Wednesday, 1 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

सरकारनं आजपासून सुरू होत असलेल्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात विचारण्यात येणारे ३३ प्रश्न काल अधिसूचित केले. जगातील ही सर्वात मोठी जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार असून प्रथमच ती डिजिटल स्वरुपात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुरुवातीला घरांची गणना आणि घरांचं सूचीकरण करण्यात येणार आहे. त्यात घराचा क्रमांक, मजला, घराची स्थिती आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या अशा माहितीचा समावेश असेल. पहिल्या टप्प्याचा अवधी आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत ठरवण्यात आला आहे. यामध्ये स्व-गणनेचाही समावेश असून स्व-गणना पोर्टल १६ भाषांमधून उपलब्ध असेल, असंही जनगणना आयुक्तांनी नमूद केलं.

****

देशात आजपासून ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६’ लागू होणार आहे. या नियमानुसार घनकचऱ्याच्या उगमस्थानीच ओला कचरा, सुका कचरा, जैविक कचरा आणि विशेष काळजी आवश्यक असलेला कचरा, अशा चार गटात वर्गीकरण, अनिवार्य केलेलं आहे.

****

तेल विपणन कंपन्यांनी महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १९५ रूपये ५० पैशांनी वाढ केली आहे. आता या सिलेंडरची किंमत दोन हजार अठ्ठयाहत्तर रूपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे हे दर आजपासून लागू झाले आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

****

भारतीय वंशाच्या कॅनेडियन-अमेरिकन लेखिका आणि अनुवादिका पद्मा विश्वनाथन यांची २०२६ च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ब्राझिलियन लेखिका अॅना पाउला माया यांच्या 'ऑन अर्थ अॅज इट इज बिनीथ' या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. पन्नास हजार पौंड असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

***

साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले विविध २४ भाषांसाठीचे साहित्य पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. मराठी  भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार, लेखक राजू बाविस्कर यांनाकाळ्यानिळ्या रेषा या आत्मकथेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

गडचिरोली इथं काल नऊ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारताचं संविधान देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांच्यावर एकूण ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रिय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते. सध्या जिल्ह्यात सहा सशस्त्र नक्षली शिल्लक असल्याचं पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी इथल्या सजगिर महाराज यांच्या यात्रेत काल रक्तदान शिबिर, तसंच कुस्त्यांची दंगलही पार पडली. काल या यात्रेत तब्बल १०० क्विंटल भाजीपासून तयार केलेल्या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

देशातून २०२७ पर्यंत हत्तीरोगाचं निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात राज्य शासनानं सक्रिय सहभाग घेतला आहे. यासाठी ट्रिपल ड्रग थेरपी अर्थात तीन औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यात लातूर, धाराशीवसह एकूण अठरा जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात ५५ लाख नागरिकांना या रोगावरील औषधोपचारांचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

महिलांच्या लैंगिक छळप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या मुलाला काल शिर्डी पोलीसांनी अटक केली. शिर्डी येथील एका जमीन व्यवहारात आरोपी म्हणून खरात याच्या पत्नीचं नाव दाखल झालं, त्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली.  मात्र, अशोक खरात याची पत्नी कल्पना ही फरार झाली असून तिचा शोध अद्याप सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात या महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. या महिन्याच्या दर बुधवारी होणाऱ्या या कार्यशाळेत आज पेरणीपूर्व तंत्रज्ञान, या विषययावर कृषी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. या कार्यशाळेचं प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद च्या युट्युब चॅनेलवर केलं जाणार आहे.

****

इंडीयन प्रिमियर लिग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. लखनऊ इथं संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरूवात होईल. काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं गुजरात टायटन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...