Saturday, 10 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी काम वेळेत पूर्ण करण्याची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून प्रशासकीय यंत्रणेला सूचना

·      दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      येत्या १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रेचं’ आयोजन

·      शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

आणि

·      मुंबईसह राज्यातल्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा

****

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी, यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घेण्याची सूचना केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी केल्या आहेत. ते आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीकस्थिती, पाणीटंचाई, भूजल पातळी, चारा उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचं सादरीकरण केलं. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी या पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला असुन जिल्ह्यात एकुण ७ लाख ४२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचं यावेळी केंद्रिय पथकाला सांगण्यात आलं.

दरम्यान, दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या या केंद्रीय पथकानं आज बीड शहरालगत पाली इथल्या बिंदुसरा तलावाची पाहणी केली आणि उपलब्ध पाणीसाठा तसंच शहरासह परिसरातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. बिंदुसरा तलावात ३० जून २०२६ रोजी १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्याच्या स्थितीत तो केवळ ५ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच धरणात १०० टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती यावेळी पथकाला देण्यात आली. यावेळी या पथकानं पालीच्या स्वयंचलित हवामान केंद्राला भेट देऊन यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.

या पथकानं बीड तालुक्यातील मोरगाव परिसरातील पाणीटंचाई, जलसंधारणाची कामं आणि शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी मोरगाव इथल्या दराडे वस्तीवरील पाझर तलावाची तसंच परिसरातील विहिरींची पाहणी करून पाणी उपलब्धतेची स्थिती जाणून घेतली.

****

सोलापूर जिल्ह्यातही दुसऱ्या पथकाने आज दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी या पथकानं, संभाव्य पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता तसंच रबी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. या केंद्रीय पथकाचं नेतृत्व कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोनुसामी यांनी केलं. दुष्काळामुळं चाऱ्याची उपलब्धता कमी झाली असून, चाऱ्याचे दर प्रति टन सुमारे ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी केंद्रीय पथकाला दिली. या पाहणी दौऱ्यावेळी राज्याचे कृषी आयुक्त सुरेश मांढरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वर्षा निवासस्थानी झालेल्या जलसंधारण विषयक बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत.

पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी अभिनेते आमिर खान यांनी, पाण्याचा पुनर्वापर, भूजल पुनर्भरण आणि जलस्रोतांचे संवर्धन यावर भर देतानाच, राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरानं जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावं, असं आवाहन केलं. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलं. दिपके यांच्यासह पक्षाचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असतानाच अभिजीत दिपके यांनी एका व्हिडीओद्वारे आंदोलनाचं नेतृत्त्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवत असल्याचं सांगितलं. अजिंक्य शिंदे कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आणि त्यांना अटक करावी, या मागणीसाठी डाव्या पक्षांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, स्वराज अभियान यांच्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत घोषणाबाजी केली.

****

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून येत्या १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या बैठका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असून सरकारच्या विविध योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

****

धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. उप अधिष्ठाता डॉ. स्वाती पांढरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचं कौतुक करून, शाळा महाविद्यालयं, कार्यालयं अशा ठिकाणी व्यापक प्रमाणात मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्याचं आवाहन केलं. यावेळी मनोविकार तज्ज्ञ डॉ. महेश कानडे यांनी १० ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या मनजागृती राष्ट्रीय मानसिक आरोग्य जनजागृती अभियान आणि टेलिमानस टोल फ्री क्रमांक १४४१६ ची माहिती दिली.

****

जल जीवन मिशनअंतर्गत आज बीड इथल्या उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला शालेय विद्यार्थ्यांनी भेट देऊन पिण्याच्या पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी प्रक्रिया प्रत्यक्ष जाणून घेतली. यावेळी पाण्याची गुणवत्ता, शुद्धता आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्याचं महत्त्व वाढलं आहे. या अंतर्गत शालेय विद्यार्थी पाणी आणि स्वच्छता बालवीर म्हणून काम करणार आहेत. यावेळी जलसुरक्षकांमार्फत पाणी निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिली.

****

शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात तुळजापूर, माहूर, अंबाजोगाईसह आदिशक्तीच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरांची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

तुळजापूर इथं उद्या पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ होईल. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.

माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, गायन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्या सकाळी देवीची पूजा, अर्चा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी देवी मंदिरात देवीचे पुजारी तथा शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लासूर इथली दाक्षायणी देवी, महेशमाळ इथली गिरीजादेवी, जालना जिल्ह्यात अंबड इथली मत्स्योदरी देवी, आदी ठिकाणीही नवरात्राची तयारी पूर्ण होत आली आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करमाड इथल्या राज्यस्तरीय औषधी भांडार तसंच प्रशिक्षण केंद्राला, प्रभारी उपसंचालक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्राच्या इमारतीची सद्यस्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, तसंच प्रभावी कार्यान्वयनासाठी आवश्यक बाबींची यावेळी त्यांनी पाहणी करत आवश्यक सूचना केल्या.

****

लातूर महापालिकेनं आपल्या व्यापारी गाळ्यांच्या थकीत भाड्याच्या धडक वसुली मोहिमेसाठी पथकांची नियुक्‍ती केली आहे.

****

मुंबईसह कोकण, तसंच विदर्भासह राज्यातल्या काही भागांत १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...