Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 October
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०3 ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज
चौदाव्या दिवसाची सुरुवातही सुवर्णपदकाने केली. तिरंदाजीमध्ये, कुमकुम मोहोड हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं; तिने अंतिम फेरीत 'शूट-ऑफ'मध्ये दक्षिण कोरियाच्या ओह ये-जिनचा पराभव केला. भारताच्या प्रणवी उर्सनेही
शानदार कामगिरी करत आशियाई खेळांमधील महिलांच्या गोल्फ प्रकारात पहिलं सुवर्णपदक
जिंकलं आहे. चीनच्या रुओनिंग यिन आणि सिंगापूरच्या शॅनन झुआन यिन टॅनला हरवत
प्रणवीने सुवर्णपदक पटकावलं. दरम्यान या
स्पर्धेत आज पुरुषांच्या क्रिकेट मध्ये भारत आणि पाकिस्तान संघात सुवर्णपदकासाठी
अंतिम सामना होत आहे.
पुरुषांच्या हॉकी स्पर्धेतही आज भारत आणि मलेशिया संघात
अंतिम लढत होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत सुवर्ण पदक
मिळवलेल्या महिला हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला ११ लाख रुपये पुरस्कार हॉकी
इंडियाने जाहीर केला आहे. इतर कर्मचाऱ्यांनाही प्रत्येकी साडे ५ लाख रुपये हा
पुरस्कार देण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ३
पूर्णांक ३ रिश्टर स्केल क्षमतेच्या तर त्यापाठोपाठ ४ पूर्णांक ५ रिश्टर स्केल भूकंपाची
नोंद झाली आहे. त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका सुरूच होती. या भूकंपाचा
केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा होता.
परवा १ तारखेला रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास
हिंगोलीतल्या पांगरा शिंदे परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला होता, मात्र त्याची अधिकृत नोंद झाली नव्हती.
नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ती सतर्कता बाळगावी असं आवाहन वसमतचे
उपविभागीय अधिकारी, विकास माने यांनी केलं आहे. गेल्या जुलै
महिन्यातही हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले होते. दरम्यान नांदेड
जिल्ह्यातही आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास भूकंप झाला. हा धक्का ४ पूर्णांक
४ रिश्टर स्केलचा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात
आली. नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा,
नायगाव आदी तालुक्यातही भूकंपाचा हा धक्का जाणवला. भूकंपाचे
धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि
प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या काही भागातही सकाळी पावणे दहा
वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.
****
शेतकऱ्यांच्या समस्या आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातील विविध
जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्याच अनुषंगाने महसूलमंत्री आज अकोला जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात महसूलमंत्री शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून
त्यांच्या अडचणी जाणून घेणार असून, नुकसानग्रस्त भागाची
पाहणीही करणार आहेत.
****
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी
काल मुंबई आणि दिल्लीत आंदोलन करण्यात आलं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी
आंदोलन केलं. दरम्यान राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव
महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची
सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे. ऑनलाईन सादर केलेल्या अर्जासोबत आवश्यक
कागदपत्रं अपलोड केलेली असल्यास, नागरिकांकडून पुन्हा लेखी
अर्ज तसंच कागदपत्रांच्या छायाप्रती घेण्याची गरज नाही, असं
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितलं आहे.
****
सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात भोकर
ग्रामीण रुग्णालयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी
सर्व ज्येष्ठ रुग्णांना आयुष पद्धतीने जीवनशैलीचं मार्गदर्शन करण्यात आलं. ज्येष्ठ
नागरिकांची नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी तसंच
रक्ताच्या विविध चाचण्या यावेळी करण्यात आल्या, तसंच
योगासनं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा इथलं नागनाथ मंदिर परवा पाच
ऑक्टोबरपासून दर्शनासाठी महिनाभर बंद असणार आहे. गर्भगृहातील दुरुस्तीसाठी हा
निर्णय घेण्यात आहे.
****
जालना शहरातील जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत
दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे परवा ५ तारखेपासून ७ तारखेपर्यंत
जालन्याचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे. नागरिकांनी त्यानुसार पाण्याचं
नियोजन करण्याचं तसंच प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जालना शहर
महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment