Monday, 12 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे...

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 October 2026

Time 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा-पाण्याचं सूक्ष्म नियोजन - मुख्यमंत्र्यांची माहिती

·      समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

·      पुण्यात एमपीएससी विद्यार्थांचं आंदोलन मागे, सरकारकडून पाच सदस्यीय समितीची स्थापना

·      शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात

आणि

·      तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर १४ धावांनी विजय, मालिकेत २-१ नं आघाडी

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा-पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत काल केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक पद्धतीनं दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यावर भर दिला. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीनसह कापूस, तूर आणि ऊस पिकांचं नुकसान झालं असून, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना नुकसान भरून काढण्याची संधी कमी असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, जलसंधारणाची कामं आणि आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध पाण्याचं पहिलं आरक्षण पिण्यासाठी करण्यात आलं असून, नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय पथकानं जालना, बीड, धाराशिव तसंच अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदत प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केली.

****

दरम्यान, नाशिक इथं काल ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये, पशुधनाच्या चारा पाण्यासाठी राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करेल असं मुख्यमंत्री म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

समृद्ध पंचायतराज अभियानाच्या या टप्प्यात गावागावांत जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा ३१ मार्च २०२७ पर्यंत राबवण्यात येणार आहे.

**

दरम्यान, सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण संमारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल  त्र्यंबकेश्वर इथला दर्शनपथ, गोदाघाट तसंच नाशिक इथं द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळाला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. ही सर्व कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

****

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणा, हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊ,

देशातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांद्वारे वक्फ मालमत्तांची नोंदणी, व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळं मुस्लिम समुदायाला मोठा लाभ होत असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

वक्फ सुधारणा कायद्याच्या माध्यमातून वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी करताना कायदेशीर तरतुदी, मालमत्ताधारकांचे हक्क आणि संबंधित घटकांच्या चिंता यांचा समतोल राखणे महत्त्वाचे ठरणार आहे.

****

राज्य लोकसेवा आयोग - एमपीएससीमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली असून, त्याच्या सचिवपदी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल ही घोषणा केली. 

भोसले यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने काल एमपीएससीसंदर्भात विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, आणि चौकशी समिती जाहिर केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.

दरम्यान, आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं.

****

शारदीय नवरात्रौत्सवाला काल भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तिपीठांमध्ये विधीवत घटस्थापना झाली. घरोघरी तसंच अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांमध्येही घटस्थापना करण्यात आली.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

नांदेड जिल्हयातल्या माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती.

बीड शहरात खंडेश्वरी देवी मंदिर आणि श्री तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात तसंच अंबाजोगाई इथल्या जोगेश्वरी देवी मंदिरात घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला.

छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कर्णपूरा इथल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात अध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. उत्सवाच्या काळात सुरक्षेसाठी पोलिस कायम सेवेत असतील, असं छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यात एकूण दोन हजार ३२७ ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, महिला शेतकरी प्रमाणपत्र निर्मितीत बीड जिल्ह्यानं १७ हजार ८८७ प्रमाणपत्रांसह राज्यात दुसरं स्थान मिळवलं आहे. परभणी जिल्हा १८ हजार ८६३ प्रमाणपत्रांसह प्रथम क्रमांकावर आहे. ग्रामसभा आयोजनात छत्रपती संभाजीनगर जिल्हा १९१, परभणी १६५ आणि नांदेड जिल्हाही १४४ ग्रामसभांसह आघाडीवर आहेत. या अभियानामुळे महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळण्यासह शासकीय योजनांचा लाभ घेणं सुलभ होणार आहे.

****

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्याचाही समावेश असल्याने जिल्ह्यातल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करू नये, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

****

इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १४ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २२३ धावा केल्या. अभिषेक शर्माने ६९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला वेस्ट इंडिजचा संघ २० षटकात सात बाद २०९ धावाच करु शकला. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन गडी बाद केले. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी कारवाई केली. या कारवाईत जिल्ह्यात १३ कोटी १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ५५६ ब्रास रेती जप्त करण्यात आली. नांदेड ग्रामीण, लिंबगाव, नायगाव, मुदखेड, धर्माबाद, उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतल्या वाळू घाटांवर ही कारवाई करण्यात आली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे...

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...