Sunday, 12 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

·      राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

आणि

·      नारीशक्ती वंदन सुधारणा विधेयक एकमतानं मंजूर करा, पंतप्रधानांचं आवाहन, विधेयकासाठी अधिवेशनाचा कालावधी तीन दिवसांनी वाढविला

****

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयमध्ये आज निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. उद्या दुपारी चार वाजता संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर मुंबईत शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. वैविध्यपूर्ण गायकीच्या धनी असलेल्या आशा भोसले यांना केंद्र सरकारनं पद्मविभूषण पुरस्कारानं तर महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवलं होतं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनामुळं संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनानं अतिशय दुःख झालं असून त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासानं सांस्कृतिक वारशाला समृद्ध केलं आहे. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

आशा भोसले यांच्या जाण्यानं भारतीय सिनेसृष्टी, संगीत जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या जादुई आवाजानं प्रत्येक गाणं अजरामर करणाऱ्या आशाताईंच्या कारकीर्दीवर हा एक दृष्टीक्षेप...

आगे भी जाने ना तू पिछे भी जाने ना तू हे गाणंच ज्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान झालं होतं, अशा आशाताईंनी आपल्या अवीट स्वरांनी, संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्य केलं. आठ दशकांच्या सांगितिक कारकीर्दीत तब्बल दहा हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या आशा भोसले यांनी, बालगीतं, भक्तीगीतं, प्रेमगीतं, भावगीतं, लावणी, गजल आणि कॅब्रे, अशा सर्व प्रकारच्या गाण्यांना आपल्या जादुई आवाजाने अनोखा स्वरसाज चढवला.

 

आठ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी १९४३ साली वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी सुरू केलेला गानप्रवास, वयाच्या नव्वदीतही सुरू होता. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, एस डी आणि आर. डी. बर्मन, रोशन आणि राजेश रोशन, इलैया राजा, अनु मलिक, ए. आर. रहमान यांसारख्या संगीतकारांच्या अनेक पिढ्यांसोबत त्यांनी काम केलं. मोहम्मद रफी, मुकेश आणि किशोर कुमार यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंतच्या गायकांसोबत त्यांनी गाणी गायली.

 

१९९७ मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकनही मिळालं होतं. आशा ॲण्ड फ्रेण्डस या अल्बमधून त्यांनी उर्मिला मातोंडकर, संजय दत्त आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली यांच्यासोबत गाण्याचा धाडसी प्रयोगही केला. नव्वदच्या दशकात आलेल्या जानम समझा करो या गैरफिल्मी अल्बमला तसंच आपकी आशा या स्वत: संगीतबद्ध केलेल्या अल्बमला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

 

आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांवर धैर्यानं मात केलेल्या आशाताईंनी पहाडाएवढ्या दु:खांचाही धीराने सामना केला. लौकिकार्थाने इहलोकाचा प्रवास पूर्ण केलेल्या आशाताईंचे सूर मात्र, आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात कायमच सोबत राहतील.. सर्वार्थाने महाराष्ट्राचं भूषण असलेल्या या महाराष्ट्र कन्येला भावपूर्ण आदरांजली...

****

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानं संगीत क्षेत्रातल्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

****

भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळं देशानं एक महान स्वरसम्राज्ञी गमावली अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

****

आशाताई भोसले यांच्या निधनाचं वृत्त वेदनादायी आहे. संगीत क्षेत्रात लता दीदींनी जसे जागतिक स्तरावर देशाचं नाव मोठं केलं, तीच किमया आशाताईंनी सुद्धा साधली. पुढील अनेक वर्षे त्यांची गीते रसिकांच्या मनात घर करून राहणार आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

एका युगाचा अंत झाला असून आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. त्यांचं नसणं हे आयुष्यभर दुःख देणारं आहे, असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं.

****

जेष्ठ गायिका आशाताईंच्या निधनाची वार्ता समजताच मन व्यथित झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत सृष्टीवर मोठी शोककळा निर्माण झाली आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

****

महिला आरक्षण कायदेविषयक, नारीशक्ती वंदन सुधारणा विधेयक संसदेत एकमुखानं मंजूर व्हावं, यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी, लोकसभेसह राज्यसभेतल्या सर्व सभागृह पक्षनेत्यांना पत्र लिहून केलं आहे. संबंधित कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची वेळ आली असून, आगामी २०२९ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणासोबतच व्हायला पाहिजेत असही मोदी यांनी नमूद केलं आहे. सर्व सदस्यांनी या कायद्द्यातील दुरुस्तीच्या मुद्यावर एकजूट होण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आहे. दरम्यान, याचसाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सत्राचा कालावधी वाढवून तीन दिवसांचं विशेष सत्र येत्या १६ ते १८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. महिला आरक्षण अधिनियमाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या वाढून ८१६ होईल. ज्यामध्ये २७३ जागा महिलांसाठी असणार आहेत. या आरक्षणाबाबत २०२३ मध्ये संविधानात दुरुस्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या खासदारांना व्हीप जारी केला असून १६ ते १८ एप्रिल हे तीनही दिवस संसदेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

****

राज्यातील ऊर्जा सुरक्षितेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळं कोळशाचं अवलंबित्व कमी होणार आहे. तसंच पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महानिर्मितीच्या छत्तीसगड राज्यातील गारे पालमा सेक्टर - दोन कोळसा खाणीतून नागपूरमधल्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात येणाऱ्या पहिल्या कोळसा रेल्वेरॅकचं आगमन झालं. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला तसंच त्यांनी कोळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी देखील केली. या खाणीत गेल्या मार्च महिन्यापासून उत्पादन सुरू झाले असून आतापर्यंत ८० हजार ८९५ मेट्रिक टन कोळशाचं उत्पादन झालं असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...