Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याचे
केंद्र सरकारचे निर्देश
· दिल्लीत आंदोलनासाठी जंतरमंतर मैदान वापरण्यास मनाई-पर्यायी
इतर मैदानांची नावे निश्चित
· विरोधकांकडून न्यायसंस्थेची प्रतिमा मलीन-सर्वोच्च न्यायालयावरील
मोर्चावर मुख्यमंत्र्यांची टीका
· आयएनएस मंग्रोल ही पाणबुडीरोधक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात
दाखल
आणि
· ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं पुण्यात दीर्घ आजाराने
निधन
****
रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा आणि उपचारांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित
करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहे. आरोग्यसेवेतील नियमांचं प्रभावीपणे पालन
करून पारदर्शकता वाढवणं, रुग्णांना माहितीपूर्ण निर्णय
घेता यावेत आणि देयकांशी संबंधित वाद कमी व्हावेत, यासाठी
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना
पत्र लिहिलं आहे. वैद्यकीय आणि आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठी उपचारांच्या
पॅकेजचे दर पारदर्शकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही केंद्र सरकारनं
केली आहे.
****
दिल्लीतील जंतरमंतर मैदान आंदोलनासाठी वापरण्यास केंद्रीय गृह
मंत्रालयानं मनाई केली आहे. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार
आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरची अधिसूचना रद्द करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयानं
नागरिकांना आंदोलन आणि निदर्शनं करण्यासाठी सध्याच्या निर्धारित स्थळाला पर्याय म्हणून
योग्य ठिकाणांची निवड करण्याबाबत विचार करण्यासाठी या समितीची स्थापना केली होती. जंतरमंतरऐवजी, रामलीला मैदान, बुबारी मैदान आणि सीबीडी मैदान ही तीन नवीन
ठिकाणं आंदोलन आणि निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. या तीन ठिकाणी आंदोलन आणि
निदर्शनं आयोजित करण्यासाठीची सविस्तर सुधारित मानक कार्यपद्धती स्वतंत्रपणे जारी केली
जाईल असं मंत्रालयानं कळवलं आहे.
****
देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा आणि नागरिकांचा
त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विरोधी पक्षांनी सर्वोच्च
न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना निवेदन स्वीकारण्याच्या
आग्रही मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते. अशा प्रकारे
सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे घटनाविरोधी असून, विरोधकांचा
राज्यघटनेवर विश्वास नाही, हेच यातून सिद्ध होतं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल
गांधी यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयावर हा मोर्चा काढण्यात आला. मात्र मात्र
सरन्यायाधीशांनी या मोर्चेकऱ्यांना भेटायला नकार दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या
मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी
मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तरुणांनी स्वाक्षरी करून सहभाग नोंदवला.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरात तोंडावर
काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात सहभागी आमदार अंबादास दानवेंसह
इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करुन सोडून दिलं.
****
नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ
इथं ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याचं आयोजन
करण्यात आले आहे. यावेळी मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित
करण्यात आले असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिली ३१ ऑक्टोबर
रोजी राष्ट्रपती मुर्मू, यांच्या हस्ते महाध्वजारोहण
आणि गोदाआरती होणार आहे.
****
वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्यापेक्षा
जनजागृती आणि स्वयंसेवी सहभाग अधिक प्रभावी ठरेल, असे
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीमधील वायू प्रदूषणाशी संबंधित एका स्वयंप्रेरित
खटल्याची सुनावणी करताना, प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित
केल्याशिवाय प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जाऊ शकत नाहीत, असं
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे. फटाक्यांच्या वापरामुळे
होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी लोकांनी कमी फटाके फोडावेत यासाठी त्यांना
प्रोत्साहित करण्याची गरज न्यायालयानं व्यक्त केली आहे.
****
पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या
महासभेसाठी भारत सरकारतर्फे पाठवण्यात येणाऱ्या २० खासदारांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात
निवड करण्यात आली आहे. १९ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान न्यूयॉर्क इथे होणाऱ्या संयुक्त
राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्रात ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
****
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधील
खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सत्कार केला, भारताने एकूण ८५ पदकं जिंकलेल्या या स्पर्धेत सैन्यदलातल्या खेळाडूंनी सहा सुवर्ण, ११ रौप्य आणि १० कांस्यपदकं पटकावली आहेत
****
‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ मालिकेतली तिसरी युद्धनौका ‘मांगरोळ’ आज
सकाळी मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं भारतीय नौदलात दाखल झाली. ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी
साहित्य वापरून तयार केलेली ‘मांगरोळ’, युद्धनौकांची
रचना,
बांधणी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तसंच सेन्सर्सच्या एकत्रीकरणातील
भारताच्या वाढत्या क्षमतेचं दर्शन घडवते. सरकारच्या ‘मेक
इन इंडिया’
आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली ही युद्धनौका, संरक्षण क्षेत्रात जहाजबांधणीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेलं आणखी एक महत्त्वाचं
पाऊल आहे.
****
जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या कामाचे
प्रभावी नियोजन करण्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. जनगणनेच्या वेळापत्रकानुसार या कामाचे सूक्ष्म नियोजन करून
त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना अग्रवाल यांनी केली. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी
जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक तसंच पर्यवेक्षकांच्या
समयोचित नियुक्त्या, प्रशिक्षणाची पुढील प्रक्रिया, स्व-गणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे सर्व उपक्रम
मार्च,
२०२७ पर्यंत राज्यभर राबवण्यात येणार आहेत.
****
ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं आज पुण्यात
दीर्घ आजाराने निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील
माळेगाव इथं जन्मलेल्या मधू कांबीकर यांना बालपणापासूनच लोककलेचा समृद्ध वारसा लाभला.
लावणी आणि तमाशासारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांना व्यापक प्रतिष्ठा मिळवून
देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत
त्यांनी ७५ हून अधिक नाटक आणि चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना पुरस्कारानं
गौरवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार,
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मधू कांबीकर यांना
श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस असून, या दिवशी देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. देशभरातल्या मंदिरांमध्ये
सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
आज धाराशिव इथं श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा झाल्यानंतर
छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी आणि भाविक उपस्थित होते.
****
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बीड इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी
१६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.
दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणे, अनुसूचित जातींच्या आरक्षणातील
उपवर्गीकरण रद्द करणे आणि गायरान जमिनींचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासह विविध
मागण्या यावेळी मांडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिली.
****
अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या
नेतृत्वाखालील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज छत्रपती संभाजीनगर इथं हज
हाऊसला भेट देऊन पाहणी केली. यावेळी समितीनं हज यात्रेकरूंच्या सुविधा, प्रशासकीय व्यवस्था आणि आगामी नियोजनाचा आढावा घेतला.
****
बीड इथं जन शिक्षण संस्थान आणि मानस गुरुकुल यांच्यावतीनं आज
भारतरत्न नानाजी देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामीण विकास, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी कार्य करणारे भारतरत्न नानाजी देशमुख यांचे कार्य समाजासाठी
प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख यांनी यावेळी बोलताना
केलं.
****
No comments:
Post a Comment