Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 April
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· पंतप्रधानांच्या
अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक, पेट्रोलियम उत्पादनांची उपलब्धता
सुनिश्चित करण्यावर भर
· जनगणनेच्या
पहिल्या टप्प्याला सुरुवात, प्रथमच डिजिटल पद्धतीनं जनगणना
· महाराष्ट्र
राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· जालना जिल्ह्यात
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू
आणि
· पुढील चार
दिवस बहुतांश जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा
****
पश्चिम आशियात सुरू असलेल्या
संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्याच्या उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची विशेष बैठक
पार पडली. पेट्रोलियम उत्पादने, विशेषतः एलएनजी आणि एलपीजी, यांचा पुरवठा आणि विजेची पुरेशी
उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत कॅबिनेट सचिवांनी यावेळी
माहिती दिली. पंतप्रधानांनी सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने
उपलब्धतेचा आढावा घेतला. त्यांनी देशात खतांच्या उपलब्धतेसंबंधी तसंच, खरीप आणि
रब्बी हंगामासाठी खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उचलल्या जात असलेल्या पावलांबद्दलच
चर्चा केली. या संघर्षाच्या परिणामांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व
प्रयत्न केले जावेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
देशाच्या महाजनगणनेला काल
सुरुवात झाली. पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणनेवर भर देण्यात आला आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची माहिती
पोर्टलवर भरून या मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांना आता १६ भाषांमध्ये ऑनलाइन माहिती
नोंदवता येणार आहे. नागरीकांनी एस ई डॉट सेन्सस डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवर
आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवून या राष्ट्रीय प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
जन विश्वास सुधारण विधेयक
काल लोकसभेत मंजूर झालं. गुन्ह्यांचं तर्कसंगत वर्गीकरण करण्यासाठी काही विद्यमान कायद्यांमध्ये
सुधारणा करण्याची तरतूद या विधेयकात आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरूनही खटले दाखल केले
जातात; मात्र या विधेयकात शिक्षेऐवजी न्याय मिळवून देणाऱ्या तरतुदींचा समावेश असल्याचं, वाणिज्य
आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. भारतीयांवर
राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी लागू केलेले जुने कायदे हे विधेयक रद्द करतं, असं ते
म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन
प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याअंतर्गत राज्यातल्या
५४ नदी प्रदुषित पट्ट्यांमध्ये पूनरूज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या प्राधिकरणासाठी आवश्यक
दोन हजार कोटी रुपयांचा निधी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून उभारण्यास, तसंच शासनाचं
योगदान म्हणून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.
भूमि अभिलेख विभागात गट क
संवर्गातलं भूकमापक हे पद रद्द करून, परिरक्षण भूमापक असं पद निर्माण
करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही पदे रद्द करण्यात आलेल्या भूकमापक
संवर्गातून नियमित पदोन्नतीने आणि विभागीय परीक्षेद्वारे प्रत्येकी ४० टक्के आणि सरळसेवेने
२० टक्के या प्रमाणात भरली जातील.
अहिल्यानगर जिल्ह्यात चिखली
तालुक्यातल्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी एक हजार २३४ कोटी १३ लाख रुपयांच्या तरतुदीस
मान्यता, तसंच राज्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण
निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
राज्य परिवहन महामंडळ -एसटीच्या
वतीने सुरू करण्यात आलेल्या सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं काल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत प्रवाशांना आधार क्रमांकाशी
संलग्न स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार असून, या माध्यमातून प्रवाशांना
एसटी बस प्रवासातल्या सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार आहे.
****
यंदाच्या खरीप हंगामासाठी
एप्रिल आणि मे महिन्यातच खतांचा पुरेसा साठा करता यावा, या दृष्टीने कृषी विभागानं
काटेकोरपणे नियोजन करावं असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्यातली खतांची उपलब्धता आणि नियोजनाचा आढावा
घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. युद्धजन्य परिस्थितीत खतांच्या पुरवठ्यावर
परिणाम होवू नये यासाठी कृषि विभाग योग्य ती काळजी घेत असून, रासायनिक
खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यावर, आणि जैविक खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल, असं ते
यावेळी म्हणाले.
****
भाजप आमदार शिवाजी कर्डिले
यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने
त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक
येत्या २३ एप्रिलला होणार आहे.
****
समृद्धी महामार्गावर एका पिकअप
वाहनाला जालना जिल्ह्यात कडवंची शिवारात पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने धडक दिल्यामुळे
झालेल्या अपघातात आठ महिला ठार झाल्या, तर चालकासह अन्य एकजण जखमी
झाला. ही दुर्घटना काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला घडली. पिकअप वाहनात असलेले
सर्वजण बदनापूर तालुक्यातल्या खादगाव आणि केळी गव्हाण इथले मूळ रहिवासी असून, समृद्धी
महामार्गांवर काम करणारे मजूर होते, अशी माहिती पोलीसांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, या अपघातातल्या मृतांच्या
वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.
****
हनुमान जयंती आज सर्वत्र साजरी
होत आहे. ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या
उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिरात
हनुमान जन्म सोहळ्यासह अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. काल रात्रीपासूनच भाविकांनी
याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. उद्यापर्यंत खुलताबाद इथं जाणाऱ्या
मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मार्गात बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सुपारी हनुमान मंदिरातही
जन्मोत्सव, महाप्रसादासह विविध कार्यक्रम होत आहेत.
****
मराठवाड्यात अनेक भागात कालही
अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात तसंच पैठण तालुक्यात काल संध्याकाळच्या
सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या
काही भागातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे गरसुळी, पळशी आणि
तत्तापूर शिवारातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या
बहुतांश भागात काल मेघगर्जनेसह पाऊस झाला.
****
दरम्यान, राज्यात
पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य
महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता असून, हवामान
विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये
आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस
हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामं नियोजित करावीत. काढणी केलेली पिकं सुरक्षित
ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन
कृषी विभागानं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
लाडगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव या अभियानाचा
जिल्हास्तरीय शुभारंभ काल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते झाला.
हे अभियान केवळ सरकारी उपक्रम न राहता लोकसहभागातून व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा शासनाचा
मानस असल्याचं धानोरकर यांनी सांगितलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक
गावात १४ वर्षांच्या मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाला प्राधान्य देणार
असल्याचं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी सांगितलं. त्या काल धाराशिव
इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. क्षयरोगमुक्त जिल्हा यासोबतच अंगणवाडी पोषण आहाराचा
दर्जा उंचावण्यासह, प्रत्येक गावात
पाच महिला उद्योजिका तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये
सेमी इंग्रजी पॅटर्न जून पासून लागू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामं कालबद्ध कार्यक्रम राबवून पूर्ण करावी, असे निर्देश
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भातल्या आढावा
बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात एकूण एक हजार २४४ गावांसाठी, एक हजार
१६४ योजना मंजूर असून त्यापैकी ७०२ योजना पूर्ण झाल्या असल्याची माहीती स्वामी यांनी
दिली.
****
धाराशिव इथल्या माध्यमिक शिक्षण
विभागातल्या वेतन आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयातला इमरान खान अहमद पाशा पठाण याला
आठ हजार रुपये लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. वेतनाचा फरक काढून देण्यासाठी त्याने
लाचेची मागणी केली होती.
****
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात
काल आंतरराष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत यश मिळवणाऱ्या चेतन सपकाळ यांचा जिल्हाधिकारी कीर्ती
किरण पुजार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चेतन याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय
यश मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
****
बीडचे जिल्हाधिकारी विवेक
जॉन्सन यांच्या अधिकारात असणाऱ्या वर्षातल्या तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या
आहेत. त्यानुसार चालु वर्षात ३१ ऑगस्ट तिसऱ्या श्रावणी सोमवारी, १८ सप्टेंबरला
ज्येष्ठगौरी पूजनानिमित्त आणि सहा नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी निमित्त जिल्ह्यात सुटी
राहणार आहे.
****
No comments:
Post a Comment