Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 October
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०७ ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाला आज २५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००१ मध्ये आजच्याच दिवशी मोदी यांनी
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर १६ मे २०१४ रोजी त्यांनी
देशाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. गुजरातमध्ये तीन वेळा मिळालेला जनादेश
आणि सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेला जनतेचा पाठिंबा, मोदी यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या राजकीय समर्थनाचं प्रतिबिंब असल्याचं
भाजपकडून सांगण्यात आलं. यानिमित्तानं आज नवी दिल्लीत ‘विकसित भारत संकल्प सभा’
आणि ‘सेवा ज्योती यात्रा’ हा कार्यक्रम घेण्यात आला.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मोदी यांचं
सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं. समावेशक
विकासाला चालना देण्यासह कनेक्टिव्हिटी, डिजिटल प्रगती आणि
संधींच्या विस्ताराचा त्यांनी उल्लेख केला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनही पंतप्रधानांना शुभेच्छा
दिल्या. गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास राष्ट्रनिर्माण, सुशासन आणि जनकल्याणाच्या कार्याला समर्पित असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक २५
टक्क्यांची वाढ केली असून, रेपो दर आता साडे पाच टक्के
इतका झाला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर
आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
****
यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन
यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या
विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आइस क्युब न्युट्रिनो वेधशाळा आणि उच्च
ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.
****
देशाचे २९ वे हवाई दल प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष
दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून ते पदभार
स्वीकारतील. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी CISE, मुख्यालय आयडीएस आणि एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सेंट्रल
एअर कमांड यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यकारी आणि धोरणात्मक पदांवर काम केलं
आहे.
****
इतर मागास बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या
समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृह, स्वाधार
योजना,
शिष्यवृत्ती आणि महाज्योतीच्या विविध उपक्रमांना अधिक बळकटी
देऊन त्यांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश इतर मागासवर्ग मंत्रिमंडळ
उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काल मुंबईत
झालेल्या समितीच्या बैठकीत ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक
आणि आर्थिक स्थितीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा समाजासाठी
नेमण्यात आलेल्या शिंदे समितीप्रमाणेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या
समस्यांचा अभ्यास करून अहवाल सादरण्यासाठी समिती नेमण्याबाबत प्रस्ताव तयार
करण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात श्री क्षेत्र माहूर इथं शारदीय नवरात्र
महोत्सवाच्या तयारीचा आढावा काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घेतला. नवरात्रोत्सवात दरम्यान
येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन
मिळावं,
यासाठी सर्व आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश
जिल्हाधिकार्यांनी दिले. माहूरगडावर भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन
महामंडळाच्या १२० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या नूर हॉस्पिटलमध्ये
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त पूरक आहार समुपदेशन आणि प्रात्यक्षिक केंद्राचं
उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते झालं. सहा महिन्यांनंतर बालकांना
वयानुसार योग्य पूरक आहार कसा द्यावा, त्याचं प्रमाण आणि
वारंवारता,
आहारातली विविधता आणि स्थानिक पौष्टिक पदार्थांचा वापर
याबाबत माता आणि कुटुंबियांना या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार
आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या भाषा आणि गणित सक्षमीकरणासाठी
दोन दिवसीय कार्यशाळेची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांच्या
अध्यक्षतेखाली काल करण्यात आली. निपुण भारत कार्यक्रमांतर्गत शासनाकडून उपलब्ध
करून देण्यात आलेल्या विविध शैक्षणिक साहित्य पेट्या आणि साहित्य संचांचा
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत
कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
****
वाशिम जिल्हा पोलिसांनी समृद्धी महामार्गावर अंमली पदार्थ
विरोधात दोन मोठ्या कारवाया करत सुमारे अडीच कोटी रुपयांचा तब्बल ४६९ किलो गांजा
जप्त केला. मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या पहिल्या कारवाईत एका
चारचाकीची तपासणी केली असता त्यात १२६ किलो गांजा आढळून आला. कारंजा शहर पोलीस
ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत संशयित आयशर ट्रक अडवण्यात
आला. ट्रकची झडती घेतली असता चालकाच्या केबिनमध्ये गुप्त कप्प्यात लपविलेला ३४३
किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment