आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 September 2021
TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० सप्टेंबर २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19 ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी
मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश, ओला दुष्काळ जाहीर करण्याची
लोकप्रतिनिधींची मागणी
·
पैठणच्या
जायकवाडी जलाशयात पाण्याची मोठी आवक, धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडले
·
राज्यात मुसळधार पावसामुळे एमएच सीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या
प्रवेश परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी नऊ आणि १० ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा घेणार
·
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या पंतप्रधान पोषण आहार योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आणि
·
राज्यात तीन हजार, १८७ नवे कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर १२२ बाधित
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी प्रशासनाला दिले आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी
काल मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला, तसंच त्यांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री, आणि
विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना
प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, लोकांचं स्थलांतर व्यवस्थित व्हावं, असं
ते म्हणाले. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावं,
तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महसूल आणि कृषी
विभागानं नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करण्यांचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
****
नाशिक
शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काल दुपारनंतर कमी झाला. त्यामुळे गंगापूर,
नांदूर मधमेश्वरसह नाशिक जिल्ह्यातल्या अन्य धरणांमधून होणारा विसर्ग, काल दुपारनंतर
कमी झाला. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ
यांनी, काल गोदावरी नदीच्या पुराची पाहणी केली.
जायकवाडी
धरणाच्या नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे. त्यामुळे काल रात्री
धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून, जवळपास एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा सायंकाळी साडे ९८ टक्क्यांवर
पोहोचला होता. नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लासूर इथं ढेकू नदीच्या पुरात ५२ लोक आणि काही जनावरं
अडकले होते, अग्निशमन दलाच्या पथकानं त्यांची सुटका केली.
****
लातूर
जिल्ह्यात शिवनी इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची आपत्ती प्रतिसाद दलाच्या
पथकानं सुखरुप सुटका केली.
****
बुलडाणा
जिल्ह्यातलं पेनटाकळी धरण भरल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
यामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती
निर्माण झाली असून, नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ
मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे १२ दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे.
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या देवजना परिसरात कयाधू नदीच्या महापुरानं शेतांना
वेढा घातला आहे. शेतात आखाड्यावर अडकलेल्या नागरिकांना काल सकाळी बाहेर काढण्यात आलं.
जिल्ह्यातल्या सिध्देश्वर धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून, एक लाख घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात येत आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या रुई धानोरा परिसरात कयाधू नदीला पूर आला असून, पुलावरून
पाणी वाहत असल्यानं, हदगाव ते निवघा मार्ग काल पूर्णपणे बंद झाला होता. हदगाव आगाराची
निवघा गावाकडे जात असलेली बस रूईचे सरपंच अमोल कदम, पोलीस पाटील सुभाष पवार आणि अन्य
लोकांनी पुलावरून न जाऊ देता हदगावकडे परत पाठवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
डॉक्टर
शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे १५ दरवाजे उघडण्यात आले असून, दोन लाख ५९ घनफूट
प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पूर आला
आहे. पुराचे पाणी नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरलं आहे. या भागातल्या नागरिकांना
राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील १७ निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रात
मागील दोन दिवसात ९०० लोक स्थलांतरित झाले आहेत.
****
शेतकऱ्यांना
प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी, गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर
गुट्टे यांनी केली आहे. या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन, त्यांनी
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. आगामी १५ दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे
करून, गंगाखेड विधानसभा मतदारसंघ तसंच परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ
जाहीर करावा, अशी मागणी गुट्टे यांनी निवेदनात केली आहे.
जिंतूर-सेलू
विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ
जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ सरसकट मदत जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री
यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार
डॉ.राहुल पाटील यांनीही काल परभणी तालुक्यातल्या धार, मांगणगाव, राहाटी, नांदगाव, दुरडी,
समसापुर आदी गावांना भेटी देऊन, पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. या नुकसानीचे
सरसकट पंचनामे करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना केली असल्याची
माहिती आमदार पाटील यांनी दिली.
****
मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही मराठवाड्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर
करून, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन
आमदार चव्हाण यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे
सादर केलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.
या मागणीचं निवेदन काल पालकमंत्री शंकरराव गडाख यांना सादर करण्यात आलं.
दरम्यान,
गडाख यांनी काल उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. शेतकरी
आणि नुकसानग्रस्तांशी संवाद साधून, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही
दिली.
****
खरीप
हंगाम २०२१ अंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
पिकाच्या क्षेत्राची पूर्वसूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती छायाचित्रासह तक्रार
नोंदवणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य ती खबरदारी
घेऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी, असं आवाहन परभणी जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
राज्यात
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत,
अशा विद्यार्थ्यांच्या एमएच सीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा, नऊ आणि
१० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहेत. पीसीएम आणि पीसीबी
या दोन्ही ग्रुपच्या पात्र उमेदवारांना, उद्या एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत,
ईमेल तसंच एसएमएसद्वारे अधिक सूचना देण्यात येतील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी
परीक्षा शुल्क यापूर्वी भरलेलं असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल,
नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र तसंच नव्याने
प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
****
शालेय
विद्यार्थ्यांसाठीच्या पंतप्रधान पोषण आहार योजनेला पुढच्या पाच वर्षांसाठी केंद्रीय
मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेचा देशभरातल्या ११ लाख २० हजार शाळांमधल्या,
११ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या पूर्वी माध्यान्ह भोजन योजना या
नावानं चालवल्या जात असलेल्या या योजनेत, पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय तसंच अनुदानित
शाळांमधल्या विद्यार्थ्यांना लाभ होत होता, आता या योजनेची व्याप्ती वाढवून, सरकारी
तसंच सरकारी अनुदान प्राप्त बालवाड्यांमधल्या बालकांनाही या योजनेत समाविष्ट करण्याचा
प्रस्ताव, सरकारच्या विचाराधीन असल्याचं, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पियुष गोयल
यांनी सांगितलं.
****
राज्यात
काल तीन हजार, १८७ नवे
कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ४७ हजार, ७९३ झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार
११ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक
१२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार २५३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६८ हजार ५३० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २६ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार, ६७५
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल ३४ नवे रुग्ण
आढळले. बीड ३२, लातूर १६, नांदेड तीन,
परभणी दोन, तर जालना जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
तुळजापूरच्या
श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ
झाला. आता येत्या सात ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी तुळजाभवानी देवी सिंहासनारूढ होऊन,
देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.
****
राज्यातलं वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत-जास्त
इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत, असं आवाहन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनी केलं आहे. ते काल पिंपरी-चिंचवड इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारनं
इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलेलं आहे. कंपन्यांमध्ये या वाहनांचं उत्पादन कशा पद्धतीने
केलं जातं, उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक वाहनं बाजारात
आल्यानंतर किती लोकांना ही वाहनं वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू, किती लोक इलेक्ट्रिक
वाहनं घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत क्रीडा नैपुण्य
चाचण्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या चार ते सात ऑक्टोबर या कालावधीत या चाचण्या
जिल्हा क्रीडा संकूल,लातूर इथं घेतल्या जाणार आहेत.
****
हवामान -
गुलाब
चक्रीवादळानंतर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता वायव्य दिशेनं पुढे सरकलं असून,
ते गुजरातच्या जवळ आहे. येत्या २४ तासात हे कमी दाबाचं क्षेत्र अजून तीव्र होऊन, त्याचं
चक्रीवादाळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. हे निर्माण होणारं चक्रीवादळ भारतीय
किनारपट्टीपासून दूर जाणार आहे. मात्र याच्या प्रभावामुळे कोकणात, मराठवाडा, तसेच मध्य
महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
Wednesday, 29 September 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी
जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध
राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा
धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही
कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना
बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मराठवाड्यात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश.
· जायकवाडी
धरणातून ६६ हजार तर सिद्धेश्वर धरणातून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग.
· नागरिकांनी
जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आवाहन.
आणि
· मराठवाड्यात
त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला
दिले आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला,
तसंच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांनी याबाबत
चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे तसंच मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान
सचिव असीमकुमार गुप्ता यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी
विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं बचाव कार्यावर
लक्ष द्यावं तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा
जोर कमी झाला आहे. त्यामुळे गंगापूर, नांदूर मधमेश्वरसह जिल्ह्यातल्या अन्य धरणांमधून
होणारा विसर्ग आज दुपारनंतर कमी झाला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज गोदावरी नदीच्या पुराची पाहणी केली. आज दुपारी
बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून साडे १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात
पाणी सोडलं जात होतं. दारणा धरणातून ५ हजार ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं तसंच इतरही
लहान मोठ्या धरणांमधूनही कमी अधिक प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नांदूर-मधमेश्वर धरणातून सुमारे ४५ हजार ८२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या दिशेने प्रवाहित झालं आहे.
जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात सध्या
एक लाख १२ हजार ३५२ घनफूट प्रति सेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाचे वक्रकार १८
दरवाजे दीड फूट उघडून ६६ हजार २४ घनफूट प्रती सेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात
सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा सध्या जवळपास ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाण्याची
आवक लक्षात घेत विसर्ग अजून वाढू शकतो. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा
इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण भरल्यानं
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील
पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील
गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सिध्देश्वर धरणाचे
१२ दरवाजे उघडण्यात आले असून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग पूर्णा
नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे पूर्णा नदीचं पाणी औरंगाबाद-नांदेड रस्त्यावरुन
वाहत असल्यानं हा मार्ग आज दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील
२८ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारतातील प्रमुख बेदाणा उत्पादनात सांगली
जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील एकूण बेदाणा उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन सांगली
जिल्ह्यात होतं. सांगलीची द्राक्षे आणि हळद ही राष्ट्रीय स्तरावरची सांगलीची ओळख असल्यानं
या दोन्ही पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. जी.आय. मानांकनात शेतकऱ्यांची
नोंदणी वाढावी, निर्यातक्षम बेदाण्याची टक्केवारी वाढवावी, अशी अपेक्षा जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी
आणि पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
****
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक
श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. उद्या त्यांचा
निलंबन कालावधी संपणार होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन अधिकारी दीपाली चव्हाण
यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मे महिन्यात आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी
दीपाली यांनी रेड्डी यांच्या नावानं चार पानी
पत्र लिहिलं होतं.
****
राज्यातलं वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी नागरिकांनी
जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत, असं आवाहन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री
आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पिंपरी-चिंचवड इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलेलं आहे. कंपन्यांमध्ये या वाहनांचं उत्पादन
कशा पद्धतीने केलं जातं, उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक
वाहनं बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहनं वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू,
किती लोक इलेक्ट्रिक वाहनं घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात असल्याचं, पर्यावरण मंत्री
ठाकरे यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये
नुकसान भरपाई देण्याची मागणी गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. या
मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
आगामी १५ दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
तसंच परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार
गुट्टे यांनी निवेदनात केली आहे.
जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाच्या आमदार
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या
खात्यात तत्काळ सरसकट मदत जमा करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
केली आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनीही मराठवाड्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक
मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन आमदार चव्हाण यांनी, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलं आहे.
****
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्रं
काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, औरंगाबाद कार्यालयातंर्गत, औरंगाबादसह जालना, लातूर, बीड या चार जिल्ह्यांचा
समावेश असून लाभार्थ्यांसाठी न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत जात प्रमाणपत्र काढणे, आधारकार्ड
काढणे, शिधा पत्रिका काढण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
//********//
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...