Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· यूपीआय व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर
लागू करण्यात येणार
· कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन
कऱण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· राज्यातल्या महामार्गांवर पुढच्या वर्षापासून ‘हवाई रुग्णवाहिका’
सेवा सुरू करण्याचं नियोजन
· विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्क माफीची शंभर टक्के अंमलबजावणी
करण्याचे विद्यापीठांना निर्देश
आणि
· शेफाली वर्मा तसंच शुभमन गिल यांना आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ सन्मान
****
यूपीआय मर्चंट डिस्काउंट रेट, अर्थात, २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना
द्यावं लागणार असलेलं शुल्क दिवाळीनंतर लगेच लागू करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आज सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे.यासाठीची
तारीख स्वतंत्रपणे सूचित केली जाणार आहे. सामान्य ग्राहकांना यूपीआय पेमेंट करण्यासाठी
कोणतंही शुल्क लागणार नसून, व्यक्ती ते व्यक्ती यूपीआय व्यवहारही
पूर्णपणे नि:शुल्क राहणार आहेत. याशिवाय, महिन्याला एक लाखापर्यंतची
रक्कम यूपीआयद्वारे मिळवणारे छोटे दुकानदार आणि पथविक्रेत्यांनाही हे शुल्क द्यावं
लागणार नाही.
****
राज्यातल्या शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड
बायोगॅस अर्थात सीबीजी निर्मितीला चालना देण्यासाठीचे प्रकल्प उभारण्याबाबत टास्क फोर्स
स्थापन करावेत,
आणि ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे
राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारावेत, असे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या
बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा
लागणारा खर्च वाचणार असून, कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला
चालना मिळेल,
असं प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात
आघाडीवर आहे,
असं प्रतिपादन करत, महाराष्ट्रात
गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडमच्या उद्योजकांना
केलं. आज मुंबईत महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्वाच्या क्षेत्रांतलं सहकार्य वाढवण्यासाठी
महाराष्ट्र आणि यूके दरम्यान सामंजस्य करार करण्यात आले.
****
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महिला उद्योजकता
हब स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन
यांच्यात याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. या हबमुळे राज्यातल्या महिलांच्या आर्थिक
सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला.
****
विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चामुळे कालचा
दिवस देशाच्या इतिहासातला एक काळा दिवस ठरल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
व्यक्त केलं आहे. हा मोर्चा म्हणजे घटनात्मक संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असून
हा भारताच्या न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे, असं
शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश
कुमार आणि एस आय आर यांच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवरची
सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पंधरा ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
****
राज्यातली पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेत, पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात, असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. आज
मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
वैजापूर आणि गंगापूर इथं गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने
कराव्यात,
तसंच मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामं युद्धपातळीवर
पूर्ण करावीत,
असे निर्देशही त्यांनी दिले.
****
राज्यातल्या महामार्गांवर होणाऱ्या रस्ते अपघातांतल्या गंभीर
जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशानं पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला
‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते
बोलत होते. या योजनेत समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती
महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज एल एच एम के ३, या प्रगत आणि वजनाला हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश झाला. रत्नागिरी तटरक्षक हवाई
तळावर जलतोफांच्या सलामीनं या हेलिकॉप्टरचं स्वागत करण्यात आलं.
****
राज्यातल्या अनाधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी आजपासून
बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महसूल विभागानं प्रतिबंधात्मक
आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, नियम मोडल्यास दुय्यम
निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विद्यापीठांनी विद्यार्थ्याचं परीक्षा शुल्क माफीची शंभर टक्के
अंमलबजावणी करावी, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत
यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. पालकमंत्री संजय शिरसाट, कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक
कर्जवसुलीच्या स्थगितीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरही कुलगुरुंनी
लक्ष देण्याची सूचना सामंत यांनी केली. ते म्हणाले –
बाईट - उदय सामंत, मराठी भाषा मंत्री
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ज्ञानतीर्थ
युवक महोत्सव येत्या १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये होणार
आहे. आज नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या महोत्सवात
सुमारे एकशे दहा महाविद्यालयांमधले विद्यार्थी तीस कला प्रकार आणि विविध स्पर्धांमध्ये
भाग घेतील.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय
अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज चिकलठाणा औद्योगिक परिसरात नियोजित
मतमोजणी केंद्राची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
सीसीटीव्ही यंत्रणा, मतपेट्या ठेवण्याची व्यवस्था, मतमोजणी कक्ष, तसंच उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी उपलब्ध
सुविधांची माहिती घेतली. मतमोजणी प्रक्रियेत कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केली.
****
लातूर जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली
असून,
जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या
पाटबंधारे प्रकल्प, लघु तलाव, नदी-नाले
यामधून होणारा अनधिकृत पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रकल्पांच्या
बुडीत क्षेत्रातल्या विहिरींवरून सिंचनासाठी होणारा अनधिकृत उपसा पूर्णपणे थांबवून
विद्युत मोटारी जप्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
****
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे आगामी पंधरा दिवस नाशिक मधलं
रामकुंड बंद ठेवण्यात येणार आहे. रामकुंड परिसरात येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या
हस्ते कुंभमेळ्याचं धर्म ध्वजारोहण होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमधील जुना मोंढा परिसरातल्या बजरंग ट्रेडिंग
कंपनीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं निलंबित केला आहे. या कंपनीत ऑईल रिपॅकिंगचं
काम सुरू असाताना झालेल्या कारवाईत २३ लाख ३५ हजार ६५४ रुपयांचं संशयास्पद आणि चुकीचं
ब्रँडिग केलेलं खाद्य तेल जप्त करण्यात आलं. स्वच्छता आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचंही
यावेळी दिसून आलं.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीला
पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची चौथी यादी काल प्रसिद्ध झाली. आतापर्यंतच्या चारही याद्यांमध्ये
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या १ लाख ४६ हजार ३७१ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी
१ लाख ५ हजार २०१ शेतकऱ्यांचेच आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आधार
प्रमाणीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केलं आहे.
****
भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिला, सप्टेंबर २०२६ साठीचा आयसीसी महिला प्लेयर ऑफ द मंथ हा सन्मान मिळाला आहे. महिला
आशिया चषक आणि आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये केलेल्या शानदार कामगिरीमुळे तिची यासाठी
निवड झाली. दुसरीकडे भारतीय कप्तान शुभमन गिलला विक्रमी पाचव्यांदा आयसीसी पुरुष प्लेयर
ऑफ द मंथ हा सन्मान मिळाला आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत
केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची यासाठी निवड झाली.
****
No comments:
Post a Comment