Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 October 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती आणि नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.
धुळे तालुक्यातल्या अजंग-कासविहीर इथं
पाहणी केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला
दिल्या, जेणेकरून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल
आणि पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळू शकेल. कापूस, सोयाबीन, तूर
आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, जिल्ह्यात सुमारे ७०
टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामेही अचूक आणि वेळेत पूर्ण
करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळामुळे पिण्याचं पाणी, चारा
आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन रोजगार हमी योजना, जिल्हा
नियोजन समिती आणि शासनाच्या उपलब्ध निधीतून जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर
हाती घेण्याची गरज असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी
विविध गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद
साधून पिकांची स्थिती आणि नुकसानीची माहिती घेतली.
सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार
गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.
दुष्काळामुळे चारा टंचाईची समस्याही वाढत असून अकोला जिल्ह्यात शेतकरी आणि
पशुपालकांनी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात चारा टंचाईवर मात
करण्यासाठी पशुसंवर्धन,
कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत
समिती आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून ‘चारा साक्षरता अभियान’ राबवण्यात येणार
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई
क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. दृढनिश्चय, जिद्द
आणि उत्कृष्ट खेळाडूवृत्तीच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत देशाचं
प्रतिनिधित्व केल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. आशियाई क्रीडा
स्पर्धेत शानदार कामगिरी करणारे भारतीय खेळाडू मायदेशी परतले असून, मुंबई, पुण्यासह
विविध ठिकाणी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांनी तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पृथिका प्रदीप आणि धीरज बोम्मदेवारा यांचं
पुणे विमानतळावर स्वागत केलं.
****
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, सक्षम
पुरवठा साखळी आणि संपर्क सुविधा ही उदयोन्मुख आणि मध्यम अर्थव्यवस्था असलेल्या
देशांची महत्त्वाची उद्दिष्टं असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं.
नवी दिल्ली इथं आयोजित म्युनिक सुरक्षा परिषदेच्या ६२व्या अधिवेशनात ते काल बोलत
होते. बदलत्या जागतिक परिस्थितीत उदयोन्मुख आणि मध्यम अर्थव्यवस्था असलेल्या
देशांमधल्या सहकार्याला विशेष महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं. जगातले अनेक देश
आणि गटांचा वाढता प्रभाव,
तसंच विविध देशांशी वाढता समन्वय हा याच दृष्टिकोनाचा
परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
देशात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवायांना वेग आला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या
तीन मोठ्या कारवायांमध्ये अॅम्फेटामाइन, कोकेन आणि हेरॉईनसारखे
अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले असून, काही
जणांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, गुप्त
माहितीच्या आधारे या कारवाया करण्यात आल्या. तस्करांकडून अंमली पदार्थ लपवण्यासाठी
चॉकलेटचे डबे,
खेळणी, सौंदर्यप्रसाधनांचे बॉक्स आणि
वाहनांच्या टायर्सचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.
****
नाशिक महानगरपालिका हद्दीतील बंद
असलेल्या शाळांची आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसह पुनरुज्जीवन करून पुन्हा
सुरू कराव्यात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ
आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी
प्रभावी नियोजन करावं,
असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
नाशिक इथं काल महानगरपालिकांच्या शाळांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी
त्यांनी शाळांमधल्या उपलब्ध शैक्षणिक सुविधा, वर्गखोल्या, इमारतींची
सद्यस्थिती,
पायाभूत सुविधा तसंच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा
आढावा घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासनाच्या
वतीने काल नशा मुक्त युवा अभियान राबवण्यात आलं. आपल्या पाल्यांना व्यसनांपासून
दुर ठेवण्यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं. युवक, युवतींसह
विविध क्षेत्रातले नागरिकही या उपक्रमाला उपस्थित होते.
****
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने छत्रपती
संभाजीनगर मधल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
आहे. एन्व्हायर्नमेंटर रिसर्च ॲण्ड एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने हे
कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ
डॉ. दिलीप यार्दी यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment