Friday, 2 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकांची कमाई केली. बॉक्सिंगमध्ये, लोव्हलिना बोरगोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले; तिने अंतिम फेरीत चीनच्या बाओ झियीचा ५-० पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी लव्हलिना ही मेरी कोमनंतरची दुसरी भारतीय महिला ठरली. महिला रिकर्व्ह तीरंदाजी संघानं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोद या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव केला.

भारतानं मिश्र रिकर्व्ह सांघिक तीरंदाजी प्रकारातही रौप्यपदक मिळवले. कुमकुम मोहोद आणि धीरज बोम्मादेवरा या भारतीय जोडीला चीनविरुद्धच्या अंतिम सामन्यात ३-५ असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या रिकर्व्ह तीरंदाजी सांघिक प्रकारात भारतानं रौप्यपदक जिंकलं. धीरज बोम्मादेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाचा अंतिम फेरीत दक्षिण कोरियाकडून १-५ असा पराभव झाला. नौकायन प्रकारात, नेत्रा कुमाननने महिलांच्या 'डिंगी' प्रकारात कांस्यपदक पटकावलं. स्पर्धेत १२ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३४ कांस्य पदकांसह भारत एकूण ७१ पदकांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. यानिमित्त देशभरात आणि परदेशातील भारतीय दूतावासांमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या राजघाट येथील स्मारकावर सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील ‘राजघाट’ इथल्या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. विकसित भारत'च्या ध्येयासाठी बापूंचे विचार सदैव मार्गदर्शक ठरले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावरील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह, एल. मुरुगन यांनी ‘संविधान सदन’ इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तसंच खासदार, संसदेचे वरिष्ठ अधिकारी आणि शालेय विद्यार्थ्यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दुबईहून तेल अवीवकडं जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानातील आपत्कालीन घटनेदरम्यान कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेल्या धैर्याचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. या घटनेत सहवैमानिकाकडून झालेल्या हल्ल्याचा सामना करताना कॅप्टन मच्छर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे विमानातील १८० प्रवाशांचे प्राण वाचले.

****

आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली येथील आकाशवाणी मुख्यालयात ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली, तसेच परिसरातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केले. यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस. सुब्रमण्यन यांची उपस्थिती होती.

***

महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेंतर्गत नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत आतापर्यंत ७४ हजार ७९४ कृषीपंप बसवण्यात आले आहेत. या योजनेसह प्रधानमंत्री मोफत सौरघर, स्वंयपूर्ण महाराष्ट्र अवासीय सौरघर योजनेच्या जनजागृतीसाठी महावितरणतर्फे १७ ऑक्टोबरपर्यंत परिमंडलात तालुकास्तरावर सेवासंकल्प अभियानही राबवण्यात येत आहे.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...