Saturday, 3 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज चौदाव्या दिवसाची सुरुवातही सुवर्णपदकानं केली. तिरंदाजीमध्ये, कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं; तिनं अंतिम फेरीत ‘शूट-ऑफ’मध्ये दक्षिण कोरियाच्या ओह ये-जिनचा पराभव केला. तर, पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात नीरज चव्हाण यानं कांस्य पदक पटकावलं. भारताच्या आदिती अशोक, प्रणवी उर्स आणि दीक्षा डागर यांनी आशियाई खेळांमधील महिलांच्या गोल्फ प्रकारात रौप्यपदक जिंकलं. तर, एकेरीत प्रणवी उर्स हिनं महिला गोल्फ स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या महिला हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला ११ लाख रुपये पुरस्कार हॉकी इंडियानं जाहीर केला आहे.

पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज भारत आणि मलेशिया संघात अंतिम लढत होणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेत आज पुरुषांच्या क्रिकेट मध्ये भारत आणि पाकिस्तान संघात सुवर्णपदकासाठी अंतिम सामना होत आहे. भारतानं केलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा पाकिस्तानच्या तीन बाद ८० धावा झाल्या आहेत.

या स्पर्धेत आतापर्यंत भारत १८ सुवर्ण, २६ रौप्य, ३६ कांस्य पदक अशा एकूण ८० पदकांसह पाचव्या स्थानावर आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रम मालिकेला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत. देशाच्या विविध भागांतील यशोगाथा आणि सामाजिक बदलांच्या कथांवर थेट प्रकाश टाकणाऱ्या या कार्यक्रमातून पंतप्रधान जनतेशी थेट संवाद साधतात. या कार्यक्रम मालिकेचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी प्रसारित झाला होता. पंतप्रधानांनी गेल्या रविवारी या कार्यक्रमाच्या १३८ व्या भागाद्वारे देशवासियांना संबोधित केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल क्षमतेच्या तर त्यापाठोपाठ ४ पूर्णांक ५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका सुरूच होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा होता. हिंगोलीचे जिल्हाधिकारी, राहुल गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली –

बाईट - राहुल गुप्ता जिल्हाधिकारी

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास भूकंप झाला. हा धक्का ४ पूर्णांक ४ रिश्टर स्केलचा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव आदी तालुक्यातही भूकंपाचा हा धक्का जाणवला. भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या काही भागातही सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.

****

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अकोला दौऱ्यावर असून, या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी चिखलगाव मधल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची झाडं उपटून आणत महसूलमंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या. सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, शासनानं हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख तीन हजार २६८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ६९८ कोटी ९३ लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे. यादीतील २३ हजार २८७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेलं नाही. तरी या शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं, असं आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केलं आहे.

****

राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ आज बुलडाणा जिल्हयातील प्रसिद्ध लोणार सरोवर इथं करण्यात आला. वन्यजीव सप्ताहानिमित्त पुढील सात दिवस लोणार अभयारण्यात पक्षी निरीक्षण, स्वच्छता मोहीम आणि शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...