Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 13
October 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ऑक्टोबर २०२६ दुपारी
१.०० वा.
****
केंद्र
सरकारनं आपल्या शासनाच्या दृष्टिकोनात आणि कार्य संस्कृतीमध्ये पॉवर टू एम्पॉवर, अर्थात सक्षम करण्यासाठी शक्ती, हा सिद्धांत
स्वीकारला आहे, असं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये ब्लूमबर्ग न्यू
इकॉनॉमी फोरम या कार्यक्रमात ते आज बोलत होते. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान आणि
आधुनिकीकरण हे शक्तीचे महत्वपूर्ण स्त्रोत बनल्याचं नमूद करत, २०१४ नंतर भारताची परिसंस्था विस्तार पावली असून, देशभरात अडीच लाखाहून स्टार्ट अप्स सुरू झाले आणि त्यातले सुमारे निम्मे
छोटी शहरं आणि खेड्यात सुरू झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. परदेशातून आलेल्या
पाहुण्यांनी भारतातल्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा अनुभव घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. भारतात रस्त्यावरचा फेरीवाला आणि मोठं वाहन
विक्री दालन यांच्या व्यवसायाचा स्तर वेगवेगळा असला, तरी दोघंही
एकाच डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा वापर करतात, हीच सर्वसमावेशक
तंत्रज्ञानाची ताकद असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत ग्लोबल साऊथसह भागीदार
राष्ट्रांनाही आपली तांत्रिक क्षमता उपलब्ध करून देत असून, त्यांच्या गरजांनुसार डिजिटल व्यवस्था विकसित करण्यासाठी भारत सहकार्य करत
आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
दिल्ली
पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक
केली आहे. हे नेते
दिल्लीत जंतर मंतर इथं जाण्याचा प्रयत्न करत होते. काल दिल्ली
पोलिसांनी जंतर मंतर हे ठिकाण निर्धारित प्रदर्शन ठिकाणांच्या यादीतून वगळलं होतं.
****
शारदीय
नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ असून, देवी
दुर्गेच्या तृतीय स्वरूप असलेल्या चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. साहस, शांती आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या चंद्रघंटा मातेला पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी वंदन केलं आहे. देवीच्या आशीर्वादानं देशवासीयांच्या यश आणि कीर्तीत
निरंतर वृद्धी होत राहो, अशी कामना
त्यांनी व्यक्त केली.
****
राज्यातल्या
अनाधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियमबाह्य फ्लॅटचे प्रथम
विक्रीचे करार, खरेदीखत
किंवा डिड ऑफ अपार्टमेंट, हस्तांतरणपत्रांची
नोंदणी, तसंच नकाशा मंजूर
क्षेत्रफळापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या सदनिकांची नोंदणी बंद होणार आहे. यासंदर्भात महसूल विभागानं
प्रतिबंधात्मक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, नियम
मोडल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे. फ्लॅट खरेदीतली फसवणूक आणि विनापरवानगी बांधकामावर अंकुश ठेवण्यासाठी
राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
****
‘पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत
पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातल्या 3 लाख
५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना
कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या
कर्जखात्याची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून
घ्यावं आणि योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय
प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी
महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी ३१ लाखाहून अधिक
थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.
****
सेवा संकल्प
अभियानाअंतर्गत काल बीड जिल्ह्यात माजलगाव तहसील कार्यालयात एक विशेष शिबिर घेण्यात आलं. यामध्ये
विविध शासकीय सेवांचा आणि दाखल्यांचा लाभ तळागाळातल्या अनेक लाभार्थ्यांना थेट
जागेवरच देण्यात आला. यामध्ये
विशेष सहाय्य योजनांचा लाभ देणं, सातबारा आणि
८-अ च्या नोंदी, शिधा पत्रिका
वाटप, नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
वाटप यांचा समावेश होता.
****
अन्न आणि औषध
प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर
विशेष तपासणी मोहीम राबवत एक हजार ४०८ किलो पाम तेलयुक्त मावा सदृश्य मिठाई नष्ट
करण्यात आली. या नष्ट केलेल्या मिठाईची किंमत पाच लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत
१३ आस्थापनांमधले १८ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
****
सिंहस्थ
कुंभमेळ्याच्या कामामुळे आगामी १५ दिवस नाशिक मधलं रामकुंड बंद ठेवण्यात येणार
आहे. या कुंडावर दररोज हजारो नागरिक स्नानासाठी येतात तसंच पिंडदान कुंडात करण्यात
येतं. याआधी त्र्यंबकेश्वर इथलं कुशावर्त तीर्थ हे सुद्धा दोन महिने दुरुस्तीच्या
कामासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात येत्या ३१ ऑक्टोबरला
कुंभमेळ्याचं धर्म ध्वजारोहण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
No comments:
Post a Comment