Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 October
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०८ ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या
निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं, ते
७५ वर्षांचे होते. घरात बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात
आलं,
सतत ४५ मिनिटं सीपीआर देऊनही त्यांना वाचवता आलं नाही, अशी माहिती रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि
सामाजिक बांधिलकी जपणारे, अशी नाना पाटेकर यांची ओळख होती.
त्यांच्या दमदार संवादफेकीमुळे आणि व्यक्तिरेखेत शिरण्याच्या शैलीमुळे ते वेगळे अभिनेता
म्हणून नावारुपाला आले. नाना पाटेकर यांची अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या
काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत
१९७८ मध्ये आलेल्या 'गमन' या
चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८९ मधील 'परिंदा'
हा त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. मराठीत
नटसम्राट हा त्यांचा चित्रपट विशेष गाजला. ‘क्रांतीवीर’, ‘परिंदा’,
‘प्रहार’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी-द म्युझिकल’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका कायम
स्मरणात राहतील. चित्रपट आणि कला क्षेत्रातल्या योगदानासाठी २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री
पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त
आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी केलेलं त्यांचं सामाजिक कार्यही कायम स्मरणात
राहील.
****
नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
दुःख व्यक्त केलं. नाना पाटेकर यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण वैविध्य आणि सर्जनशीलता आणली आणि अनेक पिढ्यांच्या
स्मरणात राहतील अशी पात्रं साकारली, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतलं
त्यांचं योगदान मोठं असून, त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी
निर्माण झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
अर्पण करताना,
त्यांच्या अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्याला उजाळा दिला.
****
भारतीय हवाई दलाचा ९४ वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. ‘अभेद्य, अचूक आणि सटीक’ ही यंदाची स्थापना दिनाची संकल्पना आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ
मार्शल अमर प्रीत सिंग यांनी दिलेल्या संदेशात, भारतीय
हवाई दल संपूर्ण सजगतेनं आणि दृढनिश्चयानं राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं
म्हटलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा
एकदा शिक्कामोर्तब केलं, तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित
राखण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता सिद्ध केली, असं
त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावर विशेष व्हिडिओ
शेअर करत,
वायुदल दिनानिमित्त आपल्या आकाशाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या
शौर्याला आणि समर्पणाला सलाम, करत असल्याचं म्हटलं आहे.
****
दहाव्या इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन आज नवी दिल्लीत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ‘स्केल विदाऊट बाऊन्ड्रीज’ ही यंदाच्या इंडिया मोबाईल
काँग्रेसची संकल्पना आहे. 5G, 6G, एआय नेटवर्क, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यांसह स्मार्ट मोबिलिटी, इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजीवर या परिषदेत विशेष भर दिला
जाणार आहे.
****
देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय
ग्राहक व्यवहार,
अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात
कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं
उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती, आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली
समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झाली आहे. पुरवठ्यातल्या
या सुधारणेमुळे कांद्याच्या दरात आधीच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातल्या
प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये देखील आवक चांगली झाली असून, १६
सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे चार हजार ३० रुपये असलेला भाव जवळपास १३
टक्क्यांनी घसरून प्रति क्विंटल सुमारे तीन हजार ४७५ रुपयांवर आला आहे.
****
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फुलंब्री कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या वतीनं एक लाख ११ हजार १११ रुपये देणगीचा धनादेश आमदार अनुराधा चव्हाण
यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी फुलंब्री मतदारसंघातल्या विविध विकासकामांबाबतही
त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
****
प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत बीड जिल्हा समन्वय
समितीची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातल्या
क्षयरोग दुरीकरण आणि कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात
आला. क्षयरोगाचं वेळेत निदान, नियमित उपचार, रुग्णांचा पाठपुरावा आणि सहव्याधींचं व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली.
****
अवैध सावकारीविरोधातली मोहीम तीव्र करण्याचे निर्देश लातूरचे
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत
होते. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले
असून,
सर्व बँकांनी त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी
दिल्या.
****
No comments:
Post a Comment