Wednesday, 29 April 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्य सरकारचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर; दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी

·      राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी

·      डॉ नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातला आरोपी शरद कळस्करला जामीन मंजूर

आणि

·      राज्यात उष्माघाताच्या रुग्णात वाढ; अकोल्यात ७२ रुग्णांची नोंद

****

राज्य सरकारने आपलं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. या धोरणांतर्गत राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असून दीड लाखांपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यभरात सहा एआय उत्कृष्टता केंद्रांची स्थापन होणार असून पाच एआय इनोव्हेशन शहरांची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. राज्यात तीनशे कोटी वृक्ष लागवडीकरता महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार आहे.

 

राज्यातल्या दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ, परीक्षा मंडळ, संस्थेला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी, वैद्यकीय तपासणीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.

****

केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये प्रस्तावित सुधारणांची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, उत्सर्जन आणि इंधनाचे प्रकार तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात आले आहेत. यातल्या प्रमुख सुधारणांमध्ये हायड्रोजन इंधनाच्या वर्गीकरणात सुधारणा, वाहनाच्या वजन मर्यादेत वाढ, बायोडिझेल संदर्भात श्रेणीसुधार तसंच उत्सर्जन चाचणी मापदंड आणि तांत्रिक निर्देशांचं प्रमाणीकरण, आदी बाबींचा समावेश आहे.

****

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. आज नवी दिल्ली इथं आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. देशभरात व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा ७० टक्क्यांपर्यंत पूर्ववत झाला असून, ऑनलाइन एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडवर आधारित, घरगुती एलपीजीचा पुरवठाही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ५ किलोच्या सिलिंडरचा पुरवठा जवळपास दुप्पट झाला असून, सुमारे ७३ हजार सिलिंडर काल विकले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ७८ पूर्णांक ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या १४२ मतदारसंघांचा यात समावेश असून, एक हजार ४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज उमेदवाराची घोषणा करण्यात येईल आणि उद्या उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राष्ट्रवादीच्या गाभा समितीची बैठक झाली, त्यानंतर तटकरे यांनी ही माहिती दिली. संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे एकच जागा असून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

भाजपने या निवडणुकीसाठी आपले पाच उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत.

**

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. यासंदर्भात दानवे यांनी आकाशवाणीशी बोलतांना, आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले

बाईट- शिवसेना नेते अंबादास दानवे

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगच्या सरपंच पदी स्वरुपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे. देशमुख यांनी, दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला. संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निघृण हत्या झाल्यानंतर हे सरपंचपद रिक्त होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज उत्तर प्रदेशामधल्या हरदोई जिल्ह्यात ३६ कोटी २३० लाख रुपये खर्चाच्या ५९४ किलोमीटर लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन झालं.

हजारो वर्षांपासून गंगा नदी उत्तर प्रदेशाची जीवनरेखा आहे, तसंच गंगा द्रुतगती महामार्गामुळे राज्याच्या विकासाची नवी जीवनरेखा ठरेल, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी महामार्गाच्या उद्घाटनानंतर हरदोई इथं घेतलेल्या सभेत केलं. या द्रुतगती महामार्गामुळे राज्यातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा होईल. तसंच औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स, शेतीमालाची विक्री आणि प्रादेशिक समतोल विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आज सकाळी पंतप्रधानांनी वाराणसी इथं रोड शो केला. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात विधीवत पूजा केली.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींपैकी एक असलेल्या शरद कळस्करला मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि आर. आर. भोसले यांच्या पीठानं हा आदेश दिला. ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात नरेंद्र दाभोळकर, यांची सकाळी गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांनी केला होता, त्यानंतर २०१४ मध्ये हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलं. सीबीआयनं २०१६ ते २०१९ दरम्यान आरोपींना अटक केली आणि त्यांच्यावर खून, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा आणि शस्त्र कायदा यांसारख्या कलमांखाली आरोप ठेवले.

****

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १४ रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये ६, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी ४, तर अहिल्यानगरमध्ये ३ रुग्णांची नोंद झाली. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे इथं प्रत्येकी २, तर अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग बारकाईनं लक्ष ठेवून आहे. संपूर्ण विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि लातूर इथली दयानंद शिक्षण संस्था यांच्यामध्ये आज शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशानं शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धतीची देवाण-घेवाण होणार आहे. या कराराद्वारे अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर नजिक आज एका अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. मुंबई नागपूर महामार्गावरील पुरणगाव रस्त्यावर स्टीलची वाहतूक करणारा आयशर ट्रक आणि दुधाची वाहतूक करणारा एक टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातील तिरुपती एंटरप्राइजेस या प्लास्टिक कंपनीच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. या आगीत प्लास्टिक निर्मितीसाठी कच्चा माल खाक झाला आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...