Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
देशभरातून अभिवादन
· वैमानिक कॅप्टन स्मित माच्छर यांच्या धाडसाचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्याकडून कौतुक
· एक हजार दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे
प्रशासनाला निर्देश
· अचूक पंचनामे करून अधिकाधिक मोबदला देण्यासाठी प्रयत्नशील-महसूल
मंत्र्यांची ग्वाही
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत सोळा सुवर्णपदकांसह भारताची पदकतालिकेत
पाचव्या स्थानी झेप
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७व्या जयंतीनिमित्त तसंच
दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं
कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी
संस्था संघटनामधून या दोन्ही राष्ट्रपुरुषांना आदराजंली वाहण्यात आली.
दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या राजघाट इथल्या समाधी परिसरात
सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील 'राजघाट'
इथल्या गांधीजींच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. विकसित भारत'च्या ध्येयासाठी बापूंचे विचार सदैव मार्गदर्शक ठरले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी
म्हटलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
सी पी राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गांधीजी तसंच शास्त्रीजींना आदरांजली
वाहिली.
राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि
लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांच्या
जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात झालेल्या स्वच्छता अभियानात मंत्री मंगलप्रभात
लोढा सहभागी झाले होते. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात
आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं महापौर समीर राजूरकर आणि स्थायी समिती
सभापती अनिल मकरीये यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं. महानगरपालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती अनिल मकरीये आणि मनपा आयुक्त अमोल
येडगे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण
केली.
‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने
शहरातील सुमारे ४० प्रमुख ठिकाणी एकाचवेळी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक
छत्रपती संभाजीनगरचा संदेश देण्यात आला.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गांधीजी आणि शास्त्रीजींची
जयंती साजरी करण्यात आली. नांदेड-वाघाळा महापालिकेतर्फे महापुरुषांच्या जयंती निमित्त
त्यांना अभिवादन करण्यात आलं. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम घेण्यात
आला.
****
वैमानिक कॅप्टन स्मित माच्छर यांचं धाडस आणि प्रसंगावधान यामुळे
केवळ संबंधित विमान प्रवासी बचावले नसून, १४० कोटी भारतीयांचा
मान वाढल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज पंतप्रधानांनी
कॅप्टन स्मित यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत, त्यांच्या
प्रकृतीची चौकशी केली, संपूर्ण देशाला स्मित यांचा अभिमान असल्याचं
पंतप्रधान म्हणाले. स्मित यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या दोघांमध्ये झालेल्या
संवादाचा हा संपादित अंश –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅप्टन स्मित माच्छर
****
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला-बालविकास
विभागानं संयुक्तपणे एक हजार दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. या मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडण्याची
सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता
माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
मुंबईत झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८ लाख
५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून
२ लाख ९१ हजाराहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विमान तंत्रज्ञान, संरक्षण,
ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी १० करार
यात आहेत. डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर
क्षेत्रात ४ लाख १५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे. तर ऊर्जा, बॅटरी,
कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात १ लाख कोटीहून अधिक रकमेच्या
गुंतवणुकीचे करार झाले. याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रामधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीनं प्रवाशांसाठीचा ‘आवडेल तेथे
कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे
प्रवाशांना आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता राहणार नसून, घरबसल्या ऑनलाइन पास मिळवता येणार आहे.यासंदर्भातील परिपत्रकानुसार, चार आणि सात दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू झाली असून महामंडळ अधिकृत
संकेतस्थळासह मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.अशा पासवर QR कोडही देण्यात येणार आहे त्याद्वारे संबधीत पडताळणी होईल.
****
दुष्काळग्रस्त शेतीचे अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिकाधिक
मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही, महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेकटा मंडळात
पीक स्थितीची पाहणी केल्यानंतर बावनकुळे बोलत होते. पाण्याअभावी करपून गेलेल्या पिकांचे
तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, हे काम प्रगतीपथावर आहे.
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, यासाठी शासनाचे प्रयत्न
सुरू असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान, छत्रपती
संभाजीनगर पाठोपाठ जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातही महसूल मंत्री बावनकुळे आज
प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यात मौजे कुशावाडी इथं जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नोंदणी - अचूकता याबाबत पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी देगलूर तालुक्यातील
सर्व प्रशासकीय प्रमुखांची आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
****
जपानमध्ये आईची नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत
भारत आता सोळा सुवर्णपदकांसह एकूण ७६ पदकं जिंकून पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला
आहे.
नुकत्याच झालेल्या हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने
चीनच्या संघाचा एक शून्यने पराभव केला.
कुस्तीपटू सुजीत कलकल याने पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी
गटात तर मुष्टियुद्धात अंकुश पंघालने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात, परवीन हुडा हिने महिलांच्या ६५ किलो वजनी गटात तसंच लवलिना बोरगोहेन हिने महिलांच्या
७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं.
महिलांच्या रिकर्व्ह तिरंदाजी संघाने दक्षिण कोरियाचा ५-३ असा
पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व्ह संघाला मात्र, अंतिम फेरीत दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे
लागलं. छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई केंद्रात प्रशिक्षण
घेतलेल्या यशदीप भोगे याने धीरज बोम्मदेवरा आणि नीरज चौहान यांच्या साथीने ही
कामगिरी केली. रिकर्व्ह मिश्र सांघिक तीरंदाजी प्रकारातही भारताने रौप्यपदक
पटकावलं.
किक व्हॉलीबॉलच्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव पत्करावा लागल्याने
भारताच्या पुरुष गटाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या डिंगी सेलिंग
प्रकारात नेत्रा कुमाननने कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत आतापर्यंत १६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३५कांस्य पदकांसह भारताने एकूण ७६ पदकं पटकावली आहेत.
****
‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजना राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. महावितरणतर्फे
राबवण्यात येत असलेल्या या योजनेची नांदेड परिमंडलातही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
परभणी जिल्ह्यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सेवा सेतूमार्फत सेवासंकल्प अभियानही
राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार १२१ सौर कृषीपंप बसवण्यात आले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्वच्छता, आरोग्य,
शिक्षण, पोषण, वृक्षारोपण तसंच नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती - लाभ मिळवून देण्यासाठी
विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यासोबतच ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमही जिल्ह्यात राबवण्यात
येत आहे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी
ही माहिती दिली. यातील अंगणवाडी उत्सवांतर्गत
जिल्ह्यातील ५०२ अंगणवाड्यांमध्ये उपक्रम घेण्यात आले.
****
नांदेड नजिकच्या विष्णुपुरी प्रकल्पातील अन्तेश्वर उच्च पातळी
बंधारा,
विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा तसंच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातील
संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पाण्याचा उपसा रोखण्यासाठी
शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
****
लातूर जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ५४ टक्के इतकाच
पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा
पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी
चारा उपलब्धतेच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. ते आज जिल्ह्यातील
पाणी आणि चाराविषयक आढावा बैठकीत बोलत होते. लातूर शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे
गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा
काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री भोसले यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील भूजल पातळी वाढवून जलसुरक्षा निर्माण करण्यासाठी
सार्वजनिक तसेच ग्रामीण भागात १० हजार लहान जलसाठे निर्माण करण्याचं नियोजन असल्याचं
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं आहे. हिंगोली इथं ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प
मंडळ कार्यालयात ‘जल सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ आज जलपूजनानं झाला, यावेळी ते बोलत होते.
****
NEET
पेपरफुटी प्रकरणाकडे अभिजीत दीपके आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून
दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत लातूरच्या महात्मा गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात
आलं. यावेळी अभिजीत दीपके यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
****
हवामान
कोकणातल्या बहुतांश भागांना आजपासून पुढचे तीन दिवस पावसाचा
यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment