Friday, 9 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

·      राज्यात दुष्काळ जाहीर न झालेल्या ३६ तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार जाहीर

·      यंदाचं विष्णुदास भावे गौरवपदक दिग्दर्शक सई परांजपे यांना घोषित

आणि

·      जालना इथं अवैध शस्त्रविक्री प्रकरणी एकास अटक; आठ पिस्तुलं हस्तगत

****

केंद्रीय पथकाने आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सुनील कुमार दुबे, डॉ. जसपाल सिंग आणि डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारात विलास शिंदे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं संवाद साधला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह स्थानिक प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

जालना जिल्ह्यात या पथकाने अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी इथं उदल हरिचंद शिहिरे, शिवलाल गांगे, बालचंद गांगे तसंच जामखेड इथं संतोष गुरुके यांच्या पिकाची पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव इथंही पथकानं पीक परिस्थितीचा आढावा घेतला. गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाची अडचण आणि मासेमारीवर अवलंबून असलेल्या १०६ कुटुंबांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी आमदार नारायण कुचे, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी आशिमा मत्तिल आदी उपस्थित होते.

 

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा आणि अर्धमसला परिसरातील शिवारात भेट देऊन तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतांची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. पथकासोबत यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपस्थित होते. हे केंद्रीय पथक उद्याही बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर उद्या दुपारी पथकाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी ३६ तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दुष्काळ निश्चितीच्या निकषांबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत, २० टक्के निकष शिथील करून पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं ही माहिती दिली. तक्रारी प्राप्त झालेल्या १८ तालुक्यांमध्ये २० टक्के ग्राउंड ट्रुथिंग अर्थात प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

राज्यात आतापर्यंत सुमारे एक कोटी हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. आज सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थित्रीची पाहणी केल्यानंतर भरणे बोलत होते.

****

विकास प्रकल्पांचा लाभ स्थानिकांना मिळावा, अशा पद्धतीने प्रकल्पांची रचना केली जात असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सेवा संकल्प अभियान 2026 या उपक्रमांतर्गत आज पालघर जिल्ह्यात नागरिकांना शासकीय सेवा योजनांच्या लाभांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. स्थानिकांना विकासात स्थान नसेल, तर तो विकास नव्हे, विनाश असेल, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. आज, उमेदवारी अर्ज मागं घ्यायच्या शेवटच्या दिवशी, त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे भाजपचे कौस्तुभ गावडे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालं. काँग्रेसकडून जयंत आसगांवकर ही निवडणूक लढवत आहेत.

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात एकूण १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

****

नवी दिल्लीत जंतरमंतर इथं उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी -सीजेपीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षा आणि वाहतूक नियमन लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. आंदोलनासाठी किमान १० दिवस आधी सूचना देणं आवश्यक असताना नियोजित तारखेच्या काही दिवस आधीच सूचना देण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

****

भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी आज ही घोषणा केली. मच्छार यांच्यावर दुबई ते तेलअविव या विमान प्रवासादरम्यान सहवैमानिकाने हल्ला केला होता. हा हल्ला मोडून काढणाऱ्या या विमानातल्या पाच प्रवाशांनाही हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल.

दरम्यान, कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे.

****

यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाच्या नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. १२ लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेत गुलामगिरीच्या काळात, भारतीय तमिळ कुटुंबात १९४१ मध्ये जन्मलेल्या नवी पिल्लई यांनी हॉवर्ड विद्यापीठातून वकिलीत पीएचडी केली आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, नाट्यप्रशिक्षिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचं ५८ वं विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर झालं आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिला जाणारा हा पुरस्कार येत्या ५ नोव्हेंबरला रंगभूमीदिनी प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य, नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन अशा विविध क्षेत्रांत सई परांजपे यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी आज रेणा मध्यम प्रकल्प, बर्दापूर परिसरातील प्रकल्प क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणने संबंधित विद्युत पंपांची वीजजोडणी तातडीने खंडित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिले. जलसंपदा विभागाने प्रकल्प परिसरात गस्त वाढवून अवैध पाणी उपशाला आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

****

शेतकऱ्यांना कर्जवाटप, कर्ज पुनर्गठन तसंच कर्जमाफीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. परभणी इथं बँकांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात जवळपास एक लाख ६० हजार शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत असून, त्यापैकी ७९ हजार २१८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर सुमारे ६७२ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँक स्तरावर जमा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

****

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दसरा दिवाळीसाठी नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र सादर केलं आहे. सत्तार यांनी या पत्रात सिल्लोड-सोयगाव तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचं लक्ष वेधलं. सणासुदीच्या काळात घरखर्च भागवणंही अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचं, सत्तार यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

जालना शहरात अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. भिमा भाऊराव वाघमारे असं संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सहा गावठी पिस्तुलं, दोन ऑटोमॅटिक पिस्तुलं, एक धारदार खंजीर आणि नऊ जिवंत काडतुसे, असा सहा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातल्या अन्य चार संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक तेगबिर सिंह संधू यांनी सांगितलं.

****

सेवा संकल्प अभियानअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं दुभंगलेले ओठ आणि  टाळू तपासणी शिबिर घेण्यात आलं. चिकलठाणा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या शिबिरात १२ बालकांची तपासणी करुन शस्त्रक्रिया करण्यात आली.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर विकास करण्यास आणि त्यासाठी एकूण ९८ वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रांची इथं सायंकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...