Friday, 3 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

सागरी सार्वभौमत्व टिकवण्यासाठी समर्पित असलेली 'तारागिरी' ही युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल होत आहे. तारागिरीला ताफ्यात दाखल करण्याचा सोहळा विशाखापट्टणम् इथं होणार असून, या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहतील. तारागिरी ही नौदलाची स्वदेशी बनावटीची रडारला चकवा देण्याची क्षमता असलेली युद्धनौका आहे. भारताचं सागरी सार्वभौमत्व निश्चित करण्यात तारागिरी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ती आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांचं प्रतीक आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे. काही भागांत पसरणाऱ्या अफवांमुळे नागरिक घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात इंधन, गॅस खरेदी करत असल्याचं समोर आलं आहे. या अफवांना आळा घालण्यासाठी माध्यमांद्वारे वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करावी, अशा सूचना डॉक्टर मित्तल यांनी दिल्या आहेत. देशातील सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून कच्च्या तेलासह पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं, तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राष्ट्रीय परीक्षा संस्था- ‘एनटीए’मार्फत ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या 'संयुक्त प्रवेश परीक्षा' म्हणजेच जे.ई.ई. (मेन) च्या दुसऱ्या सत्राला कालपासून सुरुवात झाली आहे. ८ एप्रिलपर्यंत चालणारी ही परीक्षा देशातील ३०४ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये सुमारे ५६६ परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षेसाठी सुमारे ११ लाख २३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्यान, सौदी अरेबियातही ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे.

****

कोल्हापुरात जोतिबाची चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा संपन्न होतो. त्यानुसार, काल रात्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला. रथोत्सव मार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात आला, तर गुजरी कॉर्नर इथं अंबाबाईचा रथ आल्यावर फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली.

****

निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार २०२४ च्या मतदार यादीतील नावांचं २००२ च्या यादीशी जुळवणी केली जात आहे. त्यानुसार, अकोला पूर्व-पश्चिम मतदारसंघात मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक ठिकाणचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-‘बीएलओ’ ऐन उन्हात घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराच्या नावाची २००२ च्या मतदार यादीशी जुळवणी करत आहेत तसंच मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्रे, चुकीच्या तपशीलाची दुरुस्ती केली जात आहेत.

****

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त काल लातूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. समाजातील स्वमग्नतेबाबतची उदासीनता दूर करून जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत अधिकारी आणि नागरिकांना 'निळी रिबीन' बांधून स्वीकृतीचा संदेश दिला.

****

भंडारा इथं नवीन श्रम धोरणाविरोधात आज विविध कामगार संघटनांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. डी-टू युनियन आणि भारतीय प्रतिरक्षा मजूर संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्राच्या धोरणामुळे कामगारांचे हक्क धोक्यात आल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला. आठ तासांच्या कामाच्या मर्यादेत वाढ, नोकरीतील असुरक्षितता आणि ठेकेदारी पद्धतीला चालना या बाबींवर यावेळी संघटनांनी निषेध व्यक्त केला तसंच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही कामगार संघटनांनी यावेळी दिला.

****

भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या उमरझरी इथं नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया रामकृष्ण सोनवाने या ५५ वर्षीय महिलेचा आज नागपूर इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरवड्यातच नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील लाखनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बाम्पेवाडा, उमरझरी आणि आमगाव बुज अशा लागोपाठ तीन ठिकाणी तिघांवर या नरभक्षक वाघाने जीवघेणे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात बांपेवाडा इथल्या वसंत मेश्राम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

****

मालदीवमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या २० वर्षांखालील सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज विजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. चार वेळचा विजेता असलेल्या भारताचं पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याचं लक्ष्य आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...