Saturday, 10 October 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 October 2026

Time 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

·      राज्यात दुष्काळ जाहीर न झालेल्या ३६ तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात १३ जणांची माघार-४१उमेदवार निवडणूक रिंगणात

·      भारतीय वंशाच्या नवेनेथेम नवी पिल्लई यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

आणि

·      जालना इथं अवैध शस्त्रविक्री प्रकरणी एकास अटक; आठ पिस्तुलं हस्तगत

****

केंद्रीय पथकाने काल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सुनील कुमार दुबे, डॉ. जसपाल सिंग आणि डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारात विलास शिंदे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं संवाद साधला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह स्थानिक प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

जालना जिल्ह्यात या पथकाने अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी इथं उदल हरिचंद शिहिरे, शिवलाल गांगे, बालचंद गांगे तसंच जामखेड इथं संतोष गुरुके यांच्या पिकाची पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव इथंही पथकानं पीक परिस्थितीचा आढावा घेतला. गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती, आणि मासेमारीवर अवलंबून असलेल्या १०६ कुटुंबांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

 

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात जातेगाव फाटा, अर्धमसला आणि रानमळा परिसरात सुरेश नरवाडे, संतोष नरवाडे, तसंच मदन मोटे यांच्या शिवारात भेट देऊन या पथकाने तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतांची सद्यस्थिती जाणून घेतली. हे केंद्रीय पथक आजही बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. पाहणी पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी पथकाची जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी ३६ तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. प्राप्त तक्रारींची दखल घेत, २० टक्के निकष शिथील करून पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले, यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. तक्रारी प्राप्त झालेल्या १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

राज्यात आतापर्यंत सुमारे एक कोटी हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. काल सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थित्रीची पाहणी केल्यानंतर भरणे बोलत होते.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात एकूण १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

****

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना वाहने, वाहन चालवण्याचे परवाने, रस्ते अपघात आणि विमा यांच्याशी संबंधित चार डेटाबेस चार आठवड्यांच्या आत परस्परांशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने राज्यांना अपघातविषयक माहिती ‘ई-डार’ पोर्टलवर विनाविलंब अपलोड करण्याचे निर्देशही दिले आहेत. या प्रणालीमध्ये ‘हिट-अँड-रन’ प्रकरणांचा तसेच पंतप्रधान मदत योजनेचाही समावेश असेल.

****

भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार दिला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग यांनी काल ही घोषणा केली. दरम्यान, कॅप्टन मच्छार यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागातर्फे एक विशेष टपाल तिकीट जारी केलं जाणार आहे.

****

यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाच्या नवेनेथेम नवी पिल्लई यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि शांततेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना १२ लाख अमेरिकी डॉलरच्या या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. सेमी कंडक्टर मिशन हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे.. आज याविषयी जाणून घेऊ -

मजबूत आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं १५ डिसेंबर २०२१ रोजी ७६ हजार कोटी रुपयांच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली. या माध्यमातून देशाला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि डिझाइन क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे ध्येय ठेवण्यात आले. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन ही विशेष आणि स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भविष्यात स्वदेशी चिपनिर्मितीच्या माध्यमातून भारताला जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेत अधिक सक्षम स्थान मिळवून देण्याचा मार्ग इंडिया सेमीकंडक्टर मोहिमेमुळं सुकर झाला आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, नाट्यप्रशिक्षिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचं ५८ वं विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर झालं आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिला जाणारा हा पुरस्कार येत्या ५ नोव्हेंबरला रंगभूमीदिनी प्रदान करण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काल रेणा मध्यम प्रकल्प, बर्दापूर परिसरातील प्रकल्प क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली. अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणने संबंधित विद्युत पंपांची वीजजोडणी तातडीने खंडित करावी, असे निर्देश डॉ. बास्टेवाड यांनी दिले. जलसंपदा विभागाने प्रकल्प परिसरात गस्त वाढवून अवैध पाणी उपशाला आळा घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरची व्यवस्था करावी, तसंच चाऱ्याची गरज असलेल्या गावांमध्ये चारा उपलब्ध करून द्यावा, असे त्या म्हणाल्या.

****

शेतकऱ्यांना कर्जवाटप, कर्ज पुनर्गठन तसंच कर्जमाफीतल्या अडचणी तातडीने सोडवून सहकार्य करण्याचे निर्देश परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहेत. काल परभणी इथं बँकांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात जवळपास एक लाख ६० हजार शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत असून, त्यापैकी ७९ हजार २१८ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची सुमारे ६७२ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

****

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दसरा दिवाळीसाठी नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर केलं आहे. सत्तार यांनी या पत्रात सिल्लोड-सोयगाव तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचं लक्ष वेधलं. सणासुदीच्या काळात घरखर्च भागवणंही अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याचं, सत्तार यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

जालना शहरात अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. भिमा भाऊराव वाघमारे असं संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सहा गावठी पिस्तुलं, दोन ऑटोमॅटिक पिस्तुलं, एक धारदार खंजीर आणि नऊ जिवंत काडतुसे, असा सहा लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर पोलिस ठाण्यातल्या सहायक उपनिरीक्षकासह एका पोलिस अंमलदारास २० हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. सहायक फौजदार गोविंद डोभाळ आणि पोलिस अंमलदार परमेश्वर ढगे अशी या दोघांची नावं आहेत. एका प्रकरणी अदखलपात्र तक्रारीत कारवाई न करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.

****

सेवा संकल्प अभियानअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं दुभंगलेले ओठ आणि टाळू तपासणी शिबिर घेण्यात आलं. चिकलठाणा जिल्हा रुग्णालयात झालेल्या या शिबिरात १२ बालकांची तपासणी करुन शस्त्रक्रिया करण्यात आली.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर विकास करण्यास आणि त्यासाठी एकूण ९८ वर्षांपर्यंतचा भाडेपट्टा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

****

क्रिकेट

रांची इथं काल झालेला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना वेस्टइंडिजने ६ गडी राखून जिंकला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...