Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी
जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध
राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा
धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही
कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना
बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मराठवाड्यात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश.
· जायकवाडी
धरणातून ६६ हजार तर सिद्धेश्वर धरणातून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग.
· नागरिकांनी
जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आवाहन.
आणि
· मराठवाड्यात
त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला
दिले आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला,
तसंच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांनी याबाबत
चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे तसंच मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान
सचिव असीमकुमार गुप्ता यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी
विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं बचाव कार्यावर
लक्ष द्यावं तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा
जोर कमी झाला आहे. त्यामुळे गंगापूर, नांदूर मधमेश्वरसह जिल्ह्यातल्या अन्य धरणांमधून
होणारा विसर्ग आज दुपारनंतर कमी झाला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज गोदावरी नदीच्या पुराची पाहणी केली. आज दुपारी
बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून साडे १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात
पाणी सोडलं जात होतं. दारणा धरणातून ५ हजार ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं तसंच इतरही
लहान मोठ्या धरणांमधूनही कमी अधिक प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नांदूर-मधमेश्वर धरणातून सुमारे ४५ हजार ८२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या दिशेने प्रवाहित झालं आहे.
जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात सध्या
एक लाख १२ हजार ३५२ घनफूट प्रति सेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाचे वक्रकार १८
दरवाजे दीड फूट उघडून ६६ हजार २४ घनफूट प्रती सेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात
सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा सध्या जवळपास ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाण्याची
आवक लक्षात घेत विसर्ग अजून वाढू शकतो. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा
इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण भरल्यानं
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील
पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील
गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सिध्देश्वर धरणाचे
१२ दरवाजे उघडण्यात आले असून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग पूर्णा
नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे पूर्णा नदीचं पाणी औरंगाबाद-नांदेड रस्त्यावरुन
वाहत असल्यानं हा मार्ग आज दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील
२८ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारतातील प्रमुख बेदाणा उत्पादनात सांगली
जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील एकूण बेदाणा उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन सांगली
जिल्ह्यात होतं. सांगलीची द्राक्षे आणि हळद ही राष्ट्रीय स्तरावरची सांगलीची ओळख असल्यानं
या दोन्ही पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. जी.आय. मानांकनात शेतकऱ्यांची
नोंदणी वाढावी, निर्यातक्षम बेदाण्याची टक्केवारी वाढवावी, अशी अपेक्षा जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी
आणि पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
****
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक
श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. उद्या त्यांचा
निलंबन कालावधी संपणार होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन अधिकारी दीपाली चव्हाण
यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मे महिन्यात आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी
दीपाली यांनी रेड्डी यांच्या नावानं चार पानी
पत्र लिहिलं होतं.
****
राज्यातलं वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी नागरिकांनी
जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत, असं आवाहन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री
आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पिंपरी-चिंचवड इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलेलं आहे. कंपन्यांमध्ये या वाहनांचं उत्पादन
कशा पद्धतीने केलं जातं, उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक
वाहनं बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहनं वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू,
किती लोक इलेक्ट्रिक वाहनं घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात असल्याचं, पर्यावरण मंत्री
ठाकरे यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये
नुकसान भरपाई देण्याची मागणी गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. या
मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
आगामी १५ दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
तसंच परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार
गुट्टे यांनी निवेदनात केली आहे.
जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाच्या आमदार
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या
खात्यात तत्काळ सरसकट मदत जमा करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
केली आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनीही मराठवाड्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक
मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन आमदार चव्हाण यांनी, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलं आहे.
****
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्रं
काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, औरंगाबाद कार्यालयातंर्गत, औरंगाबादसह जालना, लातूर, बीड या चार जिल्ह्यांचा
समावेश असून लाभार्थ्यांसाठी न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत जात प्रमाणपत्र काढणे, आधारकार्ड
काढणे, शिधा पत्रिका काढण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
//********//
No comments:
Post a Comment