेळी पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही मतदानाचा हक्क
बजावला. तर अक्षय कर्डिले यांनी बुऱ्हानगर येथे मतदान केलं.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारामती मध्ये ५२ पूर्णांक ४४, तर राहुरीत ५० पूर्णांक ६८ टक्के मतदान झालं.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या प्रसारमाध्यमांमध्ये
आलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायू मंत्रालय यांनी स्पष्ट केलं आहे. इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या
विचाराधीन नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशानं
अशा अफवा पसरवल्या जात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे
दर वाढलेले असतानाही, सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकार
आणि सरकारी तेल कंपन्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मंत्रालयाने
दिली आहे.
****
राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी
महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भारतातील डेन्मार्कचे राजदूत
रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी आज मुंबईत फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत राज्यात गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास,
शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या
विषयावर चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक फेरी आणि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तंत्रज्ञानासाठी
डेन्मार्कच्या आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी करण्यास राज्य शासन इच्छुक असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर विरोधकांनी
केलेला जल्लोष लज्जास्पद असल्याची टीका, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अनेक दशकांपासून महिलांना त्यांच्या
हक्कांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं, या विधेयकामुळे देशाच्या
राजकारणात आणि समाजकारणात मोठा सकारात्मक बदल घडेल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विधेयकासाठीचा सरकारचा लढा सुरुच राहील, असं मंत्री पाटील म्हणाले.
****
संसदेत नामंजूर झालेलं सध्याचं महिला आरक्षणाचं विधेयक म्हणजे
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरातल्या महिलांची दिशाभूल असल्याचा
आरोप,
कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केला आहे. ते आज
धुळे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २०२३ मध्ये सर्वानुमते मंजूर झालेल्या विधेयकानुसार
लोकसभेतल्या ५४३ जागांपैकी ३३ टक्के आरक्षण तात्काळ लागू करावं, अशी मागणी त्यांनी केली.
****
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या
निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं, सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात योग्य
संवाद रहावा यासाठी ही भेट होती, असं ते म्हणाले.
****
सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा शासन आदेश जारी करावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. धुळे इथं जिल्ह्यातले सुमारे
१२ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असून आज संपाच्या तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी
शहरातील कल्याण भवनापासून भव्य मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
****
परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या रुद्राक्षणगड किल्ल्याचं
उद्घाटन आणि पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या ३१ वाहनांचं लोकार्पण आज पालकमंत्री
मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. परभणी जिल्ह्यातली पोलिस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण कटिबद्ध आहोत, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या ३१ नवीन वाहनांमुळे गस्त
वाढेल,
प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता
अधिक बळकट होईल,
असं बोर्डीकर यावेळी म्हणाल्या.
****
महाराष्ट्र दिनानिमित्त येत्या एक मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त
आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला.
पोलीस आयुक्त कार्यालयातल्या देवगिरी मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या
सोहळ्याचं नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
****
बीड इथं नवीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली
आहे. यासंदर्भात त्यांनी आज सामंत यांना निवेदन दिलं. येत्या आठवड्यात या विषयावर मंत्रालयस्तरावर
बैठक घेण्याचे निर्देश सामंत यांनी संबंधितांना दिले आहेत.
****
हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ
नेते बळीराम पाटील कोटकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. कोटकर यांनी सुरुवातीला पोलीस पाटील म्हणून आणि नंतर सरपंच
म्हणून काम केलं होतं. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात कारकिर्द केली
होती.
****
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या
परीक्षेच्या गुण सुधारणेसाठीच्या परीक्षेला १५ मे पासून सुरूवात होणार आहे. विज्ञान, गणित,
सामाजिक विज्ञान आणि भाषा विषयात कामगिरी सुधारायची असेल तर
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. १५ एप्रिलला इयत्ता दहावीच्या
नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
****
जागतिक पुस्तक दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर
इथल्या शासकीय विभागीय ग्रंथालय तसंच मॉडर्न संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय
यांच्या संयुक्त भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन सहाय्यक ग्रंथालय संचालक
सुनील हुसे यांच्या हस्ते झालं. आजच्या सामाजिक माध्यमाच्या युगात प्रत्येकाला मोबाईल
मधल्या रील्सचं व्यसन जडलं असून, या व्यसनापासून मुक्त होण्याचा
प्रभावी उपाय म्हणजे पुस्तक वाचन असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
जालना महानगरपालिकेकडून आज जुन्या जालन्यातल्या घाटी रोड आणि
नूतन वसाहत परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात
आली. या कारवाईत एकूण अठरा मांस विक्रेत्यांना नोटीस
बजावण्यात आल्या असून, रस्त्यावरील
वाहतुकीस अडथळा ठरणारे अनधिकृत शेड हटवण्यात आले. संबंधित विक्रेत्यांना अतिक्रमण स्वत:हून
काढण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर
फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या
धोरणांचा निषेध करण्यासाठी नांदेड इथं आज आयटीआय चौकात भाजप महिला मोर्चा आणि युवा
मोर्चाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी
आणि कार्यकर्त मोठ्या संखेने उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात हडसनीजवळ काल रात्री उशीरा
दोन दुचाकी आणि चारचाकीत झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये दुचाकीवरील मुलासह त्याच्या आई आणि आत्याचा समावेश आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे स्वराज्य
संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या ४३२ व्या जयंतीनिमित्त येत्या २७ एप्रिल रोजी छत्रपती
संभाजीनगर इथं स्वराज्य संकल्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भोंडवे पाटील प्रांगणावर
होणारा हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला
आणि विनामूल्य ठेवण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने
उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असं
आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment