Thursday, 8 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 8 October 2026

Time 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर

·      पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यासाठी मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक उपाययोजना

·      एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाहीचा आराखडा तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

·      जनतेचा विश्वास आणि प्राप्त अनुभव हीच आपली संपत्ती-पंतप्रधानांचं प्रतिपादन

आणि

·      पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनाच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रम

****

दुष्काळी पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. येत्या ११ तारखेपर्यंत हे पथक राज्यात तीन वेगवेगळ्या भागात पाहणी करणार आहे. मराठवाड्यात पाहणीसाठी हे पथक आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होईल. विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हे पथक उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन, परवा सायंकाळी हे पथक मुंबईला प्रयाण करणार आहे. या पथकाने आपला पाहणी अहवाल केंद्र सरकारला सादर केल्यानंतर, NDRF च्या मदतीबाबत निर्णय होणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन राज्यातल्या दुष्काळी स्थितीची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मदतीसाठी आवश्यक सर्व कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

बीड जिल्ह्यात चारा, पिण्याचं पाणी, टँकर किंवा रोजगारासंदर्भात नागरिकांनी १-०-७-७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. जिल्ह्यात १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

धाराशिव जिल्हा प्रशासनाने व्यापक दुष्काळ व्यवस्थापन आराखडा कार्यान्वित केला आहे. पशुधन विकास अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि सेवाभावी संस्था यांनी तालुकास्तरावर समन्वयातून पूर्वतयारी करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.

जालना जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. शहरी भागात वाहनं धुण्यास बंदी घालण्यात आली असून, स्विमिंग पूल तसंच बांधकामासाठी पाण्याचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक जलस्रोतांपासून ५०० मीटर अंतरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नवीन विहीर किंवा बोअरवेल खोदण्यास तसंच बोअरवेल २०० फुटापेक्षा अधिक खोदण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. उपलब्ध पाण्याचं नियोजन करूनच पिकांची निवड करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी, उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाणी बचत, पुनर्वापर आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, बांधकाम क्षेत्र तसंच व्यापारी आणि व्यावसायिक आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधल्या कथित गैरप्रकारांविरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी समाजकंटक नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही गैरप्रकारांशिवाय पार पडतील, याची खात्री करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं, परीक्षा घेताना निष्पक्षता आणि पारदर्शकतेची हमी देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. पुण्यात एमपीएससी परीक्षांमधले कथित गैरप्रकार आणि त्यासंबंधीच्या वादांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेऊन त्याबाबत कार्यवाहीचा आराखडा येत्या तीन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

****

गेल्या २५ वर्षांत कमावलेला जनतेचा विश्वास आणि मिळालेला अनुभव हीच आपली संपत्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करत होते. सात ऑक्टोबर २००१ ला आपण गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी या टप्प्यापर्यंत पोहचू असा विचार केला नव्हता, मात्र जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच २५ वर्षांची ही वाटचाल शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांचे कष्ट ही आपली शक्ती असून, यामुळेच भारताच्या सामर्थ्याला कमी लेखू नये, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधानांचा हा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. नीम कोटेड युरीया हा देखील याच प्रयत्नांचा एक भाग आहे. आज याबाबत आज जाणून घेऊ -

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात युरिया खताची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच खतांचा संतुलित आणि कार्यक्षम वापर वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारकडून नीम कोटेड युरियाला प्रोत्साहन दिलं जात आहे. देशात उत्पादित होणाऱ्या युरियाला १०० टक्के नीम कोटिंग अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या युरिया अनुदान योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना अनुदानित दरानं युरिया उपलब्ध करून दिला जातो.

 

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

केंद्र सरकार संतुलित खत वापरासाठी मृदा आरोग्य पत्रिका, पोषकद्रव्य आधारित अनुदान योजना, नीम कोटेड युरिया यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहे.

****

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही सलग २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांच्या कारकिर्दीची ही २५ वर्षे विकासाची, समर्पणाची, मानवकल्याणाची आणि भारताला नव्या क्षितिजावर नेणारी असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. राज्यातही अनेक ठिकाणी या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. विकसित भारत संकल्प सभेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचं या कार्यक्रमात थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीसह अनेक शहरातूनही ‘सेवा ज्योती यात्रा’ काढण्यात आली, या यात्रेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. या अभियानाच्या माध्यमातून समाजसेवा, जनकल्याण आणि राष्ट्रहिताच्या कार्याला चालना देण्याचा संदेश देण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा काल समारोप झाला. अभिनेत्री नम्रता संभेराव आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी गायक रवींद्र खोमणे यांच्या हस्ते पारितोषिकं वितरीत करण्यात आली. विद्यापीठाच्या संघानं महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवलं. विजेतेपदासह दोन गटात ४ चषक आणि १६ कलाप्रकारात पारितोषिकं मिळवून या संघाने हॅटट्रिक केली.

****

आर्थिक दुर्बल घटक - ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र निर्गमित करण्यास विलंब केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तहसील कार्यालयातले महसूल सहाय्यक सी.पी. धर्मेकर आणि सहाय्यक महसूल अधिकारी एन.व्ही. पाळेकर यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. प्रमाणपत्र देण्यास विनाकारण विलंब करून शासकीय कामकाजात दिरंगाई आणि निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावर आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे पुढचे दहा दिवस अनेक रेल्वेगाड्या उशीराने धावणार आहेत. मुंबई-बल्लारशा-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस १७ आणि १८ तारखेला पूर्ण रद्द करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 8 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...