Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04
October 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
जपानमध्ये २० व्या आशियाई खेळांचा आज समारोप होत आहे.
दोन आठवड्यांच्या या स्पर्धांमध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. भारताने उत्कृष्ट
कामगिरी करत २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह एकूण ८५ पदके जिंकून चौथं स्थान
पटकावलं. समारोप सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. भारताची
उदयोन्मुख महिला खेळाडू नेमबाज नीरू धांडा समारोप सोहळ्यात ध्वजवाहक असेल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या
५३ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अनंत पंघालचे अभिनंदन
केले आहे. सोशल मीडियावरील एका संदेशात त्यांनी म्हटले की, पंघालची ही कामगिरी इतर खेळाडूंना प्रेरणा देईल. पंतप्रधानांनी
अदिती अशोक, प्रणवी शरथ उर्स आणि दीक्षा डागर
यांचा समावेश असलेल्या महिलांच्या गोल्फ संघाचेही रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन
केले.
****
या मॅरेथॉन शर्यतीत भारताच्या सावन बारवालने रौप्यपदक
पटकावत नवा राष्ट्रीय विक्रम स्थापित केला आहे. त्यानं २ तास ११ मिनिटे ३७ सेकंदात
ही स्पर्धा पूर्ण करीत हा विक्रम नोंदविला. तब्बल ४४ वर्षांनंतर हा विक्रम झाला आहे.
****
राज्य विधान परिषदेच्या निवडणूकीतील तीन जागांसाठी भारतीय
जनता पक्षातर्फे नावं आज थोड्या वेळेपूर्वी जाहीर झाली. यानुसार पुणे विभाग पदवीधर
मतदार संघातून डॉक्टर स्मिता जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून सुधाकर कोहळे आणि पुणे विभाग
शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांच्या नावांचा यात समावेश असल्याचं पक्षाच्या
केंद्रीय निवडणूक समितीनं जाहीर केलं.
****
तुळजापूर इथं श्री तुळजा भवानी देवीच्या मंचकी निद्रेला
कालपासून प्रारंभ झाला. पुढच्या रविवारी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनारुढ
होवून शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होईल.
****
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय
कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सन्मान होणार आहे. शंभर जिल्ह्यातून असं
प्रभावी काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अशा दहा जिल्ह्यांत संभाजीनगरचा समावेश असून जिल्हाधिकारी
विनय गौडा जी. सी. यांना केंद्र शासनातर्फे विशेष कार्यक्रमात नवी दिल्लीत सोमवार १२
ऑक्टोबरला सन्मानीत केलं जाईल. कृषी उत्पादकता, पीक तीव्रता - कृषी कर्ज वितरण तसंच केंद्र शासनाच्या अकरा विभागांच्या
३६ योजनांचं अभिसरण, राज्य शासनाच्या विविध
योजना आणि खासगी क्षेत्राचा सहभाग यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगरसोबतच
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट कार्यपद्धती- यशोगाथा सादरीकरणासठी कार्यक्रमात
निमंत्रित करण्यात आले आहे. तसंच या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या धन-धान्य कृषी योजनेतील जिल्ह्यांमधून प्रत्येकी
चार प्रतिनिधींही या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दोन दिवसीय दान उत्सव कार्यक्रमाचा
समारोप आज होणार आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात सकाळी दहा ते
सायंकाळी आठ या वेळेत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक संस्था-दानकर्ते आणि
उद्योग क्षेत्र यांना एकाच ठिकाणी जोडणाऱ्या या उपक्रमाचं आयोजन माणुसकी फाउंडेशन तर्फे
करण्यात आलं आहे. केवळ आर्थिक मदत म्हणजे दान असं नसून वेळ-कौशल्य-ज्ञान-श्रम-वस्तू
या स्वरुपातही समाजसेवी संस्थांना मदत होवू शकते. हा या उत्सवामागील विचार आहे. संबंधित
संस्था ते समाज घटक जोडणी याद्वारे होत असून सर्वांसाठी उपक्रम खुला आहे.
****
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील
विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एन्व्हायर्नमेंटर
रिसर्च अँड एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेच्या
वतीने सरस्वती भुवनचा विज्ञान महाविद्यालयाचा बॉटनी आणि पर्यावरण विभाग, शारदा मंदिर शाळा, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, गणोरी येथील जिल्हा परिषद शाळा या शैक्षणिक संस्थांमध्ये आठवडाभर
पर्यावरण विषयक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ
पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी दिली. वन्यजीव, पर्यावरण रक्षण यासंदर्भात देशभरात होत असलेल्या उपक्रमांची
माहिती पर्यावरण अभ्यासक कुणाल विभांडिक यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या तीन दिवसीय केंद्रीय यवक महोत्सवाचं उद्घाटन उद्या विद्यापीठ नाट्यगृहात
सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त उद्या सकाळी आठ वाजता
विद्यापीठ परिसरात शोभायात्राही काढण्यात येणार आहे.
****
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांनी ‘फ्लाय दुबई’ विमान दुर्घटना रोखून दाखवलेल्या शौर्याबद्दल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी थेट फोनवरून
संवाद साधत त्यांच्या शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे भरभरून कौतुक केले आहे. संवादामध्ये
नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांचा “इस्रायल, भारत आणि संपूर्ण जगाचा हिरो” असा गौरव केला. इस्रायलच्या आगामी
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्य दीप प्रज्वलित करण्यासाठी पंतप्रधान नेतन्याहू यांनी
कॅप्टन स्मित माछर यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष निमंत्रण
दिले आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरात यु.ए.ई.मधील दबई क्राउन प्रिन्स अर्थात राजपुत्र
आणि उपपंतप्रधान तथा संरक्षणमंत्री शेख हमदान बिन मोहम्म्द बिन राशीद अल मख्तूम यांनी
स्मित माछर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. स्मित यांचं कौतुक करतांना शेख यांनी
आमच्या देशासाठी सेवा देतांना यु.ए.ई.च्या करुणेचे-शांततेचे आणि जीवनाचे असे राष्ट्र
या संकल्पनेला स्मित माछर यांनी सार्थ केल्याचं म्हटलं आहे.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह
यांनी फ्लाय दुबईचे कॅप्टन स्मित मच्छर यांच्या असामान्य प्रसंगावधानाचे आणि मानसिक
व शारीरिक धैर्याचे कौतुक केले.
****
No comments:
Post a Comment