Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
April 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ एप्रिल २०२६ दुपारी १.००
वा.
****
विधानमंडळांमध्ये महिलांसाठी आरक्षण हे अधिक बळकट आणि
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. महिला आरक्षण विधेयकावर त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये लेख प्रसारित केले, तसंच सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित केला. महिलांना
३३ टक्के प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्याच्या
उद्देशाने सरकारने १६ ते १८ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय विशेष संसदीय अधिवेशन बोलावलं
आहे.
या आरक्षणाच्या अंमलबजावणीस होणारा कोणताही विलंब अत्यंत
दुर्दैवी ठरेल, असं पंतप्रधानांनी आपल्या लेखात
म्हटलं आहे. ते यासंदर्भात म्हणाले,
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास निम्मा वाटा महिलांचा आहे
आणि राष्ट्राच्या उभारणीत त्यांचं योगदान अमूल्य असल्याचं पंतप्रधानांनी या लेखात नमूद
केलं. विधिमंडळांमध्ये महिलांना देण्यात आलेलं आरक्षण हे देशाच्या कोट्यवधी महिलांच्या
आकांक्षांचं प्रतिबिंब असल्याचं सांगून त्यांनी, 'जेव्हा महिलांची प्रगती होते, तेव्हाच समाजाचीही प्रगती होते,' असं नमूद केलं. जेव्हा महिला प्रशासकीय आणि निर्णय प्रक्रियेत
सहभागी होतात, तेव्हा त्या आपल्या अनुभवांतून आणि
दृष्टिकोनातून प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
****
केरलम्, आसाम आणि पुदुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज
मतदान होत आहे. केरलम् मध्ये १४० मतदारसंघात मतदान सुरळीत सुरु असून, राज्यातल्या ३० हजार ४९५ मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा
व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ११ वाजेपर्यंत राज्यात ३३ पूर्णांक २८ टक्के मतदानाची
नोंद झाली. आसाममध्ये १२६ जागांसाठी ही निवडणुक होत असून, ११ वाजेपर्यंत ३८ पूर्णांक ९२ टक्के, तर पुदुचेरी मधल्या ३० जागांसाठी ३७ पूर्णांक ०६ टक्के
मतदान झालं.
****
ग्रीन आशा हे एलपीजीचा साठा असलेलं भारतीय जहाज आज मुंबई
इथं जवाहरलाल नेहरु बंदरात दाखल झालं. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष सुरू झाल्यानंतर जेएनपीएमध्ये
पोहोचणारं हे पहिलंच जहाज आहे. या जहाजामध्ये १५ हजार ४०० टन एलपीजी वाहून आणण्यात
आला आहे. जहाजावरील सामग्री आणि सर्व कर्मचारी सुरक्षितरित्या पोहचल्याचं बंदर प्राधिकरणानं
प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून निवडून आलेले पार्थ पवार
यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन
यांनी त्यांनी शपथ दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होत्या.
****
पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे जागतिक हवाई
वाहतुक क्षेत्रासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी हवाई
वाहतुक मंत्रालयानं आणखी एक महत्वाचा निर्णय घेत देशांतर्गत वाहतुक कंपन्यांसाठी तीन
महिन्यांकरता लँडिंग आणि पार्किंग शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरी हवाई वाहतुक मंत्री राममोहन नायडू यांनी यासंदर्भात माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात रेणापूर जवळ झालेल्या भीषण अपघातात बीड
जिल्ह्यातल्या केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील
रेणापूरजवळील पिंपळ फाटा इथं आज सकाळी हा अपघात झाला.
****
अकोला जिल्ह्यातल्या १०८ आपले सरकार केंद्रांवर कारवाई
करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्या आदेशावरुन 'आपले सरकार सेवा केंद्र' आणि 'आधार सेवा केंद्रां'ची सखोल पडताळणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये केंद्र त्यांच्या नियोजित ठिकाणी
कार्यरत नसणं, सेवा गुणवत्तेमध्ये त्रुटी, नागरिकांना वेळेत सेवा न मिळणं अशा गंभीर बाबी आढळल्यामुळे
ही कारवाई करण्यात आली.
****
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींत असलेल्या नाशिक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य शासनाने ६७२ कोटी रुपयांच्या
भरीव भांडवली मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातल्या शेती आणि ग्रामीण
अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या या बँकेला नवसंजीवनी मिळणार आहे. बँकेची विस्कटलेली
आर्थिक घडी बसवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा
धोरणात्मक युनिटच्या सहकार्याने एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला होता. थकीत
कर्ज आणि एनपीएमुळे बँक अडचणीत आली होती आणि त्यामुळे कर्जवाटप प्रक्रिया मंदावली होती.
****
No comments:
Post a Comment