Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20 April 2026
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० एप्रिल २०२६ दुपारी १.०० वा.
****
नारी शक्ति वंदन विधेयकात अडथळा
आणल्याबद्दल विरोधी पक्षांना परिणामांना सामोरं जावं लागेल, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू
यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. विधेयक अयशस्वी होण्यासाठी
जबाबदार असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे का, असा सवाल त्यांनी
यावेळी केला. या विधेयकाप्रती सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत, या प्रकरणात सरकार आपले प्रयत्न सुरूच ठेवेल, असं रिजिजू
यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले -
बाईट – संसदीय कामकाज
मंत्री किरेन रिजिजू
****
महिला आरक्षणासाठी जनमताचा रेटा
वाढवण्यासाठी महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
यासाठी राज्यात एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्यासह तालुकास्तरापर्यंत जनजागृती
करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला आरक्षणाला विरोध करून काँग्रेससह शरद पवारांची
राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महिला विरोधी चेहरा उघड झाल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे,
मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसव
जयंती निमित्त जगद्गुरु बसवेश्वर यांना आदरांजली वाहिली आहे. बसवेश्वर यांचा न्याय्य
समाजाबाबतचा दृष्टिकोन आणि लोकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम आपल्याला
सदैव प्रेरणा देत राहतील, असं
पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी
महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केलं. बसवेश्वरांनी समाजात समता, न्याय आणि प्रतिष्ठा यांचा संदेश देत
रूढ व्यवस्थांना आव्हान दिलं, त्यांचा समावेशक आणि मानवतावादी
वारसा आजही अधिक न्याय्य आणि सौहार्दपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक असल्याचं राजनाथ सिंह
यांनी म्हटलं आहे.
देशाच्या काही भागात काल महात्मा
बसवेश्वर जयंती
साजरी झाली.
****
राज्यातल्या प्रत्येक पोलिस ठाण्यात
‘विशेष बाल पोलिस
पथके कक्ष’ स्थापन करण्याची सूचना राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने
पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना केली आहे. आयोगाच्या मुंबईत पार पडलेल्या पहिल्या
बैठकीत विविध यंत्रणांकडून बालस्नेही प्रक्रियेचा अवलंब करण्याबाबत आग्रही भूमिका घेण्यात
आली.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनॅशनल
मेडिटेशन सेंटरचं भूमिपूजन काल शिवसेना नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत
झालं. शरणापूर फाटा परिसरात उभारण्यात येणाऱ्या या भव्य प्रकल्पासाठी २६ कोटी रुपयांचा निधी
उपलब्ध करून देण्यात आला आहे. चार मजली अत्याधुनिक इमारत बांधण्यात येणार असून,
एकावेळी ४ हजार साधक बसू शकतील अशी क्षमता, तीन
विशाल ध्यान हॉल, २०० भंतेजींसाठी निवास व्यवस्था, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन, या केंद्रात
असेल. यामुळे केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक
विकासालाही चालना मिळेल, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भूतानचे गृहमंत्री
ल्योनपो शेरींग, अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चाऊना मीन,
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाने नऊ संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मानसशास्त्र
विभागातल्या विद्यार्थ्यांना आता स्वयंसेवी संस्था, मानसोपचार रुग्णालयं आणि समुपदेशन केंद्रांमध्ये
काम करता येणार आहे. या विभागात ‘एईडी’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, एम.ए. मानसशास्त्र तसंच ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ पदविका कोर्सही उपलब्ध आहेत.
आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘रिहॅबिलिटेशन सायकॉलॉजी’ आणि ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ या विषयांतील
चार नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक
यांच्यात आदान-प्रदान होणार असून, विद्यार्थ्यांना आठ सत्रांपैकी
तीन सत्रांची इंटर्नशिप संबंधित संस्थांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
****
वाशीम जिल्हा परिषदेचे कृषी विकास
अधिकारी अभिजीत देवगिरकर यांना राज्य शासनाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार’
जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांसाठीच्या “खत उपलब्धता
पोर्टल” चं नवीन ‘वाशीम मॉडेल’ विकसित करून, ते संपूर्ण राज्यात यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल
देवगिरकर यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
उद्या नागरी सेवा दिनाच्या औचित्याने मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment