Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक-अभिजात
मराठी भाषा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· शाश्वत, बळकट आणि परवडणाऱ्या सुविधा
उभारण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन
· हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात
भूकंपाचे धक्के;औंढा तालुक्यात गढाळा इथं भूकंपाचा केंद्रबिंदू
· आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट आणि हॉकीसह आज चार सुवर्णपदकं-भारताची
चौथ्या स्थानी झेप
आणि
· राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी पावसाची माघार
****
विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक असल्याचं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज मुंबईत एसएनडीटी महिला विद्यापीठात
अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मातृभाषेत
कामकाजाचं महत्त्व विशद करतांना मुख्यमंत्री म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जगभरात मराठी
माणूस जिथे जिथे आहे, तिथे मराठीचा डंका वाजत असल्याचं शिंदे यांनी
सांगितलं,
तर सामंत यांनी, मराठी भाषा विभागामार्फत
केल्या जात असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
****
अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्ताने नांदेड इथल्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा, वाङमय आणि संस्कृती अभ्यास संकुलात आज अभिजात मराठी साहित्याचं प्रकट वाचन करण्यात आलं.
केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात
भाषेचा दर्जा दिला आहे.
****
चांगल्या पायाभूत सुविधांशिवाय गुंतवणूक येत नाही, गुंतवणूकिशिवाय रोजगार निर्माण होत नाही आणि रोजगाराशिवाय गरिबी दूर होत नाही, त्यामुळेच विकासाची पायाभरणी ही बळकट पायाभूत सुविधांवर आधारित आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं
आहे. नागपूर इथं पायाभूत सुविधांच्या विकासावरील आशियाई द़ृष्टिकोन या विषयावर आधारित
आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. गडकरी यांनी शाश्वत, बळकट
आणि परवडणाऱ्या सुविधा उभारण्याचं आवाहन केलं.
****
राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ आज बुलडाणा जिल्हयातील
प्रसिद्ध लोणार सरोवर इथं करण्यात आला. वन्यजीव सप्ताहानिमित्त पुढील सात दिवस लोणार
अभयारण्यात पक्षी निरीक्षण, स्वच्छता मोहीम आणि शालेय निबंध
स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.
****
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांना
मदत जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिलं आहे. अकोला जिल्ह्यात दुष्काळ पाहणी केल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी
बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे
शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान, विरोधकांनी कुठलंही राजकारण न करता दुष्काळ परिस्थिती मध्ये सरकारला सहकार्य करण्याचं
आवाहन केलं.
****
हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात
आज भूकंपाचे धक्के बसले, हिंगोली जिल्ह्यात सकाळी पावणे
आठ वाजेच्या सुमारास ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या तर त्यापाठोपाठ ४ पूर्णांक
५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका
सुरूच होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा तालुक्यातील गढाळा होता. हिंगोलीचे जिल्हाधिकारी, राहुल गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
बाईट – राहुल
गुप्ता, जिल्हाधिकारी, हिंगोली
परभणी जिल्ह्याच्या काही भागातही सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास
भूकंपाचा धक्का बसला.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास
भूकंप झाला. हा धक्का ४ पूर्णांक ४ रिश्टर स्केलचा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
केंद्रातून देण्यात आली. नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ घराबाहेर पडून
मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
****
अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संस्थेतर्फे समर्पित सामाजिक कामांना
गौरवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वार्षिक बा, बापू, विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यंदा कस्तुरबा ट्रस्टच्या
शेवंताबाई चव्हाण, पारधी मुलांसाठी कार्यरत मतीन भोसले आणि
महिला-बालकांचं पुनर्वसन करणाऱ्या डॉ. भारती पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड झाली
आहे. संस्थेच्या अध्यक्षा जया जोगदंड यांनी ही माहिती दिली. मानपत्र, पन्नास हजार रुपये आणि ग्रंथ या स्वरुपाचे हे पुरस्कार येत्या बुधवारी, ७ ऑक्टोबर रोजी स्नेहालय पुनर्वसन संकुल इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार
आहेत.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथल्या आनंदराव धोंडे
उर्फ बाबाजी महाविद्यालयात जिल्हास्तरीय एकदिवसीय शेतकरी लेखक साहित्य संमेलन घेण्यात
आलं. शेतकऱ्यांच्या अनुभवांना, संघर्षांना आणि सर्जनशीलतेला
साहित्याच्या माध्यमातून व्यासपीठ मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नमूद केलं. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या
संख्येने यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज स्वामी
रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते
स्वामीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धतेचं योग्य नियोजन
करून,
उपलब्ध चाऱ्याचं पौष्टिक मूल्य वाढवण्यासोबतच पर्यायी चारा स्रोतांचा
वापर करण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. नांदेड तालुक्यातल्या
सायाळ इथं पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने चारा साक्षरता अभियानाअंतर्गत निकृष्ट
चारा सकस करणं या विषयावर प्रात्यक्षिक घेण्यात आले, त्यावेळी
ते बोलत होते. सोयाबीन कुटारावर युरिया आणि मोलासेस प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता आणि रुचकरता वाढवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी
आजही सुवर्णपदकांची लयलूट केली. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिने अंतिम फेरीत केवळ एका
स्ट्रोकची आघाडी कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत गोल्फमध्ये वैयक्तिक
सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गोल्फपटू बनली आहे.
अमरावतीची तीरंदाज कुमकुम मोहोड हिने महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह
प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तर कुस्तीपटू अमन सेहरावत याने ५७ किलो वजनी गटात
सुवर्णपदक पटकावलं.
पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ
चारून सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं दिलेलं २१२ धावांचं लक्ष्य गाठताना पाकिस्तानचा
संघ ६ खेळाडूंच्या बदल्यात १९२ धावाच करू शकला.
पुरुषांच्या हॉकीत भारतीय संघाने मलेशियाचा पाच विरुद्ध एका
गुणाने पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.
भारतीय तिरंदाज नीरज चौहान याने पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात
आपला सहकारी धीरज बोम्मदेवराला पराभूत करून कांस्यपदक जिंकलं.
भारतीय मल्ल अंतिम पंघाल हिला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात
रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची
एकूण पदकसंख्या ८५ झाली असून यात २१ सुवर्ण, २७
रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या
तीन सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना चंदीगड इथं सुरु आहे. नाणेफेक जिंकत प्रथम
फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा सात बाद ३१४ धावा केल्या
आहेत. आधीचे दोन्ही सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मौसमी पावसानं माघार
घेतल्याचं हवामान विभागानं आज जाहीर केलं. विदर्भातला चंद्रपूर आणि गडचिरोली, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव,
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, सातारा,
सांगली आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग
हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मौसमी पावसानं माघार घेतली आहे. यंदा
आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. ऊर्वरित महाराष्ट्रातून येत्या
२-३ दिवसात मौसमी पाऊस माघारी जाऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७६ गावांना आणि २३ वाड्यांना टँकरद्वारे
पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यात टँकरसाठी १२२ गावांनी नोंदणी केल्याचं
याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment