Friday, 9 October 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 October 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्रीय पथकाकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. तीन पथकांपैकी एक पथक पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर पुणे जिल्ह्यात तर एक पथक विदर्भात नागपूर, यवतमाळ आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. तिसरं पथक छत्रपती संभाजीनगरसह जालना तसंच बीड जिल्ह्यांतल्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत महिला आणि बाल विकासविषयक विभागीय शिखर परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. पोषण, बाल शिक्षण, बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या चार प्रमुख विषयांवर या परिषदेत भर देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं, उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणं आणि योजनांच्या अंमलबजावणीतील आव्हानांवर उपाय शोधणं, हा या परिषदेचा उद्देश आहे. सहकारी संघराज्यवाद बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेली ही दुसरी विभागीय शिखर परिषद आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमधील नव्या सुधारणांचं स्वागत केलं आहे. अटकेची तरतूद हटवणं, काही गुन्हेगारी तरतुदी वगळणं आणि करप्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भातील शिफारसींचा सकारात्मक परिणाम होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्वरेनं निर्णय घेणं, अनुपालन खर्च कमी करणं, स्वयंचलित परतावा आणि विश्वासावर आधारित प्रशासन यावर या सुधारणांमध्ये भर देण्यात आला आहे. जीएसटी व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकस्नेही करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा भाग असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भातला मसुदा एका महिन्यात प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या क्षेत्रातली सुरक्षा, डीपफेक, कौशल्यविकास आणि मानव प्रथम या मुद्द्यांवर या मसुद्यात भर असेल, असंही त्यांनी सांगितलं. डीपफेक ही आजच्या समाजातली एक मोठी समस्या असून त्यांचा दर्जा दिवसेंदिवस आणखी उत्तम होत आहे, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, यामुळे त्यांची दिशाभूल होते, हा धोका त्यांनी अधोरेखित केला.

****

कर्करोगावरच्या, अनुसूचित यादीत नसलेल्या सर्व औषधांवरच्या नफ्याची कमाल मर्यादा, किरकोळ विक्री मूल्याच्या ३० टक्के इतकी निश्चित करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सर्व प्रकारच्या औषधांचा यात समावेश आहे. पुढच्या महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असलेल्या या निर्णयामुळे कर्करोगावरच्या एकंदर ११० औषधांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

****

बँक भरतीसाठीच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार देणारी टोळी सीबीआयनं उघड केली आहे. या टोळीचा सदस्य असलेल्या जीएसटी निरीक्षकासह चार मुख्य सूत्रधारांना अटक केली आली आहे. सार्वजनिक परीक्षांच्या प्रक्रियेत हे आरोपी प्रत्यक्ष परीक्षार्थी म्हणून उपस्थित राहून लेखी परीक्षा तसंच मुलाखतीसह निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सहभागी होत होते. या प्रकरणी IBPS अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शननं तक्रार दाखल केली होती. त्यावरुन दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई झाली.

****

यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या साहित्यिक ॲनी कार्सन यांना जाहीर झाला आहे. ॲनी कार्सन या अभिजात ग्रीक साहित्याच्या अभ्यासक आणि अनुवादक आहेत. प्राचीन अभिजात साहित्य परंपरेशी संवाद साधत, समकालीन साहित्यात नवीन रूपं निर्माण करणाऱ्या त्यांच्या धाडसी आणि कल्पक साहित्यकृतींसाठी त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या अडचणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलं. त्यानंतर, याप्रश्नी मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांनी ५ ऑक्टोबरपासून सुरू केलेलं उपोषण मागं घेतलं.

****

विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दाखल अर्जांपैकी ५४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, यापैकी अंकुश शिंदे यांनी माघार घेतली. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणूकच्या तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधितांना दिले आहेत. नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते.

****

सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात शून्य ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ७५ हजार ६०० मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १२ हजार ३०० बालकांवर औषधोपचार करण्यात आले, तर २६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...