Monday, 27 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बेहाला ते मेंटन रोड शो मध्ये सहभाग घेतला. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कल्याणी, धानेखाली, दमदम आणि राजारहाट गोपालपूर येथे रोड शो तसंच जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर या त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी केरळ, तमिळनाडू, आसाम, पुदुचेरी यांच्यासह चार मे रोजी होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज एफटीए अर्थात मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होत आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल तसंच न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूकमंत्री टॉड मॅक्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं हा करार होत आहे. या कराराअंतर्गत पुढल्या पाच वर्षात द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत १०० टक्के उत्पादनांवर शून्य शुल्कासह पोहोच मिळणार आहे. या करारांतर्गत देशात पुढल्या १५ वर्षात २० अब्ज डॉलर्स गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, या कराराच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय संवादाच्या मालिकेअंतर्गत काल आग्रा इथं महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले सहभागी झाले होते. या कराराचा लाभ सर्व एमएसएमई आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्योग मंडळांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

****

आम आदमी पक्षातून आलेल्या सात खासदारांच्या भारतीय जनता पक्षात विलीनीकरणाला राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. या खासदारांमध्ये राघव चढ्ढा, डॉ. अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, स्वाती मालीवाल आणि हरभजन सिंग यांचा समावेश आहे. यामुळे आता राज्यसभेतल्या भाजपच्या खासदारांची संख्या ११३ झाली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सामाजिक माध्यमावर ही माहिती दिली.

****

टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापकस्तरावर जनजागृती, तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जोखीमग्रस्त गावांमधल्या १४ वर्षांवरील सर्व नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात येत असून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावागावांत विशेष शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. २४ मार्च २०२६ पासून आयुष्मान आरोग्य मंदिर इथं सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३६ तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरांमध्ये एकूण ३ हजार ९१७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, संभाव्य क्षयरुग्णांचं लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नागरिकांनी आपल्या गावात होणाऱ्या या शिबिरात सहभागी होऊन तपासणी करुन घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

****

मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकंदर २३ लाख ३० हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणांमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं आज गोसन्मान रॅली काढण्यात आली. गोवंश संरक्षणासाठी कठोर कायदा करण्यात यावा, केंद्रस्तरावर ‘केंद्रीय गो सेवा आणि संरक्षण अधिनियम’ लागू करावा, तसंच गोसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.

****

इंडियन प्रिमियर लिग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरूवात होईल.

****

देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. अनेक भागांमध्ये तापमानानं ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, काही ठिकाणी ते ४५ अंश सेल्सिअसच्याही जवळ पोहोचलं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशात लखनौ, महाराष्ट्रात नागपूर आणि अकोला, ओडिशामध्ये भुवनेश्वर, आणि मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरांमधलं तापमान सामान्य पातळीच्या खूप वर पोहोचलं आहे.

आज विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, बुलढाणा आणि चंद्रपूर इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, असं हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उन्हात जाणं टाळावं, सतत पाणी किंवा ओआरएस प्यावं, सावली तसंच थंड ठिकाणी थाबंण्यास प्राधान्य द्यावं, लहान मुलांची आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 27 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...